Tuesday, 20 June 2017

Vaari आणि तरुण

मनी विठू गान, पावसाचे दान,
पायी पंढरीची वाट, तरुणाई चालते”

नव्या पिढीच्या अभंगाचे बोल आहेत हे !
गेल्या काही वर्षापासून तरुण पिढी आषाढातील पंढरपूरच्या पायी वारीकडे आकर्षित झालेली दिसते. खास करून ज्यांच्या घरी वारीची परंपरा नाही, अशी तरुण मंडळीदेखील काहीशा कुतूहलाने, काही भक्तीने, काही अगम्य मनःशांतीच्या ओढीने पंढरपूरची वाट चालताना दिसते आहे. यात ग्रामीण, शहरी अशा दोन्हीचा समावेश आहे. वारी आता केवळ शेतकरी, कष्टकरी किंवा ग्रामीण वारकऱ्यांची अशी राहिलेली नाही, त्यात आता मुंबई, पुण्यासारख्या शहरातील लोकही अतिशय उत्साहाने आणि शिस्तीने सहभागी होताना दिसतात.
वारीला जाण्याची प्रत्येकाची प्रेरणा निरनिराळी असते; कोणी श्रद्धेपोटी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी पंढरीच्या वारीचा इतिहासाचा, व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी, कोणी केवळ वारकऱ्यांची, विठूरायाची सेवा करण्यासाठी तर कोणी वारीमध्ये काही नवीन व्यवसाय देखील करून अर्थार्जन करण्यासाठी! माझ्या मते, कोणत्याही प्रकारे वारीशी संलग्न होणे म्हणजे विठूभक्तीची वाट चालाण्यासारखेच आहे. आजची तरुणाई देखील याला अपवाद कशी असेल?   जीन्स- टीशर्ट, पाठीवर बॅक, गळ्यात डीजीटल कैमेरा अशा रूपात अनेक तरुण मंडळी सध्या आषाढवारी करताना दिसतात. अर्थात त्याकरिता पूर्ण पंढरपूरपर्यंत चालले पाहिजे असे नाही तर अनेक जण केवळ विकेंडला आपल्या सोयीने यात सहभागी होताना दिसतात. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटीमधील तरुण मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. चक्क ‘आयटी दिंडी’ सुद्धा वारीत गेल्या काही वर्षापासून आहे.
सोशल मीडिया मुळेच वारी जास्त तरुणांपर्यंत पोहोचली. आजची तरुण मंडळी, यात विद्यार्थी, नोकरदार दोन्हींचा समावेश आहे, जे वारीपुर्वी त्याबद्दल इंटरनेट साईट्सवरून माहिती गोळा करतात, अभंग ऐकतात, संतपरंपरेबद्दल, दिंडीबद्दल वाचतात. या निमित्ताने त्यांना आपल्या समृद्ध संतपरंपरेची ओळख देखील नव्याने होते आहे आणि त्यांना एका अनामिक ओढीची देखील जाणीव होते आहे, जी इंटरनेट, मोबाइल फोन, चॅटींग यामध्येच नाही! तर वारीमध्ये चालत असताना एकमेकास ‘माउली’ असे हाक मारणे देखील अतिशय जिव्हाळा आणि आपलेपणा निर्माण करणारे आहे. वारीमध्ये सहभागी होणे हे केवळ वारीचे अतिशय कलात्मक फोटो काढणे, फेसबुक अथवा ट्वीटरवर अपडेट करणे, इतकंच याचं स्वरूप मर्यादित नाहीये. तर, वारीचा भव्यपणा, वारकऱ्यांमधील शिस्त, वारीचं व्यवस्थापन, त्यासाठीची बांधिलकी, कमिटमेंट हे सगळच विठूमाऊली इतकंच ओढ लावणार आहे. बहुदा म्हणूनच हळूहळू पंढरीची वारी तरुणाईमध्ये एक आकर्षण बनली. हेही मान्य केले पाहिजे की आज सोशल मीडिया, न्यूज तरुणाईच्या सहभागाला कवरेज देवून एक प्रकारे प्रोत्साहन देते आहे. देवाच्या ओढीने इतके पायी चालत जाण्याची जी ताकद येते ती भक्तीभावामुळेच येते असं वारकरी सांगतात. या वारीतून हेच आजची तरुण पिढी शिकत आहे की जर प्रचंड मेहनत करायची जिद्द असेल, सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ताकद पणाला लावायची तयारी असेल तर आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचता येतं! या संकल्पातून देशाची बळकट नवीपिढी निर्माण होतेय, जी या वारीतून सेवाकार्याचा महत्व जाणून घेतेय ही लाखमोलाची बाब आहे.
काहींना तरुणाईचा वारीतील टेक्नो-सहभाग हे एक फॅड वाटतो. पण, याकडे केवळ टीकात्मक वृत्तीने न पाहता सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक आहे. मला वाटत की ही तरुणाई एका अतिशय सकारात्मक सद्संगतीत जाते आहे. पूर्वी संतांनी जनतेला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी, परमार्थाची ओळख करून देण्यासाठी म्हणून अभंग रचले, देवाबद्दल गोडी उत्पन्न केली, काही अंशी धार्मिकपणा वाढीस लावला. आजच्या क्लब-पबमध्ये रमणाऱ्या तरुण पिढीला पुन्हा या साऱ्याची गरज आहे. त्यांच्यामधला संवाद वाढेल, त्यांना आपली संस्कृती माहिती होईल, जपता येईल, मनःशांती मिळेल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी, ही पंढरीची वारी नक्कीच काही परिवर्तन करू शकेल. महाराष्ट्राची संतपरंपरा काही अंशी का होईना पण नक्कीच पुढे चालत राहील.
आता पंढरपूरला पायी चालत जाणे इतकीच यातील तरुणाईच्या सहभागाची व्याप्ती राहिलेली नाही तर आता ठिकठिकाणी तरुण मंडळी यात वारकऱ्यांची अनेक प्रकारे सेवा करताना दिसतात. कॉलेजमध्ये
 एन. एस. एस., एन. सी. सी. अशा उपक्रमांमुळे, विविध गणेशमंडळांमधील उपक्रमातील सहभागामुळे आजच्या तरुण पिढीला सामाजिक कार्याचे भान येवू लागले आहे. तरुण पिढी आज अतिशय शिस्तबद्धपणे सोशल मीडियाच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवताना दिसते. यात वारीच्या वाटेवरील गावांमधून पाण्याची सोय करणे, अन्नदान, स्वच्छता, मोबाइल चार्जिंग, तसेच आरोग्यसेवा अशा अनेक स्वरूपात तरुणाई सेवा करताना दिसते आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठूरायाची सेवा’ हा भाव अनेक तरुण मंडळींच्या सेवेमध्ये दिसून येतो. आणि नकळत वारीतील तुळशी वृन्दावनाला हात जोडले जातात. 

तुमचा 
#दिपक कठाळे 

Saturday, 10 June 2017

अजब असा भैरवगड .....

भैरवगड केवळ थ रा र क!
 मु.पो.(मोरोशी) ता.मुरबाड ,जिल्हा.ठाणे 


हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्‍यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!
   घरी निवांत सुवर्णपिंपळ नावच पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात श्री.खरमाळे सर (माजी सैनिक) यांचा फोन आला. दिपक कुठे आहेस तु येतोस का ? जाऊयात भटकंतीला ...मी होकार्थी उत्तर दिल आणि ट्रेकिंग करताना अडचण होणार नाही असे कपडे घातले. (हे पण पहावं लागत नाहीतर चांगल्या चांगल्यानंच्या पँटी फाटल्यात) सरांकडे गेलो आणि पाहतोय तर काय आमच्या सौ.खरमाळे मॅडम (पूर्वीच्या गुंजाळ मॅडम कॉलेज मध्ये मला मराठी विषयाला होत्या.) नर्व्हस होत्या कुठे तरी जायचं होत पण सर काही राजी होत नव्हते असो. पण आम्हाला जायचे होते ठरलेल्या ठिकाणी आणि अचानक सर म्हंटले चल भैरवगड . मी हि आतुर होतो जाण्यासाठी ,मॅडम हि तयार झाल्या मात्र आता मॅडम हसत होत्या . सुशांत ला फोन केला येतोय का ? तोही आला. आम्ही सर्व निघालो जुन्नर - मढ - माळशेज घाट - मोरोशी असा मार्ग निश्चित होता . (दुसरा मार्गच नाही ) खूप मजेशीर गप्पा मारत आम्ही जात होतो. माळशेज घाट उतरून मोरोशी च्या अलीकडे जांभुळ , आवळा विकणारे दिसले. मॅडम म्हंटल्या किती छान जांभळ आहेत ते घेण्यासाठी मागे फिरले. सुशांत आणि मी पुढे गेलो आणि तिथेहि एक जोडपं जांभुळ विक्री करत होते. तिथे बसलो थोडी विचारपूस केली. सरांनी आधी थांबवून भैरवगड दाखवला होता. माझी त्याच्या कडे सारखी नजर जायची. भोकाडी बाबा सारखा वाटायचा. अक्राळ विक्राळ सारखा हसतोय आणि ये ये अस म्हणतोय असा भास वाटायचा. शेवटी मोरीशी आलं. आश्रम शाळेच्या समोर एका घरासमोर एक आजोबा दिसले त्यांना विचारण्यासाठी पुढे सरसावलो तर आजोबांच्या मिशा एखाद्या हरियानाच्या पहिलवाना सारख्या ताव दिलेल्या होत्या. आजोबा सांगायला लागले कुठून कशी वाट जाते.आजोबांची परवानगी घेऊन गाड्या तिथेच पार्क केल्या. वेळ कमी होता म्हणून पटापट आम्ही चौघे निघालो. आंब्याची मोठं मोठी झाड होती. घाली पडलेला आंबा दिसला. मी घेतला पण काय माहित हा कातळात उभा असणारा भैरोबाबा मला रिशवत देत होता आणि मी आंब्याची चव चाखत चाखत चाललो होतो. मस्त अशी प्रतिक्रिया दिली. पण पुढे काय मांडलंय माहिती नव्हत 

