आपण पहिल्या भागात साधना गुप्ता हि महिला मुलायम यांच्या संपर्कात आली. इथपर्यंत आलो होतो आज ज्या प्रतीक यादवला मुलायमसिंह यांचा दुसरा मुलगा समजले जाते,तो प्रतीक तेव्हा एक वर्षाचा होता.साधना गुप्ता आणि त्यांचे पती चंद्रप्रकाश गुप्ता यांचा हा मुलगा. पुढे मुलायमसिंहांच्या 'प्रेमात पडल्याने' १९९० मध्ये साधना यांनी घटस्फोट घेतला आणि मुलायमसिंहांबरोबर त्या लिव्ह-इनमध्ये राहू लागल्या.मलतीदेवी ह्या दम्याने पीडित होत्या.त्यामुळे त्या काळात मुलायमसिंहांचे दोन संसार चालू होते.आजारी असलेल्या मालतीदेवी पुढे २००३ मध्ये मरण पावल्या आणि त्यानंतर मुलायमसिंहांनी साधना गुप्ताला पत्नी आणि प्रतीक ला मुलगा म्हणून अधिकृतरित्या स्वीकार केले.
मुलायमसिंहांची हि व्यक्तिगत मसाला स्टोरी ह्या संपुर्ण प्रकरणात महत्वाच्या भूमिकेत आहे,कारण या यादव परिवारात 'यादवी' होण्यामागे साधनाबाई ची भूमिका मध्यवर्ती समजली जाते.प्रतिकला मुळात राजकारणाची आवड नव्हतीच. तो बॉडीबिल्डर आहे आणि लखनौ मध्ये सध्या जिम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करतो.
मात्र त्याच्या आईला वाटते कि प्रतिकची उपेक्षा होतेय.हे साधना गुप्ता (यादव) प्रकरण ज्या शिवपाल यादव ह्यांना सर्वप्रथम समजले होते, ते शिवपालकाका सुद्धा प्रतिकला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असतात.आणि त्यात भर म्हणून , प्रतिकची बायको - पूर्वाश्रमीची अपर्णा बिष्ट हीदेखील अत्यंत महत्वाकांक्षी आणि राजकारणाची आवड असलेली आहे. हि अपर्णा यादव , मुलायमसिंहांच्या उमेदवारांच्या सुचीमध्ये लखनौ -केंट विधानसभा क्षेत्राची समाजवादी पक्षाची उमेदवार आहे.
आजारी आई आणि वडिलांचे पूर्णवेळ राजकारण , ह्यामुळे अखिलेश यादव यांचे अधिकांश शिक्षण बाहेरच झाले.धौलपुरच्या राजस्थान सैनिकी शाळेत त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.पुढे मैसूरच्या एम.जे.अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग केले आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये एम.एस. केले.अर्थातच , काहीशा सुधारलेल्या ,पुढारलेल्या , शिक्षित अशा लोकांकडे अखिलेश यादव यांचा कल असणे स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या रामगोपाल यादव ह्या काकांकडे त्यांचा ओढा आहे.
ह्यांच्या उलट ,सध्या मुलायमसिंहांच्या सर्वात जवळ असलेले त्यांचे धाकटे बंधू शिवपाल यादव यांचे शिक्षण जरी बी.पी.एड. पर्यंत झाले असले , तरी त्यांचा गोतावळा अल्पशिक्षित आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा आहे. समाजवादी पक्षात मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात डॉनचा पक्ष विलीन करवण्यात शिवपाल यांचीच मोठी भूमिका होती, तर अखिलेश यादव यांनी ह्या विलिनीकरणाचा विरोध केला होता.
एकुणात नुकत्याच घडत असलेल्या यादवीची हि पार्श्वभूमी आहे. या कहाणीत शिवपाल यादव ,अमर सिंह,साधना गुप्ता-यादव हि सर्व मंडळी (जर अखिलेश यादवला नायक समजले ,तर)खलनायकाच्या भूमिकेत आहेत.
