Friday, 13 January 2017

उत्तरप्रदेशात 'हानिकारक बापू'.....? (भाग १)

ज्या वेळेस दंगल ह्या चित्रपटातील गाणे, 'बापू, सेहत के लिये तू तो हानिकारक हैं.....' हे सोशल मीडियावर ट्रेंड होत होते , नेमके त्याच वेळेस उत्तर प्रदेशातील 'यादवी दंगल' आणि मुलायम - अखिलेशमधील ट्रेडिंगमध्ये सर्वात वरच्या जागी होते.
ह्या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध जोडून , संपूर्ण U.P त सोशल मीडियावर कार्टून्स , पोस्ट, कॉमेंट्स यांचा महापूर आला होता. मात्र या सर्वांतून एक संदेश अगदी स्पष्टपणे लोकांपर्यंत जात होता - 'हानिकारक बापू' चा ...! उत्तर प्रदेशातल्या ह्या यादवीत बापू म्हणजे नेताजी मुलायमसिंह हे खलनायकाच्या भूमिकेत उभे होते आणि लोकांची सहानुभूती अखिलेश यादवकडे वळलेली दिसत होती !
U.P तल्या राजकारणाच्या दृष्टीने हि फार मोठी घटना होती. फक्त तीन दिवसात समाजवादी पक्षाचे केंद्र मुलायमकडून सरकून अखिलेशकडे आलेले दिसत होते .आजपर्यंत समाजवादी पक्ष ज्यांनी स्थापन केला , चालवला , दोनदा ह्या पक्षाला U.P त सत्ता मिळवून दिली , ते मुलायमसिंह या सर्व प्रकरणात असाहाय्य आणि दयनीय दिसत होते.अपवाद सोडल्यास पूर्ण पक्षच अखिलेशच्या नेतृत्वात उभा राहिलेला दिसत होता.
U.P तल्या ४०३  विधानसभा जागांपैकी २०१२ च्या निवडणुकांत समाजवादी पक्षाला २२४ जागांसकट पूर्ण बहुमत मिळाले होते. यापैकी २०४ आमदार या क्षणी अखिलेशच्या बाजूला आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपच्या झंझावातासमोर टिकून राहून समाजवादी पक्षाचे जे पाच खासदार निवडून आले, त्यापैकी चार अखिलेशच्या बाजूला आहेत.गंमत म्हणजे हे पाचही खासदार 'यादव' परिवारातलेच आहेत.
थोडक्यात काय तर समाजवादी पक्षातली मुखिया ची जागा या क्षणी तुलनेने अत्यंत तरुण असलेल्या अखिलेशकडे आलेली आहे.आणि हेच उत्तर प्रदेशाच्या राजकारणातले एक मोठे आश्चर्य आहे.
याला मुलायमराव आणि अखिलेशदादा यांच्या कार्यशैलीतला फरकही आहे.
समाजवादी पक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने मुलायमसिंह यादव यांचा परिवार. मुलायमसिंह हे पाच भावंडांतले दुसऱ्या नंबरचे . मुलायम यांनी पैलवानकी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र मैनापुरीमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्याच कुस्तीत आमदार नत्थुसिंह प्रभावित झाले. नंतर नत्थुसिंहांच्या छत्रछायेखाली मुलायमसिंहांची राजकीय वाटचाल सुरु झाली.
१९८९ ते १९९१ या काळात ते उ.प्रदेशात जनता पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री होते. पुढे १९९२ च्या ऐतिहासिक करसेवेच्या फक्त तीन महिने आधीच त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि पुढे दोनदा मुख्यमंत्री झाले.
मुलायमसिंहांनी सर्व परिवाराला वेगवेगळी पदे देत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका घेतली होती.
अखिलेश यादव हा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला एकुलता एक मुलगा . अखिलेश झाल्यानंतर लगेचच त्यांची पत्नी मालतीदेवी आजारी राहू लागल्या.त्यामुळे काका रामगोपालसिहांनी अखिलेशचा जास्त सांभाळ केला.म्हणूनच काका- पुतण्याची जोडी U.P च्या राजकारणात ठामपणे उभी आहे.
साधारण १९८९ च्या सुमारास साधना गुप्ता हि महिला
मुलायमसिंह यादव यांच्या संपर्कात आली.
         पुढे काय होते ते दुसऱ्या भागात .....

No comments:

Post a Comment