एक लक्षात आलं सुख भोगलं कि दुःख येते आणि दुःख भोगलं कि सुख. मी सध्या सुख चाखत होतो , दुःख येणार होत हे अटळ होत. चालणे मात्र कोणीच थांबवलं नव्हत. मध्ये सैराट सिनेमा मध्ये दाखवल्या सारखे झाड दिसले सुशांत आणि मॅडम दोघेही बोलले दीप्या जा झाडावर फोटो काढतो मी ऐटीत झाडावर गेलो पण उतरता कुठे येतंय झालो ना पंक्चर कस बस सुशांतचा आधार घेऊन उतरलो. पुढे सर बरेच पुढे गेले होते. मॅडम थकल्या होत्या हे सरांनी ओळखल काही अंतरावरच गड होता. सरांनी मॅडमला इथेच थांब अस सांगितलं पण अनोळखी जागा असल्याने बरोबरीला कोणी तरी हवं यासाठी सर म्हंटले कोण थांबतय. मी नाही म्हंटलो राहिला सुशांत त्याला थांबावच लागलं. सर आणि मी पुढे मार्गस्थ झालो पुढे पुढे अस वाटायला लागलं आयला उगाच आलो मी थांबलो असतो तर बर झालं असत पण सरांच्या पावलावर पाउल ठेवत अविरत चालत राहिलो .
 भैरवबाबा भसकन अंगावर आलाय अस वाटत होत खूप भीती वाटत होती पण सर बरोबर होते. मी पण पुरता थकलो होतो. गडाच्या अगदी पायथ्याला दोन गावकरी मुले शिकारीला टेहळणी साठी बसले होते अन्य गावकरी खाली होते आणि दोघे तिघे भाला,कोयता घेऊन जंगलात शिकारीसाठी गुसले होते. थोडा वेळ त्या मुलांजवळ आम्ही दोघे बसलो. गडाबाबतीत विचारपूस केली. त्या मुलांनी सांगितलं पहिलं अवघड आहे एक पायरी अस म्हंटल्यावर मी वर बघितलं. आता सरांना नाही पण म्हणता येत नव्हतं (नाईलाज होता)
सर म्हंटले पुढे तू चल मी एक एक पायरी चढत होतो आणि अचानक एक खांद्या एवढ अंतर असलेली पायरी लागली आणि खाली सटकला तर मोडतोड नक्कीच पण कधीच न बरी होणारी पण माझे शर्थीचे प्रयत्न चालू होतेच.पाठीमागून सर आले. मला क्रॉस करून पुढे जाऊन हँड ग्रीप दिली. पाय नुसते लटलट कापत होते.
" आता मात्र भैरवबाबा हसल्याचा आवाज मला येत होता. आणि म्हणत होता दिपकराव यालाच तर जीवन म्हणतात. तुम्ही येताच मी तुम्हाला गोड आंबा दिला म्हणजे सुख आणि आता जी कसरत करताय ना पाय लटलट कापतायत ना त्याला म्हणतात  दुःख " हे सर्व मनातल्या खेळाचे शब्द होते
थोडं पुढे नाही जात तर लगेच खालच्या पायरी पेक्षा मोठ अंतर असलेली पायरी ....पायरी कसली हात सुटला कि हाड वेचावी लागतील अशी भयानक जागा होती . मी पुढे जायच नाही असा निर्णय घेतला आणि सर पुढे गेले बराच वेळ झाला सर खाली येत का नाही. मनातच बोललो ...... चुकले कि काय कुठे देवा भैरवा दृष्टा काय रे चेष्टा करतो. मी खाली हळूहळू उतरत होतो.
वार इतकं होत कि छोटे छोटे दगड खाली पडले कि हवेत तरंगत खाली पडायचे. हे पाहून तर अजून पाय लटलट कापायचे. कसा बसा खाली आलो. थोड्याच वेळात सरांचा आवाज आला.

मन शांत झालं भैरवबाबा कडे पहिले त्याने डोळा मारल्याचा भास झाला आणि मी हि मिश्किलपणे गालातल्या गालात हसलो. संध्याकाळचे सहा वाजले होते. अंधार पडायच्या आत खाली जायचे होते दाट झाडी होती खाली सुशांत आणि मॅडम आमची वाट पाहत होते. आम्ही पुढे पुढे जात असताना अचानक मॅडम आवाज आणि इशारा करत होत्या .पुढे येऊ नका दरी आहे दरी ..........सुशांतने मला फोन केला आणि सूचना केली. everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे!   आम्ही तिरप्या वाटेने खाली उतरण्यासाठी निघालो. पुढे आम्ही चौघे गाड्या जिथे लावल्या होत्या तिथे आलो. सरांनी त्या आजोबांना पैसे दिले. पण जगातला सर्वात सुखी माणूस मला त्या आजोबांमध्ये दिसला. पैशाचा काडीमात्र लोभ नाही. आजोबांचा निरोप घेतला
त्या आधी मी परत एकदा भैरवबाबाकडे पहिले तर ......
डोळ्यासमोर खड्यापारधी सारख रूप दिसलं. माळशेजच्या डोंगररांगांचा राखवालदारच दिसला.
पाहून हसलो आणि घरच्या वाटेन मार्गस्थ झालो.
अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का ?

 (अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!"

तुमचा
 दिप्या 

Wednesday, 31 May 2017

जगाच्या पोशिंद्याचे संपाचे एल्गार

"शेतकरी संपावर जात आहे व त्यांचा संप फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला आता स्वतःसाठी पिकवायचे नाही व बाजारात विकण्यासाठीही पिकवायचे नाही. तो थकलाय. त्यांच्या संपास पाठिंबा देणे हीच देशसेवा आहे."

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाने चिंतेचे टोक गाठले आहे व राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. न्यायमूर्ती रानडे एकदा म्हणाले, ‘‘तो पाहा सुखी, समृद्ध हिंदुस्थान मला दिसत आहे. ही देवांची आवडती भूमी स्वतंत्र आणि मुक्त अशी मला दिसत आहे. रोग नाही, दुष्काळ नाही, अज्ञान नाही, रूढी नाही, भांडण नाही, तंटा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. साऱ्या जाती, सारे धर्म परस्परांशी गुण्यागोविंदाने वागत आहेत. सर्वांना अन्न आहे, वस्त्र आहे, राहायला घरदार आहे असा तो हिंदुस्थान मला दिसत आहे!’’ न्या. रानडे यांच्या विशाल दृष्टीने पाहिलेले हे स्वप्नच होते व स्वराज्याचा लढा त्यासाठीच उभा राहिला. श्रमाचे मोल प्रत्येकाला मिळेल हीच भावना होती, पण न्या. रानडे यांच्या स्वप्नातील ही देवांची आवडती भूमी आज यमाची भूमी झाली आहे. यम खांद्यावर गदा आणि हातात फासाचा दोर घेऊन शेतकऱ्यांच्या दारातच उभा आहे. त्या यमाशी लढण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांशीच लढताना दिसत आहे!

हमी द्याच!

शेतकऱ्यांना आज संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे व त्यासाठी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीस सरळ पाठिंबा दिला. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘आत्मक्लेश’ यात्रा पायीच सुरू केली. त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद राज्यात मिळत आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाचे सदाभाऊ खोत हे मंत्रिमंडळात आहेत व शेतकऱ्यांच्या क्लेशयात्रेत सहभागी होण्याचे त्यांनी नाकारले. सत्ता भल्याभल्यांची मती गुंग करते ती अशी. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ज्यांनी काँग्रेसविरोधात रान उठवले ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांनी याच प्रश्नावर काँग्रेसची सालपटं काढली ते सदाभाऊ खोत मंत्री, पण क्लेश करून व आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे ते म्हणतात. हा शेतकऱ्यांचा पराभव. याच आंदोलनांतून व क्लेशातून सत्ता मिळवली हे विसरणारेच शेतकऱ्यांचे शत्रू झाले आहेत. ज्या प्रश्नांवर मते मागितली त्या प्रश्नांशी प्रतारणा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असून देशात तो सध्या जोरात सुरू आहे. कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय याची लेखी हमी सरकारने विरोधी पक्षाकडे मागितली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी विधानसभेत सांगितले, ‘‘कर्जमाफीची घोषणा करा, आम्ही लेखी हमी द्यायला तयार आहोत!’’ शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी व शेतकऱ्यांच्या संघटनांनी अशी लेखी हमी देऊन सरकारची कोंडी करायला हवी.

तोट्याचे अर्थशास्त्र

शेतीचे अर्थशास्त्र आता फायद्याचे राहिलेले नाही. चांगले पीक येते तेव्हा शेतमालास चांगला भाव मिळत नाही. कांद्यापासून तूरडाळीपर्यंत सध्या हेच सुरू आहे. कांदा पिकाला पाणी देणे बंद केल्याने कांद्याची पात सुकून गेली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुन्हा कांद्याला भाव नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कांदा शेतातच जाळून शेतकऱ्यांनी आत्मक्लेश करून घेतला. कांद्याचा भाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. फायदा नाहीच, पण उत्पादन खर्च मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. एका तरुण शेतकऱ्याने सात एकरांवर लाल कांद्याची लागवड केली. या सात एकरांचे अर्थशास्त्र सगळ्यांनीच समजून घेतले पाहिजे. लागवड, मशागत, खते यासाठी घरातील महिला, लहान मुलांच्या अंगावरील सोन्याचे किडुकमिडुक विकून आलेले पन्नास हजार रुपये खर्च केले. चाळीस हजारांचे दागिने गहान ठेवले. पुन्हा बजाज फायनान्सकडूनही दीड लाख रुपयांचे कर्ज काढून कांदा पिकावर खर्च केले. चांगले उत्पादन काढून दोन पैसे गाठीशी येतील, या अपेक्षेने हे कुटुंब शेतात राबले. मात्र चांगले पीक येऊनही पदरात काहीच पडले नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढला. नोटाबंदीचे कारण देऊन कांदा विकूनही हाती नगद मिळत नाही. सरकार काही करीत नाही म्हणून त्या संतापाच्या भरात त्याने पाच एकरांतील उभ्या कांद्याला आग लावली. सहाशे क्विंटल कांदा नष्ट केला. हा सुद्धा आत्मक्लेश आहे.

भाव का नाही ?

पन्नास वर्षांत शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडलाच नाही म्हणून शेतकऱ्यांनी मोदी यांचे सरकार निवडून दिले आहे. सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असे वचन श्री. मोदी यांनी दिले होते. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतमालास मिळावा ही महत्त्वाची शिफारस स्वामिनाथन आयोगाने केली म्हणजे १०० रुपये उत्पादन खर्च झाला असेल तर शेतकऱ्यास दीडशे रुपये मिळावेत हा साधा मार्ग त्यांनी सांगितला, पण शेतकऱ्यास हमीभाव द्यायला कोणतेही सरकार तयार नाही. गेल्या ४० वर्षात महागाई वाढली. शेती पिकांच्या उत्पादन खर्चात तब्बल ३० पटीने वाढ झाली आहे, पण शेतीमालास बाजारभाव मात्र तोच म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचाच मिळत आहे. शेतकरी ऐंशीच्या दशकात डाळिंब शेतीकडे वळला. तेव्हा किलोचा भाव तीन ते चार रुपये. एकरी उत्पादन खर्च दहा हजार रुपये आणि मजुरीचा रोजचा दर तीन रुपये होता. आजचे चित्र असे आहे की, उत्पादन खर्च दोन लाख रुपये, मजुरी तीनशे ते पाचशे रुपये रोज. मात्र डाळिंबाला तोच भाव किमान पाच व सरासरी दहा रुपये किलो असा मिळतोय. द्राक्षाची परिस्थितीही वेगळी नाही. १९७५ साली द्राक्ष बागेचा एकरी खर्च १५ हजार व किलोचा भाव चार ते पाच रुपये होता. आज एकरी उत्पादन खर्च अडीच लाख रुपये आणि किलोचा भाव पाच रुपये इतकाच आहे. ज्यांना हे कोसळलेले अर्थशास्त्र समजले त्यांना शेतकरी आत्महत्या का करतोय ते लगेच समजेल!