जे घडायचं ते घडून गेलं आहे. अखिलेश आणि मुलायम हे दोघेही आपापल्या मार्गावरून फार पुढे गेलेले आहेत.त्यांनी तिथून परतण्याची किंवा समाजवादी पक्ष परत नेताजींच्या (मुलायमसिंहांच्या)नेतृत्वाखाली एक होण्याची शक्यता अगदी धूसर आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.११ फेब्रुवारी पासून २८ फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक चौथ्या दिवशी U.P त मतदान होणार आहे.११ मार्चला निकालाची घोषणा आहे.
अशा पार्श्वभुमीवर या 'यादवी' चा उत्तर प्रदेशातल्या राजकारणावर काय परिणाम होईल ,हे बघणे महत्वाचे ठरते.
'यादवी' सुरु होतानाचे चित्र हे समाजवादी पक्षाच्या किंवा अखिलेश यादवच्या बाजूने नव्हते.प्राथमिक आणि प्रारंभिक सर्वेक्षणात भाजपा आणि बसपा हे पक्ष समाजवादी पक्षाच्या बरेच पुढे होते.मात्र उत्तरप्रदेशात हि 'दंगल' सुरु झाल्यांनंतर चित्र बदलायला सुरवात झाली.कारण समाजवादी पक्षात भांडणे होणे आणि तो पक्ष कमकुवत होणे म्हणजे मुस्लिम मते बसपाच्या पारड्यात जाणे.उत्तरप्रदेशात अनेक विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मत निर्णायक ठरतात. आणि मुस्लिम समाज हा ताकदवान पक्षालाच मते देतो.त्यामुळे त्यांची एकगठ्ठा मते बसपाला मिळाली ,तर भाजपाला त्याचा फटका बसू शकतो,हे गणित समोर दिसत होते .
मात्र समाजवादी पक्षात झालेल्या ह्या 'दंगली' नंतर अखिलेश यादव हे अधिक शक्तीशाली बनून समोर आहे आहेत. साफसुथरी,गुंडप्रवृत्तीना विरोध करणारी आणि विकासाला कटिबद्ध अशी त्यांची प्रतिमा मतदारांच्या नकळत निर्माण झाली आहे. त्यांनी रेकॉर्ड वेळेत निर्माण केलेल्या आग्रा हायवेसारख्या प्रकल्पामुळे ती छबी अधिकच उजळ झाली आहे.गेल्या पाच वर्षात समाजवादी पक्षाच्या सरकारचा अँटीइन्कम्बन्सी फॅक्टर मुलायमसिंह-शिवपाल यादव-अमर सिंह यांच्या रुपाने समोर आला आहे आणि त्यामुळे अखिलेश सरकारवरचा अँटीइन्कम्बन्सीचा प्रभाव आणि नाकर्तेपणाचे आरोप बाजूला सारले गेले आहेत.
हे जरी असले ,तरीहि एकट्या अखिलेश यांच्या बळावर सत्ता मिळवणे हे ह्या विभाजित समाजवादी पक्षाला शक्य नाही आणि म्हणूनच बिहार निवडणुकांच्या धर्तीवर 'महायुती' (महागठबंधन)तयार करण्याचे अखिलेश यांचे सर्व प्रयत्न आहेत.त्या दृष्टीने काँग्रेस बरोबर त्यांची बोलणी चालू आहेत.इकडे काँग्रेस तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.त्यांचे रणनीतिकार असलेल्या प्रशांत किशोरच्या लक्षात आलेले आहे कि काँग्रेस पक्ष एकाकी लढला ,तर त्याचे पानिपत निश्चीत आहे.या युतीमध्ये अजितसिंहाचे लोकदल आणि इतर लहान पक्ष येऊ शकतात.आणि तसे जर झाले ,तर उत्तरप्रदेशात त्रिकोनी संघर्ष होऊ शकतो.४ जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर U.P च्या राजकारणाला प्रचंड वेग आलेला आहे . या सर्व परस्थितीत अखिलेश-काँग्रेस युतीचा फायदा भाजपाला होईल कि नाही, हे आज तरी स्पष्ट नाही .पण हि ' दंगल ' झाली नसती ,तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणे कठीण होते आणि तसे जर झाले असते, तर अखिलेश यादवचे काही खरे नव्हते , हे निश्चित !!
No comments:
Post a Comment