‘‘शेतकरी जगला तर देश जगला,’’ अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली होती व शंभर वर्षांनंतरही आपण त्याच घोषणेच्या चिपळ्या वाजवीत आहोत. शेतकऱ्यांनी अनेकदा बंड केले ते चिरडून टाकले. कर्ज फेडण्याची ऐपत नसल्याने वसुलीस गेलेल्या सावकारांविरुद्ध बंड करून त्यांची नाके कापली गेली. हे ब्रिटिश काळात घडले. काही दिवसांपूर्वी  शेतकऱ्यांनी दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर स्वतःची विष्ठा खाऊन आंदोलन केले. हे ब्रिटिश राजवटीपेक्षा भयंकर आहे. हिंदुस्थान अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. कोणत्याही संकटाना तोंड देण्याची लहान शेतकऱ्यांची ताकद वाढविल्याशिवाय सुधारणा होणार नाही. छोटा शेतकरी देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घरावर सोन्याची कौले नकोत तर त्यांच्या मालास हमीभाव हवा. शेतकरी हा एकसंध नव्हता, आजही नाही. शेतकरी आज संपावर निघाला आहे व त्यांच्या संपास आज अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या संपास शहरातील लोकांनी पाठिंबा दिल्याशिवाय त्यांच्या चुली पुन्हा पेटणार नाहीत. आमदार, खासदारांना पेन्शन मिळू शकते मग शेतकऱ्याला कर्जमाफी का नाही मिळू शकत. ‘किसान’ मरतो तेव्हा त्यास बेदखल केले जाते. हे थांबणारे राज्य कधी येईल काय?
         
               सांगा ......माझ्या बापानं नाही पेरला पेरा 
                              तर तुम्ही काय खाल धत्तूरा 
  #तुमचा शेतकरी पुत्र
   दीपक कठाळे 

Friday, 12 May 2017

बेताल बहु बोलती…


                       भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर अत्यंत असंवेदनशील आणि अवहेलनात्मक भाषेत केलेले विधान अवघ्या महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे. एका शेतकऱ्याच्या घराण्यात जन्म घेतलेले दानवे यांच्याकडून असल्या विधानाची अपेक्षाही करवत नाही. आता दानवे यांनी मानभावीपणा दाखवत या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी `बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ हेच खरे. `एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात…` असे विधान दानवे यांनी, जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. हे वक्तव्य करताना रावसाहेब दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. महाराष्ट्रात सध्या तूर खरेदीच्या प्रश्नावरून हवा तापलेली आहे.
यंदा राज्यात तूर उत्पादन विक्रमी झाले आहे, त्यातच नाफेडने तुरीच्या खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने या केंद्रांबाहेर शेतकऱ्याची तूर पडून आहे. जी तूर खरेदी वेळेत झाली तीही शेतकऱ्याकडून न होता व्यापाऱ्यांंकडून झाली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश भागातील तूर उत्पादक शेतकऱ्याची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहिर अशी झाली आहे. यातून मार्ग काढण्याऐवजी शेतकऱ्यांना क्लेश होईल अशा भाषेत त्यांची संभावना दानवे यांनी केल्यामुळे सरकारी पक्ष शेतकऱ्याविषयी किती सहानुभूती बाळगून आहे, हे स्पष्ट होते. `कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा’, असा `सल्ला’ही रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांना दिला आहे. अर्थात, भारतातील राजकीय परंपरेनुसार केलेल्या विधानापासून माघार घेणारे दानवे हे काही पहिले नेते नाहीत. शेतकर्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. शेतकर्यांचे दुःख मला माहिती आहे. त्यामुळे मी कधीही अपशब्द वापरू शकत नाही, असे दानवे म्हणाले. जालना येथील बैठकीत एका कार्यकर्त्याने तुरीचा प्रश्न उपस्थित केला होता. `माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. शेतकर्यांची बाजू घेत मी 35 वर्षे राजकारणात आहे. माझ्या आणि कार्यकर्त्यांमधील संवादाला शेतकर्यांशी जोडू नये. त्यानंतरही शेतकर्यांची मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, अशा शब्दांत दानवेंनी खेद व्यक्त केला. दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी आणि विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही टीका केली होती. दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. सोशल मीडियावरही दानवेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात होता. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्याच फायद्याचेच आहे, असे सांगत दानवेंना खोचक टोला लगावला. विरोधकांनी दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करू नये. कारण दानवेंच्या अशाप्रकारच्या वक्तव्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असे पवार म्हणाले.
तर धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला माफ करता येणार नाही, आम्ही याचा निषेध करणार असून राज्यात त्यांचे फिरणेही मुश्कील करु असा इशाराच दिला आहे. दानवेंचे वक्तव्य राज्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. या वक्तव्याने सत्तारुढ भाजप नेत्यांच्या मनातील शेतकर्यांबद्दलची खदखद बाहेर आली असे मुंडे म्हणाले. राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. तूर उत्पादक शेतकरीही दर कोसळल्याने त्रस्त झाले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला असताना दानवेंनी बेजबादार, अपमानास्पद विधान करुन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विरोधी पक्ष तसेच शेतकर्यांच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला, तो स्वाभाविकच म्हणायला हवा. बेतालपणे बोलण्याची दानवे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ नसतानाही दुष्काळाचे खोटे चित्र उभे करुन शेतकर्यांना मदत दिल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. शेतकर्यांना कर्जमुक्ती हवी असेल
तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशी हमी द्यावी असे विधान केल्याने रावसाहेब दानवेंवर यापूर्वी खरमरीत टीका झाली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बोलताना दानवे यांनी, `तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे दय़ा, मी नोटा बदलून देतो’ असे विधान केले होते. पैठणमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी `मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री लक्ष्मी घरी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा’, असे वादग्रस्त विधान केले होते. शेतकर्यांबद्दल अशाप्रकारे विधाने करून राज्यकर्त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने एकंदरीतच सरकार या प्रश्नाबद्दल किती गंभीर आहे याचाच पुरावा दिला आहे. शेतकर्यांची कर्जमाफी हा मुद्दा विरोधकांनी हाती घेतला असताना सत्ताधारी पक्षातर्फे त्याला योग्यप्रकारे प्रतिवाद करण्याऐवजी दानवेंसारखे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेतेच अशी चक्रमसारखी बडबड करीत असतील तर राज्यातील शेतकर्यांचे भवितव्य काय असू शकेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज उरणार नाही.

तुमचा 
दीपक  कठाळे 

सरकारने दिली शेतकऱ्याच्या हातावर तुरी


कसा वाचणार शेतकरी? कशा थांबणार आत्महत्या? कसा उभा राहील कोसळून पडलेला शेतकरी? व्यापारी लुबाडतात आणि सरकार नागवतं. या वर्षी तर शेतक-यांना हात देऊन उभं करायचं तर सोडाच, परंतु सरकारने शेतक-यांची थेट फसवणूक केली आहे.
बाजारात तुरीचे भाव वाढले तेव्हा शेतक-यांना तूर लागवडीचे आवाहन केले.
तुमची तूर बाजारात आल्यानंतर किमान ९५ रुपये किलोने खरेदी करण्याची हमी दिली. परंतु सरकारने केवळ दोन हजार क्विंटलच्या खरेदीनंतर खरेदी केंद्रं बंद केली आहेत. जोपर्यंत तुरीचे पीक शेतात होते तोपर्यंत तुरीचे भाव दोनशे रुपये किलोवर गेले होते. आता शेतक-यांच्या घरात तूर आली तर हे भाव पुन्हा साडेसहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शासनाने ९५ रुपये किलो दर देतो म्हणून शेतक-यांनी तूर पेरली. आता तो भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या शेतक-याने आत्महत्या केली, तर त्याला सरकारशिवाय कोण जबाबदार असेल ?
तूरडाळीचे भाव सात-आठ महिन्यांपूर्वी २०० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचले आणि आमचे शहरी माणसं अस्वस्थ झाली. महागाई भडकल्याचे गळे काढले गेले. तूरडाळीचे भाव सरकारने कमी करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. मग सरकारही लगेच तत्पर झाले. धडाधड तूरडाळींची साठेबाजी केलेल्या गोदामांवर धाडी टाकण्यात आल्या. लाखो क्विंटल डाळी जप्त करण्यात आल्या. आपल्या तत्परतेची माहिती सरकार रोज प्रसारमाध्यमांना देऊ लागले. मात्र या जप्त केलेल्या डाळींचे काय झाले? याचे उत्तर शेवटपर्यंत सामान्य माणसाला कळले नाही. साधारण जून महिन्यांपासून तूरडाळीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबपर्यंत त्यांचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचले. ऑक्टोबरमध्ये म्हणजे दसरा-दिवाळीच्या तोंडावर एकंदरच डाळींच्या भाववाढीचा उद्रेक झाला. राजकीय पक्षांनी मोर्चे काढले, सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. मग सरकारने डाळीच्या गोदामावर धाडी टाकायला सुरुवात केली.
डाळीचे भाव वाढल्यामुळे सर्वानी मोठा कांगावा केला. पण हे भाव का वाढले ? या वाढलेल्या भावाचा शेतक-यांना लाभ झाला का ? तर अजितबात नाही. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान शेतक-यांची नवी तूर बाजारात आली तेव्हा सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे ६० ते ६५ रुपये किलो इतकाच भाव होता. (आजही तो त्याच बिंदूवर येऊन थांबला आहे.) पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा तगादा असल्याने जसा शेतातला माल घरात येतो, तसा शेतकरी आपला माल बाजारात आणतो. शेतक-यांची ही निकड व्यापा-यांना माहीत असल्याने ज्या वेळी शेतक-यांचा ताजा माल बाजारात येतो, नेमके त्याच वेळी व्यापारी संगनमताने भाव पाडतात. त्यामुळे आहे त्या भावात शेतक-यांनी तुरी व्यापा-यांच्या घशात घातल्या. व्यापा-यांनी या तुरीची साठेबाजी केली. खरे तर जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करण्यावर बंदी घातली पाहिजे. किमान ज्या वेळी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी तर ती कारवाई केलीच पाहिजे. राज्य सरकारला त्याची जाणीव होत नसेल तर केंद्र सरकारकडून तशा सूचना दिल्या जातात.
गेल्या वर्षी साधारण जून महिन्याच्या सुमारास तूरडाळीची भाववाढ होण्याचे संकेत मिळताच केंद्र सरकारकडून राज्य सरकारला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारकडून साठेबाजीवर नियंत्रण आणण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली. मात्र त्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. परिणामी गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या तोंडावरच डाळींचे बाजारभाव आवाक्याबाहेर गेले. ‘अच्छे दिन आयेंगे। महंगाई कम करेंगे’ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात यापूर्वी कधीही झाली नाही इतकी भाववाढ झाली. त्यामुळे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर सरकार जागे झाले आणि धडाधड एका रात्रीत धाडी टाकून लाखो टन डाळी जप्त केल्या.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि धाडी टाकून जप्त केलेली डाळ दिवाळीच्या पूर्वी स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा केली. मात्र दिवाळीच काय त्यानंतर पुढे दोन महिने डाळी स्वस्त झाल्या नाहीत. जप्त केलेली डाळ कशी बाजारात आणायची यावरच खल होत राहिला. सुरुवातीला सरकार म्हणाले, ही डाळ सरकार बाजारात आणील. नंतर म्हणाले, व्यापा-यांकडून बॉण्ड घेऊन व्यापा-यांना डाळ स्वस्त दरात विकण्यासाठी राजी केले जाईल. या घोळात दोन महिने निघून गेले. दरम्यान डाळीचा बाजारातील तुटवडा कमी करण्यासाठी परदेशातून डाळ आयात करण्यात आली. ती आयात केलेली डाळही दोन महिने बंदरात पडून होती.
तूरडाळीवरून राज्यात एकच चर्चा सुरू झाली. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत डाळीच्या भाववाढीवर करण्यात येणारे उपाय सांगितले. नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलने तुरीच्या डाळीचे दर कमी करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डाळ आयात करण्यात येत आहे. जी डाळ जप्त करण्यात आली आहे ती स्वस्त दरात बाजारात आणण्यात येईल, असे सांगितले. तर त्यांच्या भाषेत दीर्घकालीन योजना म्हणून डाळीचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी तूर लागडीला प्रोत्साहन देण्यात येईल, त्यांना चांगले बियाणे देण्यात येईल आणि तुरीला शाश्वत भाव देण्याची हमी देण्यात येईल, असे सांगून तूर ९५ रुपये किलोने खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तूरडाळीच्या भावावरून राज्यात रण पेटले होते, तेव्हा शेतकरी मात्र खूश होता. या वर्षी आपल्या तुरीला चांगला भाव मिळेल, असा विचार तो करीत होता. १२० ते १३० रुपये प्रति किलो भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी तितका नाही मिळाला तरी ९५ रुपये किलो भावाने तूर खरेदी करण्याची सरकारने हमी दिलेली आहे, हा मोठा दिलासा शेतक-यांना होता. परंतु आज काय घडले आहे? शेतक-यांच्या शेतातील तुरीचे पीक घरात आले आणि घरातून बाजारात गेले तेव्हा भाव धाडकन कोसळले. आज तुरीचे भाव हे ६० ते ६५ रुपये किलो आहेत. ९५ रुपये किलो खरेदी करण्याचे सरकारने आश्वासन दिले खरे, पण यवतमाळ जिल्ह्यात फक्त दोन खरेदी केंद्रं सुरू केली. केवळ दोन हजार क्विंटल तूर खरेदी केल्यानंतर ती खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली आहेत. आता शेतक-यांना आपली तूर ही ६० ते ६५ रुपये किलोने व्यापा-यांच्या घशात घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही शेतक-यांची केलेली घोर फसवणूक आहे.
गेल्या वर्षी शेतक-याची तूर बाजारात आली तेव्हा ६० किलोचा भाव. शेतक-यांकडील तूर संपताच २०० रुपये किलोचा भाव आणि आता पुन्हा ६५ रुपये भाव, हा योगायोग आहे काय? तर तसे म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी केंद्राने सूचना देऊनही साठेबाजीवर नियंत्रण आणले नाही, याचा अर्थ काही व्यापा-यांना साठेबाजी करता यावी यासाठीच त्याकडे दुर्लक्ष केले. या मागे केवळ व्यापा-यांचा लाभ व्हावा, हाच उद्देश दिसतो. या देशातील व्यापा-यांनी, उद्योपतींनी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार यावे म्हणून जी मदत केली, त्यासाठीच व्यापारीधार्जिणी धोरणे आखली जात आहेत, असा जो आरोप विरोधकांकडून केला जात आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. आता सरकारने किमान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९५ रुपये किलो दराने तूर खरेदी करावी. सरकार ते करीत नसेल तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला ते करण्यास भाग पाडावे, अन्यथा शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला सर्वस्वी सरकारने केलेली फसवणूक कारणीभूत असेल.
 उद्याच्या स्वास्थ्यासाठी आजच कामाला लागू या
  तुमचा- दीपक कठाळे 

Saturday, 29 April 2017

"गोष्ट छोटी डोंगराएवढी"

नमस्कार मित्र,मैत्रिणींनो 
खूप दिवसाच्या लेखन विश्रांंती नंतर आपल्या बरोबर सवांद साधतोय. दोन दिवसापूर्वी Z टॉकीज या मराठी चित्रपट वाहिनीवर जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट छोटी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात बाहुबली 2 चे वारे वाहत आहे. आणि सगळे रेकॉर्ड हा बाहुबली 2 तोडणार अस आधीच सांगितलं जातंय असो चांगली गोष्ट आहे. पण असे शेतकऱ्याच्या गळ्याला जिवंतपणी लागलेला फास कोण तोडेल का ? का त्याला अस्मानी, सुलतानी संघर्षच करावा लागेल. माहित नाही !

तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातून शेतकी अभ्यासक्रम शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणाऱ्या अडचणी, सरकारी खात्यातला भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलाय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना पण काय आहे ना दाखवणार्यांला पण वेळ नाही आणि पाहणाऱ्याला पण वेळच वेळ नाही. बर गावातला त्याचा जिवलग मित्र तो ही शेतकरीच असतो .
आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या लग्नावरून (इथे काही दिवसांपूर्वी शितल नावाच्या मुलीने आत्महत्या केली तिचे पत्र आठवते.)

"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिस खात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??

आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का ? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं ? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकतो ? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का ? सरकार....सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना एक रात्रच काय अशा अनेक रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे संपले आहे. आश्वासन देऊन देऊन फेस आलाय या पांढऱ्या घोड्यांच्या पण काय आहे ना एक निवडणूक झाली कि दुसरी आली. मग त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकऱ्याचं गार्हाणं सारखं आठवतयं....

"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "

तुमचा 
दीपक कठाळे 

Wednesday, 8 March 2017

महिला दिन का ? दीन


हल्ली जागतिक पातळीवर निरनिराळे दिवस साजरे केले जातात. या सर्व दिवसांना वेगवेगळे विषय नेमून दिलेले आहेत. बालक दिनापासून ते ज्येष्ठ नागरिक दिनापर्यंत तसेच आई वडिलांच्या दिनापासून ते डॉक्टर नर्स दिनापर्यंत सारेच दिवस आपण साजरे करत असतो. सध्या आपल्या देशात महिला वर्गाला सोनियाचे दिवस येत आहेत. त्यामुळेच जागतिक महिला दिन आपण मोठ्या "ममतेने" साजरा करत आहोत. शीला दिक्षीतांपासून मायावतीपर्यंत व सुषमा स्वराजपासून
 माननीय प्रतिभाताईंपर्यंत महिलांची कर्तबगारी राजकारणासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातही नजरेत भरत आहेत. स्थानिक राजकारणात तर आपल्याकडे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने हा महिलावर्ग प्रकाशात येत आहे. महाराष्ट्रात महिला बचत गटांची मोठी साखळी उभी रहात असून ग्रामसुधार योजनेपासून ते स्वावलंबी बनण्यापर्यंत जिद्दीने स्त्रीवर्ग पुढे येत आहे. या स्त्रीयांच्या जीवनात नुकते कुठे प्रकाशाची एक ज्योत उजळते आहे. पहाट उगवलेली आहे आणि महिलांच्या कर्तबगारीचा सूर्य अजूनही डोंगराआडून बाहेर पडायचा आहे. पण महिलांच्या आंधारमय युगात हळूहळू झुंजूमुंजू होत आहे ही एक चांगली घटना आहे. सावकारी बंद करण्यापासून ते गावात दारुची बाटली आडवी करुन आपला संसार सुखाचा करण्यापर्यंत महिलांची आघाडी काम करत आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीच्या कामात आजही महिलांचे कार्य मोठे आहे. उत्तरेत चहाच्या मळ्यापासून ते दक्षिणेत रबराच्या शेतीपर्यंत तर महाराष्ट्रात फळे व कापूस वेचण्यापासून ते ऊसतोडीपर्यंत स्त्रीवर्गाचे कार्य विशेष आहे. मुलाबाळांना सांभाळत घरकाम करत या स्त्रीया शेतावरही राबत आहेत. शहरी व नागरी भागात शिकविण्याच्या शाळेपासून ते संशोधन केंद्रातील प्रयोगशाळेपर्यंत या माता भगिनी काम करताना आढळतात. बॅंकींग व कॉर्पोरेट क्षेत्रातही काही कर्तबगार महिला कार्यरत आहेत. पोलिसदलापासून ते सैन्य दलापर्यंत स्त्रीवर्गाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. म्हणजेच सध्या असे कोणतेच क्षेत्र बाकी राहिलेले नाही की जेथे या स्त्रीया नाहीत. लोकसंख्येत निम्मा वाटा स्त्रीयांचा आहे आणि स्त्री-पुरुष सर्वांनाच समान हक्क घटनेने दिल्यामुळे स्त्रीयांची प्रगती होत आहे. हे सारे जरी खरे असले तरी देवीस्वरुप म्हणून भारतीय समाज ज्यांची पूजा करतो त्या सर्वच माता भगिनींचे आयुष्य सुखाचे आहे असे नव्हे. कुटूंबात आणि समाजात जेवढा मान सन्मान मिळावयास हवा तेवढे भाग्यही त्यांच्या नशिबी नाही. पुरुषप्रधान व्यवस्था राबविणारा भारतीय समाज आजही आपल्या परंपरागत मानसिकतेतून बाहेर येण्यास तयार नाही. जन्मापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत तिला समाजाने रुढी व परंपरेच्या बेड्यात अडकवून ठेवलेले आहे. आजही समाजात स्त्री सुरक्षित राहिलेली नाही. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल विविध कायदे करण्यात आले. सती बंदीपासून ते अगदी शारदा कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा केला तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. आरुषी हत्या व भॅंवरीदेवी हत्या या अगदी आताच्या घटना आहेत. जेसिका लाल केस व तंदूरी केस आता जनता विसरत चाललेली आहे.
भारतातील बर्‍याच शहरात आजही स्त्री रात्री निर्धोकपणे फिरू शकत नाही. ज्यांनी कायदा राबवायचा असे नेते व पोलिस यंत्रणाच महिलांवर अत्याचार करण्यास धजावतात याचा अर्थ वेगळा काय असणार? स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला पण तरीही हा वर्ग अजूनही अबलांचा वर्ग म्हणूनच ओळखला जातो. खोट्या प्रतिष्ठेसाठी जन्मदाता पिताही आपल्या लेकीचा गळा घोटतो हा अहंकार कोणता? कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होणे आपल्या देशात कठीण होत चाललेले आहे. सार्‍या देशातच स्त्रीयांचे लोकसंख्येतील प्रमाण वेगाने घसरत चाललेले आहे. स्त्रीभ्रूण हत्या हा मोठा प्रश्न देशापुढे उभा आहे. त्याचबरोबर महिलांवरील वाढते अत्याचार आजही थांबलेले नाहीत. एकूण होणार्‍या आत्महत्यांमध्ये महिलांच्या आत्महत्या संख्येने जास्त आहेत. घरच्या लोकांचा त्रास सहन न झाल्याने ब-याचजणी आपले जीवन आपल्याच हाताने संपवतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्रास सहन करीत बर्‍याच महिला केवळ संसार आणि मुलाबाळांकडे बघून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत. दररोजचे वर्तमानपत्र उघडले तरी आपल्याच राज्यातील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपले राज्य सर्वात प्रगत आहे का संशय येतो. संपूर्ण महिला वर्गाला समाजात सन्मानाने जगता येईल व सारे हक्क न मागता मिळतील असा सुदिन केंव्हा उजाडेल हे आजही सांगता येत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी वैगेरे लिहायला ऐकायला बरे वाटते पण प्रत्यक्षात काय आहे? इतर दिवसांसारखा जागतिक महिला दिन फक्त उपचार न राहो.

#तुमचा 
दिपक

Thursday, 9 February 2017

टणाटण व्हॅलेंटाईन !



सणासुदीची जशी धामधुम सुरू होते तशी वेगवेगळ्या डेचीही धामधूम सुरू असते. डे म्हणजे मन्ना डे, शोभा डे, संडे, मंडे…असे डे नाहीत. तर फादर डे, मदर डे, यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे, ड्राय डे, व्हॅलेंटाइन डे या डे संदर्भात सांगतो आहे. महाराष्ट्र बंद, भारत बंद हे दिवसही आपल्यासाठी डे च असतात, हा भाग निराळा. असो! यातले बरेचसे डे आपण साजरे करतो. म्हणजे, त्या दिवसापुरतं उरकतो. कधी कधी प्रश्न पडतो, की हे डे प्रकरण नसतं तर काय बिघडलं असतं का? तर आपण आपल्या वडिलांवर-आईवर प्रेम केलं नसतं का, त्यांनीही मुलांवर प्रेम केलं नसतं का, प्रेयसीला छानपैकी भेटवस्तू दिलीच नसती का? असं समजू यातले काही डे व्यवहार्य आहेत. यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे या डेमधून काहीतरी संदेश मिळतो. यंग सिनियर्स अर्थात ज्येष्ठ नगरिकांविषयी यापूर्वी समाजात फार जागृती नव्हती. निवृत्त झालेत, वय झालं आता म्हातार्‍याचं… या शब्दांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बंदिस्त केलं होतं. या वर्गाच्याही काही समस्या असतील, त्यांचीही काही सुख दुखः असतील याची कुणाला फार फिकीर असल्याचे दिसत नव्हते. पण यंग सिनियर्स डे मुळे या वर्गावर फोकस पडण्यास काहीतरी मदत होते. एक दिवस का होईना त्यांचं अंतरंग आपल्याला समजते. त्यातून पुढे काही संस्था, संघटना, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम राबवतात. कोपर्‍यात पडलेल्या थकलेल्या आई-वडिलांची काही मुलांना आठवण होऊन त्यांना आपली चूक कळून येते… पर्यावरण डेचंही काहीसं असंच असतं. पर्यावरणाच्या विषयी जागृती होण्यासाठी या दिवसाचा हातभार लागतो…असो. असे काही मोजके अपवाद सोडले तर हल्ली कोणताही दिवस डे म्हणून साजरा होऊ लागला आहे. व्हेलेंटाइन डे पासून डे प्रकरणं खर्‍या अर्थाने गाजू लागली. प्रेम करा, असा व्हेलेंटाईन संताने दिलेला संदेश भारतात पोहचला आणि प्रेम या शब्दाविषयी आपण जागृत झालो. आपल्या संतांनी तर अशा कितीतरी शिकवणी दिल्या. पण आपल्याला ज्ञानेश्वर , तुकाराम, नामदेव असे संत चालत नाही. त्यामुळे त्यांचा संदेश आपल्या मनाला भिडत नाही. व्हॅलेंटाईन सारखं भारदस्त नाव असलं की आपल्याला जरा बरं वाटतं… डेचं हे फॅड प्रामुख्याने पाश्‍चात्य देशांतून आपल्या इकडे आलंय. यापैकी बर्‍याच डे च्यापाठी मार्केटिंग फंडा असल्याचं स्पष्ट झालंय. व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठा अशाच फुलून गेल्या आहेत. व्हॅलेंटाईनने जरी निमित्त पुरवले असले आणि या हृदयीचे त्या हृदयी पोचवण्यासाठी आजचा दिवस असला, तरी प्रेमाला मुहूर्त लागत नाही. बालपण संपून तारुण्याची चाहूल लागते, तेव्हा हा गुलाबी रंग मनाच्या क्षितिजावर पसरू लागतो आणि सांजवेळ येऊन सावल्या लांबू लागल्या, तरी त्याची लाली कायम राहते. भेट, नजरानजर, होकार, नकार, वेदना, विरह, त्याग, राग, लोभ, मत्सर या सर्व भावनांचा एकत्रित आविष्कार म्हणजे प्रेम. त्यातही विरह म्हणजे तर प्रेमभावनेचा कळसच. आपल्या प्रियकराची वाट पाहत वाटेवरच कुठेतरी पडून असलेली एक प्रेयसी. तिने बहुधा प्राण सोडले असावेत असे समजून एक कावळा तिच्या अंगावर झेपावतो, तेव्हा ती त्याला म्हणते, कागा सब तन खाईयो, मोरा चुन चुन खाईयो मांसरे, दो नैना मत खईयो, उन्हे पिया मिलन की आस रे…म्हणजे माझ्या शरीराचे वाट्टेल तेवढे लचके तोड; मात्र डोळ्यांवर चोच नको मारूस; कारण त्यांना प्रतिक्षा आहे प्रियकराची. असा ग्रेट विरह. तर दुसर्‍या बाजूला निराशाही तेवढीच सकस. प्रेयसीचे आणखी कुणाशी तरी लग्न झाल्यावर, तो काय म्हणतो? दारावरून माझ्या तिची वरात गेली, मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली, आता कशास तिची पारायणे करू मी, माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली. या दिवसांत कॉलेजा-कॉलेजात गुलाब फुलांच्या देवाण-घेवाणीचे उत्सव असतात. कोण कुणाला फुल देतो, कोण कुणाचे फुल स्वीकारतो, यावर पैजा लागतात. परंतु फुल स्वीकारले म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट केली असे नव्हे. एकमेकांना पारखून, एकमेकांना ओळखून मगच फायनल निर्णय घेण्याएवढी आमची पिढी शहाणी आणि व्यवहारी झाली आहे. कोवळ्या वयात झालेला प्रेमाचा साक्षात्कार हा नजरेचा धोकाही असू शकतो ना? भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, नंतर मजला कळले, ती तशीच पाहते नेहमी. तर अशी फसगत झाली , तर करेक्शनला वाव असावा इतपत आमची पिढी प्रॅक्टिकली विचार करू लागली आहे. अर्थात तरीही आवश्यक तिथे हळवेपणा येतोच आणि तो आलाच पाहिजे; कारण तुम जो आये जिंदगी में बात बन गयी असं मुलायम आवाजात सांगावेसे वाटते, हीच तर या गुलाबी हृदयरोगाची खासीयत आहे. दिले नादॉं तुझे हुवा क्या है, आखीर इस दर्द की दवा क्या है असं उगाचच आडूनआडून विचारण्याऐवजी थेट, तुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना, असं सांगण्याचे हे दिवस आहेत. व्हॅलेंटाईनचा दिवस असो अथवा नसो !समुद्राच्या साक्षीनं, झाडांच्या आडोशानं रंगीबेरंगी थवेच्या थवे प्रेमकुजन करीत असतात. कटाक्ष, इशारे, सांकेतिक भाषेतील निरोप हे तर सगळीकडेच सुरू असतात. जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही ! तीचा लाजराबुजरा प्रणयही टिकून आहे आणि तुला चार कॉल केले मी, एकालाही उत्तर नाही, गेलास उडत, असा स्वचे भान आलेला नवा प्रणयही आहे. सगळे बदलत असते, तरी काहीही बदलत नसते. असो. या प्रकारचे दिवस साजरे करणं कदापि वाईट नाही. मात्र, त्याला चंगळवादाची जोड देऊ नका असेच माझ्या मित्र मैत्रिणींना  सांगणे आहे. आपली वरिष्ठ मंडळी आपल्या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही, तर त्या सेलिब्रेशनच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात आहे. तेव्हा नाती जपा, नाती जगा. नात्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प या व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने करा. इतकेच.

💐 तुमचा दिप्या 

Monday, 6 February 2017

लोणीकंद ते विद्यापीठ via..... डेक्कन

काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ?

हुह्ह! पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली. हा लेख म्हणजे काही पी.एम.टी.चा इतिहास नाही.माझ्या वाटेला पी.एम.टी.चे जे पराक्रम अनुभवले ते लिहीतोय. अजुनही माहित नाही की काय लेखात लिहिणार आणि काय उतरणार... संभालके लो भिडू लोग.

 नगररोड वरच्या कोरेगाव भिमा आणि वाघोलीच्या मधलं एक छोटसं गाव लोणीकंदला रहात आहे. गावची हवा बाकी काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असल्याने दररोज पुण्यात जायचा योग येत असे. अशा वेळी एकमेव साधन म्हणजे पी.एम.टी.,कॉपिटीशन ला फक्त प्रायव्हेट वाहतुक, डुगडुग(?!?) सारख्या ६(ऍक्चुअली १२) आसनी डुकरांचा खूप वावर आहे . पण पी.एम.टी. ने सगळे निमशहरी आणी खेडी-पाडी पुण्याला जोडण्याचं काम केलय. असो ..  सुट्ट्यांमधला प्रवास, नंतर  कॉलेजला जातानाचा रोजचाच पी.एम.टी.ने प्रवास. पी.एम.टी. प्रत्येक पुणेकराच्या मनात एक धृव स्थान तयार करून आहे. २०१६ या वर्षी .....अभिमानाची गोष्ट म्हणजे BRT मार्ग मी याची देही याची डोळा अनुभवलं आहे. पहिल्या बस मध्ये बसण्याचा मान भेटला.
पण काय हो ? कशी आहे पी.एम.टी. सेवा? तिचे कर्मचारी कसे वागतात प्रवाशांशी ? गाड्यांची कंडिशन कशी असते? तिला वेळेचं काही धरबंधन आहे का ?
सगळ्यांची उत्तरे नकारात्मक मिळतात. आहाहा काय ते पी.एम.टी वाहक आणि चालक.
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता खालील प्रमाणे :-
१) आपल्याला कमीत कमी शब्दात प्रवाशाचा कारण नसताना जास्तित जास्त अपमान करता आला पाहिजे.
२) आपल्या तोंडावर माईक टायसन सारखी मगृरी+घमेंड्+डमस्ती असली पाहिजे.
३) आपल्यात पैसे खाऊ गिरी कुटून कुटून भरलेली असली पाहिजे.
४) महिलां बद्दल थोडा सॉफ्टकॉर्नर असणे आवश्य. 
५) दृष्टीदोष असणे आवश्यक, तो बसस्टॉप १०० मिटर मागे किंवा पुढे आणि बहुतदा दिसलाच नाही पाहीजे या साठी.
६)आपण अशोक सराफ चे जबरदस्त फॅन असले पाहीजे, शर्टच्या पहिल्या ३ गुंड्या फक्त भरतकामाच्या आहेत हे कळल पाहीजे.
७) नवख्या पॅसेंजरचा पोपट करण्याची कुशलता हवी.

असे असतात पी.एम.टी. चालक :
चालक लोक हे सुरूवातीचं आणि शेवटचं स्टेशन फक्त मजबूरी म्हणून बस थांबवतात.फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर उपकार म्हणून थांबवतात (उरनारी माणसं गलका करतील, हे एक अजुन छोटंस कारण). बस मोकळी नेली तरी यांच्या तिर्थरूपांच काहीही जात नसतं. पी.एम.टी.चे ब्रेक्स एक तर अति टाईट नाही तर अति वाईट असावेत
 (अरे दृष्टीदोष असने ही पात्रता आहे नाही का ?) कारण क्वचितच बस योग्य ठिकाणी थांबते. आणि चालक प्रवाशांना कसं पळवलं याचा असुरी आनंद घेऊन मनात हसतो. हा, कोणी बाई कुठे दिसली की लग्गेच काच्च कन् बस तिच्या पायाजवळ थांबते बरका !! आज्जी-अजोबांना बस मधून उतरण्यास वेळ लागला म्हणून चालकाच्या बायकोची डिलेव्हरी हुकली अशा रागाने त्यांना २ शब्द बोलण्याचे अधिकार परमेश्वरानेच बहाल केले असावेत. कोणालाही बस मधे सहजा-सहजी प्रवेश मिळू नये, कारण यामुळे प्रवाशांना कोणतीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्याची जिद्द तयार होईल असा नेक हेतु या मागे असावा. 
चालक(पायलट) लोक पुण्याच्या अति खड्डेमुक्त रोड
(हवाईपट्टी)वरून ही बस (विमान) फार शिताफीने चालवतात(उडवतात). जबरा. काही चालक तर ईतक्या जोरात गाडी हाणतात जणू काही त्यांना 'जोराची' लागलेली आहे .. कधी एकदा थेवटचा स्टॉप येतो आणि कधी मी 'सुलभ' मोकळा होतो असे त्यांना होत असावे.
स्टेरिंग सोडून तंबाखु मळण्यात यांचा हात कोणीच चोळू शकत नाही. आणि कोण आडवा गेला की हे लोक उभी शिवी देऊन आई-बहिणींचे पावित्र्य काढतात. संबंध जगाला चालवण्याची ताकद आपल्यात आली असं हे लोक दाखवतात. बस मध्ये कोणी ओळखीचा चढला की त्याला खास चालक महाराजां शेजारी "इंजिनासनावर" बसण्याचा मान मिळतो, मग हे लोक वैश्विक विषयांवर भारी-भारी चर्चा करतात, ते ऐकण्याचं भाग्य फार थोर. चालकांना छोट्या गाड्यांना कट मारणे, दुचाकीवाल्यांना दाबून रोडखाली उतरवणे,एखाद्याच्या पार जवळ जाऊन बसं थांबवून त्याला चादरीसारखं पांढरं करणे या लिलांपासून एक स्वर्गीय आनंद मिळत असावा.
अशाच सौजन्यमुर्तीचा एक किस्सा :
एक इसम मुंबईहुन पुण्यात प्रथमच आलेले. भोसरी स्टॉपवर बस थांबलेली. चालक महाराज रेडीएटर मधे पाणी भरत होते. भोसरीची बहुतेक बस नाशिक फाट्याहूनच जाते.
(पिंपरी-चिंचवड कडे जाणार्‍या गाड्या सोडल्या तर). त्या इसमाने चालकाला विचारलं "बस नाशिक-फाट्याहुन जाईल काहो ? " , चालक (अत्यंत मंजूळ आवाजात्,ज्या आवाजात आपण कुत्र्याला हाकलतो) "नाय नाय .. बस आळे-फाट्यावरून जाते..." ... मी आणि आमचा ग्रुप मागेच बसलेलो .. "तिथे काय तुझी ........ व्याली आहे का रे लब्बाडा ? " --बाईच्या आवाजात अस्मादिक.आणि पुर्ण बस हास्यझटक्याने हालली. (ड्रायव्हरला थोडी अक्कल असल्याने बिचारा गुपचुप निघुन गेला. नडला असता तर पुर्ण भोसरी-मनपा त्याला नको नको ते ऐकावे लागले असते. आम्ही पी.एम.टी कर्मचार्‍यांविरूद्ध पुकारलेले हे बंड होते). त्याइसमाला सांगितलं बाबा बस तिकडूनच जाते बसा तुम्ही.. पण बाबांचा त्या चालकावर विश्वास, परत ४ लोकांना विचारून चौकशी करत होते. असो ..
असाच एक विनोद आठवला , एक माणूस रोज कामाला जाण्यासाठी सकाळी ९च्या बस ची वाट पाहत असे. एक बस चालक हटकुन थोडी पुढे बस थांबवत असे. आणि माणुस चढायच्या आत पुन्हा बस चालू करून जात असे. एकदा माणसाला बस पकडण्यात यश आलं. तो ड्रायव्हर ला म्हणाला , ही बस काय तुमची कोण नातेवाईक आहे का हो ? चालक - "नाही", माणूस- "मग लांबची नातेवाईक ? " चालक - "नाही", मग घरातली असेल, चालक म्हणाला नाही बुआ ...
माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "

असे असतात पी.एम.टी.चे वाहक :
वाहक हे चालकाला बरोबर कॉप्लिमेंट देत असतात. यांचा पॅसेंजर्स शी जास्त संबंध येतो. हे लोक तोंडात मध घेऊनच असतात. महिलां बरोबर कसे बोलावे यात एकदम निष्णात. आणि कोणी कॉलेजचा पोर्‍या दिसला रे की त्यांचा टोनच बदलतो. म्हणूनच आम्ही असे वाहक फाट्यावर मारलेत (लिट्रली). यांना पैशाचं फार मोल असतं. प्रवाशाने टिकीट मागणे म्हणजे आपला अपमान आहे आणि उरलेले सुट्टे मागणे म्हणजे या बाप्पूला त्याची २ एकर बागायतीच मागितली असं वाटतें.आपण पी.एम.टीचे मालक आणि प्रवाशी आपले कर्जदार आहेत अशी वाहकाची समजूत असते. कोणी दरवाज्यात उभा राहीला की यांना मिरची का लागते कळत नाही. स्वतः तिथेच उभे राहतील मग. सकाळी सकाळी १००-५००ची नोट काढणार्‍याची हे लोक भारी आरती करतात. प्रवाशाला बस मधे घेऊन आपण फार उपकार केलेत अशी यांची धारणा असते.कोणी यांना अमुक ठिकाण आले की सांगा हो असं विचारलं की हमखास माणूस २ स्टेशनं पुढे उतरून पुन्हा रिटर्न येतोच.बाकीच्या पैशांसाठी हे लोक प्रवाशाला शेवटच्या स्टॉप पर्यंत रखडवतात.बिचार्‍या प्रवाशाचा जिव हरणीच पाडस व्याघ्रिये धरीयेले सारख्या हरणी सारख होतं ...आणि शेवटी जर काही घोळ झाला तर हे लोक "बेनिफिट ऑफ डाऊट" स्वता:ला घेतात. प्रवाशी काहीही करो .. पैसे मिळत नाहीत. काही वाहक हे बाजीराव असतात. त्यांनी प्रवाशाकडे येण्या पेक्षा प्रवाशाने त्यांच्या कडे जाऊन टिकीटासाठी भिक मागावी असे त्यांना अपेक्षित असते. अशा कंडक्टर्स कडे आम्ही कधीही जात नाही. आपसूकमग रागारागाने मागे येऊन टिकीट देताना त्याचं तोंड बघताना आम्हाला पण एक असूरी आनंद होतो.चालक -पॅसेंजर्स चे भांडण पी.एम.टी. मधे फार कॉमन आहे. आणि हे झाले की सगळे लोक अगदी सापा-मुंगसाची लढाई बघावी तसे कौतुकाने बघतात. आणि मधुनच येणार्‍या कमेंट्स फारच भारी असतात.एकदा टिपीकल  बाईचं सुट्ट्या पैशावरून कंडक्टर शी वाजलं. कंडक्टर आपण पैसे दिलेत या भुमिकेवर (नेहमीप्रमाणे) ठाम होता. पण बाईच गरम रक्त होतं .. कडाक्कड भांडणाला सुरूवात झाली.. कंडक्टर नी अतिऍग्रेसिव्ह भुमिका घेत.."पैशे धिलेत आं.. बोलायच काम न्हाय सांगुन ठीवतो..च्यायला हेवडंच आसल तर सुट्ट काढायचं (आमच्या ग्रुप मधुन एक बायल्या आवाज ',काय काढायचं हो ?' )जास टरंमटरंम करायच काम नाय". बाई "काय पण हा निर्लज्जपणा ? ३ रुपयांसाठी कसे बोलताय ? तुम्हाला काही रित आहे की नाही...माझे ३ रुपये द्या नाही तर गाडी पोलिसस्टेशनात घ्या ". समोरचा जेवढं शुद्ध मराठी बोलेल त्याच्या १० पट वाहकाची मराठी खालवते. शेजारची बाई लगेच त्या बाईंच्या मदतीला धाऊन आली "होना! कित्ती निर्लज्ज असतात ही लोकं, मेले.." वाक्य तोडत वाहक " ए शेंगदाणे .. तुला काय करायचंय गं?" "तिला कुट घालायचाय"-पुन्हा ग्रुप मधुन एक बायल्या आवाज" भांडण पेटत पेटत जातं शेवटचं स्टॉप येतं .. बाई शेवटचे (बस मधले शेवटचे,ती दिवसभर याला ३ लाख शिव्याशाप देणार हे नक्की.) ऊद्धारोद्गार काढून उतरतात. वाहक अगदीच काही झालं नाही असं दाखवून बेल मारतो.

अशी असते पी.एम.टी बस :
आहाहा ! आमच्या सारखे काय वर्णन करणार या महान वस्तुचं ? पी.एम.टी.ला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला धुण्यात येतं (जाहिराती रंगवायच्या असल्यास तो अपवाद) ... ३६३ दिवस त्यावर हवा,पाणी, धुळ या गोष्टींचा परिणाम होऊन एक सुरक्षाकवच तयार झालेल असतं.एका धुळीने मळलेल्या बस वर कोणीतरी "आता तरी पुसा" अशी सुचना लिहीली होती. बर्‍याच सिटच्या मागे तुम्हाला पुण्याच्या मजनुने आपल्या लैलेच नाव लिहीलेलं आढळेल, किंवा आमका कसा *डवा किंवा *दर*द आहे. ई. गोपणीय माहीती पी.एम.टी. च्या सीट मागे मुद्रित असते. काही ठिकाणी सुचनांचे काने-मात्रे काढून त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याचा पुणेरीपण आपले पुणेरी पॅसेंजर्स करतात. तुम्ही कधी पी.एम.टी. च्या मागे बाईक चालवली आहे का हो ? कितीही स्वच्छ रोड असू देत,पी.एम.टी मागे एक धूराळा उडवत चालते, जेने करून मागच्यांना त्रास व्हावा. जेंम्स बॉंड चित्रपटांत असाच फंडा त्याच्या गाडीसाठी इंप्लिमेंट केला होता. पी.एम.टी. ची अजुन एक खासियत म्हणजे, अशी एकही पी.एम.टी नाही, जिला कुठूनतरी एखादी खोच लागलेली नाही (हे नजर लागू नये म्हणून असावे) तिच्या अनेक खिडक्यांपैकी किमान एक तरी खिडकी निखळलेली असतेच. जिच्या सर्व खिडक्या शाबूत ती पी.एम.टी. नव्हेच. पी.एम.टी.चा गियर दांडू पाहिलाय का आपण ? तो एक मिटर व्यासाच्या वर्तुळाकार परिघात घुमत असतो. पी.एम.टी प्रवाशांच्या कंफर्ट चा फार विचार करते. म्हणूनच की काय ती एक चालते फिरते मसाज सेंटर आहे. त्यात बसलं की त्या व्हायब्रेशन्स ने तुमचा पुर्ण बॉडी मसाज होऊन तुम्हाला दिवस ऊत्साहात जाईल किंवा दिवसाचा थकवा निघेल.
पी.एम.टी. तुम्हाला संयम कसा ठेवावा हे शिकवते. बसची वाट पाहून पाहून तुमच्या संयमाला एक नविन उंची प्राप्त होते. आपल्या राहुल द्रविडच्या संयमाचं हे एक गुपित आहे. तोही पी.एम.टी. ची वाट पाहून पाहूनच शिकला असावा.
वेळेवर बस आली की तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला पाहीजे. आणि चालकाचा जाहिर सत्कार पण. पी.एम.टी एवढी मजबुत असते(दिसते) की काय सांगू... बहुतांश वेळा डाव्या बाजुला पुर्ण वाकलेली पी.एम.टी. पाहीली की पुणेकराने तिच्यावर किती............ केला आहे असा विचार येवुन डोळे पाणवतात. 

पण मला काही गुणांचं कौतुक करावसं वाटतं... हे चालक लोक कमालीचे डोंबारी आहेत. शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्यावरन दुचाकी चालवनं ही एक कौशल्याचं काम आहेत. आजुबाजुलाच बसलेले ओलं खोबरं,आलं,कोथंबीर विकणारे भाजीवाले, फेरीवाले, आणि पुण्याचे अतिशिस्तप्रिय वाटसरू लोक, आणि जेमतेम बसच्याच रुंदीचे रस्ते... यातुन आपला चालक शिताफीने वाट काढतो. वृद्ध व्यक्तींना चढण्या-उतरण्यास मदत करणारे वाहक आणि जरा जास्त वेळ बस थांबवुन "नीट उतरा हो मावशी, बस थांबलेली आहे, घाई करू नका!" असे म्हणनारे चालक ही आहेत पी.एम.टी. मध्ये 
वाकडे तोंड न करता अगदी ७ रुपयांच्या टिकीटासाठी १००ची मोड देणारे वाहक इथे विरळच.सगळ्या प्रवाशांशी नम्र पणे हसत खेळत प्रवास करवणारे वाहक " मधले पुढे चला, गर्दी करू नका , उतरणारे पुढच्या दाराने उतरा " एका विशिष्ट तालीत म्हणतात तेंव्हा मजाच वाटते. गणपती, दसरा,दिवाळी ला आपल्या बसला चालक-वाहक मस्त सजवतात. जणु आपल्याला रोजी-रोटी दिल्याबद्दल एक छोटीशी परतफेड. सगळे चांगले-वाईट अनुभव घेऊन पण मला माझ्या पी.एम.टी.चा अभिमान आहे. तिच स्थान प्रत्येक पुणेकराच्या मनात अढळ आहे. असे वाटते couple's PMT चालू व्हावी .......... लांब बसली कि खूप वाईट वाटत. पी.एम.टी मध्ये मन पण जुळतात ......


#तुमचा दिप्या 

Saturday, 4 February 2017

संमेलन..... ते संम्मिलन


दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तो वाढतही आहे. या गोष्टी मान्य कराव्याच लागतील; पण तरी सर्वांना सामावून घेणारे.. मराठी साहित्य संमेलनाने आखलेला "उंबरठा' ओलांडून ते आणखी पुढे गेल्यास या संमेलनाचा परीघ आणखी मोठा होईल. हा संमेलनाचा परीघ वाढविण्यासाठी काय व्हायला हवे, यासाठी नवीन तरुण लेखकाना बोलतं केलं पाहिजे. साहित्य आणि साहित्याचं हे भव्य "संमेलन' तुमच्यापर्यंत खरंच पोचतं का, हे संमेलन आम्हा तरुणांचा विचार करतं आहे असं आम्हाला वाटतं का, आमच्यासारख्या तरुणांना व इतर साहित्य रसिकांना सामावून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी संमेलनात नव्यानं यायला हव्यात, सध्याच्या संमेलनातील कोणत्या बाबी तुम्हाला चांगल्या वाटतात-कोणत्या खटकतात, असे विविध प्रश्‍न आम्हा तरुणांना कोणी तरी विचारावेत. संमेलनाचा गाजावाजा अलीकडच्या काळात जास्त होत असला तरी हे संमेलन "पचायला' कमी पडतं आहे, ही खंत अनेकांच्या बोलण्यातून जाणवते पण बोलणार कोण. तसंच साहित्य बाह्य गोष्टींचा संमेलनांमध्ये होणारा शिरकाव या गोष्टीवरही नाराजी व्यक्त करणारे माझ्या सारखे अनेक तरुण आहेत ; पण संमेलनं अशा पद्धतीनं होत असतील तर ती बंद व्हायला हवीत, अशी टोकाची प्रतिक्रिया मुळीच नाही. ही प्रतिक्रिया आम्हा तरुणांची, म्हणजेच आशेचा किरण असल्याचं समजतो. संमेलनं व्हायलाच हवीत; पण ती बाजारू नकोत.. ती अधिकाधिक साहित्य-साहित्यिक-वाचक केंद्रित हवीत. साहित्यात होणारे गट-तट मोडीत काढून त्यांचं संम्मीलन या संमेलनाच्या माध्यमातून व्हावं.. तसंच मराठी साहित्य हे "अखिल भारतीय' इथपर्यंतच न राहता ते राज्याच्या कानाकोपऱ्यात व जगात सर्वत्र पोचण्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर व्हावा.. अशा विविध अपेक्षा व्यक्त करतो.माझ्या सारख्या नवीन लेखन करणाऱ्या अनेक तरुणांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्यास मराठी साहित्य चळवळीत महत्त्वाचं समजलं जाणारं हे संमेलन "शिखर संमेलनाचा' दर्जा नक्की प्राप्त करेल. 

आपला 
दीपक राजेंद्र कठाळे 
    

Friday, 3 February 2017

सह्याद्रीचा मुकूटमणी "हरिश्चंद्रगड"

                                                  
एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेवाद्वितीय नाव समोर येतं. भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्ण होतच नाही... आपण तो पूर्ण अनुभवला नाहीच, अशी भावना सतत मनात येत राहाते.
कित्येक उपमा, उपाध्या मिरवणारा हरीश्चंद्रगड. अर्थात, त्या सर्वच उपाध्या सार्थच म्हणाव्यात, किंबहुना कमीच पाडव्यात असाच आहे हा गड. इतका सुंदर, इतका मोहक, की एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही, असं होणं केवळ अशक्य. माझ्यासाठी तर हा किल्ला नविनच होता कारण कधी गेलोच नव्हतो जवळ असून सुद्धा. आणि एकदा असच आमचे गुरुवर्य श्री.रमेश खरमाळे यांच्या बरोबर जाण्याचा योग आला एकाच वर्षात दोन वेळा पाहून झालेला आणि त्याची कथाही तशीच सुरस.      

हरिश्चंद्र गड  केवळ सिनेमा, फोटो यांतून आणि माळशेजमधून येता-जाताच पाहाण्याचा योग आला. म्हणूनच  सरांनी आखलेल्या नियोजित ट्रेकिंगला जायचे ठरवले. आम्ही  'सह्यवेडे ' होतो 11 आणि आमचे मोरक्या होते श्री.खरमाळे सर आणि बाकीचे आम्ही टोळी मेंबर.
                                     
श्री.रमेश खरमाळे (माजी सैनिक)        
जन्म-13 नोव्हेंबर 1976 
सैन्यातून सेवानिवृत्ती -1 मे 2012 
सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात कार्यरत आहेत. 
निसर्गरम्य जुन्नर तालुका या सोशल मीडिया पेज चे सर्वेसर्वा आहेत.
तसेच ते शिवाजी ट्रेल व दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य आहेत 
तसेच किल्ले शिंदोळेचे किल्लेदार (समन्वयक) आहेत.
जुन्नर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक लेख ते फेसबुक सारख्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देतात.
काही दिवसांपूर्वी जुन्नर मधील किल्ले हडसर येथे पुण्याचे काही पर्यटक रात्रीच्या वेळी अडकले होते.त्या पर्यटकांना सुखरूप योग्य ठिकाणी आणण्यासाठी श्री.खरमाळे यांनी मोलाचे कर्तव्य बजावले होते. 
जर कोणाला जुन्नरचा निसर्ग अनुभवायचा असेल तर खरमाळे सर ट्रेकिंग कॅम्प नेहमी आयोजित करत असतात.
त्यांचा संपर्क- 8390008370/9420610358 
    दुचाकी असल्याने सैराभैरा पाहता येत होत.(निसर्ग पाहायला टॅक्स लागत नाही ना)वाटेत झरे, नदी, खडी चढण, जंगल सारं अनुभवत आम्ही साधारण काही तासात केदारेश्वर मंदिरापाशी आलो. इथे मंदिरं, गुहा मोठ्या प्रमाणात आहेत; कारण हरिश्चंद्रगड ही तशी प्राचीन तपोभूमी आहे. नंतर माळशेज घाट आणि बाकी परिसरावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग झाला. मंदिरापाशी आम्ही पोहोचलो, आता ओढ लागलेली ती हरिश्चंद्रगडाच्या सर्वांत मोठ्या आकर्षणाची... कोकणकड्याची.

झरझर आम्ही टेकड्या ओलांडत होतो.काळोख सरसावत
होता.आम्ही खूप पुढे आलो होतो(सर,तान्हाजीभांगले(डॉक्टर),आकाश,प्रदीप,प्रसन्ना, आणि मी) आणि बाकीचे जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी म्हणजे आमचे सहकारी पाठीमागेच राहिले होते त्यांना आणायला मी,प्रदीप,आणि सर पुन्हा मागे गेलो.सर्व रुग्णसेवक सहकारी आम्हाला भेटले त्यांना घेऊन आम्ही निच्छित स्थळी पोहोचलो.आम्ही निवाऱ्यासाठी गुहा शोधात होतो. मेजवानी ची सर्व तयारी झाली होती.फक्त पुढे यायची वाट पाहत होतो. त्याआधी आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे असणाऱ्या कुंडात फ्रेश होण्यासाठी गेलो. (सर,मी,प्रदीप,प्रसन्ना,आणि डॉक्टर)
कुंडात उतरण्याच्या आधी सरांनी मला आणि प्रदीप,प्रसन्ना ला सांगितलं कि ह्या कुंडातल्या महादेवाच्या पिंडाला 21 प्रदक्षिणा घातल्या कि मनातली इच्छा पूर्ण होते.
विचार न करता रात्रीचे 11.30- 12 वाजले असतील. आम्ही तिघांनी 21 प्रदक्षिणा चालू केल्या. बाप रे इतकं थंड पाणी होत कि विचारू नका. (अजब म्हणजे पाणी कंबरे पर्यंतच असते.) आणि मला तरी कंबरे खाली थंड पाण्याने बधिरपणा जाणवत होता. अर्थात प्रदीप आणि प्रसन्ना त्यांचेही हे हाल असतील.एकमेकाला सांगूही शकत नव्हतो का तर जप चालू होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
माझा मात्र दंतताल चालू होता आणि मध्ये सरांच्या नावाने शि(व्या)वाय हा जप करत होतो. सर मात्र बाहेर बसून आमची गम्मत पाहत होते मग तर अजून त्यांच्या नावाने जप चालू होता.
आमच्या प्रदक्षिणा झाल्या. वीस मिनिटं कमरेखालचा भाग आहे हे मी तरी ठाम सांगू शकत नव्हतो. पुढे आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन छान झालं.तोपर्यंत डिनर ची तयारी बाकीच्या सहकार्यांनी करून ठेवली होती. मस्त छान असा डिनर झाला आणि आम्ही त्या गुहेत झोपण्याच्या तयारीला लागलो. मस्ती ,जोक्स , सांगत आम्ही झोपी गेलो. मी सर्वात कडेला झोपलो माझ्या शेजारी सर त्यांच्या शेजारी डॉक्टर ,प्रदीप,प्रसन्ना,आणि सर्व बाकीचे सहकारी त्यातले ग्रामीण रुग्णालयाचे एक सहकारी खूप आवेशात बोलले जर साप निघाला तर मला सांगा.आम्ही सर्व त्यांच्या भरवशावर झोपी गेली.
लिहताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या शेजारून एक साप जातोय हे सरांना जाणवलं त्यांनी मला न उठवता डॉक्टरांना उठवलं . मी मात्र स्वप्नाच्या दुनियेत रंगलो होतो.माझ्या पासून त्याला लांब करण्यात सरांना आणि डॉक्टरांना यश आलं. लगोलाग त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांना उठवलं. आणि मला उठवलं .....दिप्या उठ , साप बघ माझी झोपच गायब मी खाडकन उठून बसलो. त्यांनतर त्या महाशयांना उठवलं ज्यांनी कमेन्टमेंट केली होती साप आला कि मला उठवा त्यांना उठवलं.ते आरामशीर उठले सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला पण सर्वांचे डोळे लगेच मोठे झाले त्यांच्या एका वाक्याने मी कधी म्हंटल मला साप पकडता येतो मी तर म्हंटल साप आला कि मला उठवा आणि मित्रांनो साप आला तुम्ही मला उठवलं त्या बद्दल धन्यवाद.
सर्व जण हसत होते मी मात्र खोट खोट हसत होतो.
सरांनी साप काठीवर धरला आणि लांब सोडून आले. सर्व जण झोपले पण झोपायचं नाटक केलं तुम्हीच सांगा कशी झोप येईल. 
सकाळ झाली सर्व उठलो . मस्त शेकोटी केली चहा घेतला आणि फ्रेश झालो. या काळात सरांची तब्बेत बिगडली त्यांनी माघारी जायचा निर्णय घेतला. सर आणि डॉक्टर परतीच्या वाटेवर लागले. आम्ही पुढे लक्ष्य ठेवले होते




कोकणकडा आणि तारामतीचा कडा.....कोकणकड्यावर बसून मस्तपैकी वारा अंगावर घेण्यात काही आगळीच मजा. जवळपास ३००० फूट उंच कडा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पोखरला गेलाय आणि चांगलाच बाकदार झालाय. याच कड्याच्या उजव्या बाजूने एक नळीची वाट किल्ल्यावर येते.आमच्यातल्या एका सहकार्याने 'आस्तेकदम.....आस्तेकदम...' शिवरायांची वर्दी द्यायला सुरवात केली.त्यांनतर संपूर्ण कड्यात "राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो...."अश्या घोषणा घुमू लागल्या. तेव्हा कोकणकड्यातून येणार प्रतिध्वनी केवळ अनुभवायचीच गोष्ट.त्यातून तो जर शिवरायांचा गजर असेल तर नादच नाही.
आम्ही कोकणकड्यावर जास्त वेळ न घालवता.तारामतीच्या कड्याकडे मार्गक्रमण चालू केले आणि दुपार पर्यंत आम्ही तारामतीच्याकड्यावर पोहचलो होतो. सुर्यास्ताच्या आधी गडाच्या खाली पाहिजे असा निर्धार केला आणि परतीच्या वाटेवर लागलो.
या सर्व भटकंतीत गप्पांचा फड रंगला. प्रत्येकाचे अनुभव, कथा, विनोद असं सगळं जिथे टाईम भेटल तिथे होत होतं
लांबूनच पुन्हा एकदा महादेवाला हात जोडले आणि इथेही पुन्हा जाणवलं. गडावर कचरा अमाप झालाय. पुन्हा येताना याच्या निर्मूलनाचा कार्यक्रम घेऊन यायला हवं, या साऱ्या गोष्टींचा विचार करत. इथून पुढे सर्वांचाच वेग वाढलेला होता. आता घर खुणावत होतं. खाली पोहोचून मागे वळून पाहिल्यावर 'राहिलो असतो आणखी एक दिवस,' असं वाटत राहिलं. 
जुन्नर मध्ये पोहोचल्यावर प्रत्येकजण वदला, 'सर, पुन्हा जायचंच. तारीख बोला फक्त.' याचं कारण एकच, कितीही वेळा जा, कितीही फिरा, हरिश्चंद्रगड 'पूर्ण' होतच नाही..

तुमचा दिप्या  

Tuesday, 31 January 2017

देशाला न लाभलेले असे दोन "पंतप्रधान"

नेताजी मुलायमसिंह यादव आणि शरद पवार साहेब या दोन नेत्यांमध्ये साम्यस्थळे काय आहेत? त्यांची तुलना होऊ शकेल की नाही? दोघांच्या नेतृत्वशैलीत फरक काय आहेत?
दोघांना कायमचे भावी पंतप्रधान म्हटले जाते. यात कौतुकाचाही भाग असतो, अनेकदा उपहासानेही त्यांचे विरोधक या वस्तुस्थितीचा वापर करतात. वयाच्या हिशेबाने मुलायमसिंह पवारांपेक्षा काही महिन्यांनी थोरले आहेत. गेली ५० वर्षे हे दोघेही देशाच्या जनमाणसावर स्वत:चा ठसा उमटवत आलेले आहेत. त्या निमित्ताने या लोकनेत्यांच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू आहे. फळे लागलेल्या झाडाकडे काळजीने, मत्सराने पाहण्याची आपल्याकडची रीत आहे. दोघेही त्यांच्या त्यांच्या राज्याचे तीनदा मुख्यमंत्री होते. दोघांचीही मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, वाजली आणि वादग्रस्तही ठरली. दोघेही देशाचे संरक्षणमंत्री होते. दोघांनीही पंचाहत्तरी धुमधडाक्यात ओलांडली आहे.  त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच
......…........................................................................
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणून महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन म्हणता येईल. उत्तर प्रदेश म्हणजे छोटा भारत . हे राज्य देशाच्या राजकारणाला दिशा देते. देशाचा पंतप्रधान ठरवते. दिल्लीचे तख्त कुणाच्या ताब्यात असणार हे उत्तर प्रदेश ठरवतो. या अर्थाने हे राज्य देशाचे राजकीय इंजिन आहे. म्हणूनच अशा या दोन राज्यांतील मोठा जनाधार असणाऱ्या या दोन नेत्यांविषयी देशभर सतत कुतूहल राहिलेले आहे.

  • या दोन्ही नेत्यांची राजकीय जडणघडण १९६० च्या दशकात झाली. हा काळ देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. सर्वांना स्वराज्याचे सुराज्य करण्याचे वेध लागले होते. दारिद्र्य, अज्ञान, गुलामीतून बाहेर पडण्याची भूक साऱ्या समाजालाच लागली होती. देशात सुराज्य आणायचा रस्ता म. गांधींनी दाखवला होता. पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देश सुराज्याकडे वाटचाल करत होता. अशा वेळी बहुजन समाजातून, मध्यम जातीतून कर्तबगार तरुणांची एक पिढी जीवनाच्या विविध क्षेत्रांत पुढे येत होती. या पिढीचे नेते म्हणून शरद पवार आणि मुलायमसिंह पुढे आले. या दोघांनाही सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे. समाज अस्वस्थ होता. काळ गतीमान होता. त्यात या दोघांच्या जीवनाला दिशा मिळाली.


  1. मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या सैफई या गावातला, यादव जातीतला, शेतकरी कुटुंबातला मुलगा. एम.ए.,बी.टी. झाला. शिक्षक म्हणून काम करू लागला. त्याला कुस्तीची आवड होती. कुस्तीने त्याला जीवनात पुढे जायला रग, धमक दिली. शिक्षणाने विचार दिला. हा तरुण समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या सहवासात आला. लोहिया हे गांधींचे शिष्य. समाजवादाला त्यांनी भारतीय चेहरा दिला. भारतीय समाजातल्या जात या शोषण माध्यमाकडे त्यांनी लक्ष वेधले. जातिव्यवस्था निर्घृण असून तिने केवळ इथल्या माणसांना गुलामच केले नाही, तर त्यांच्यातली सर्व निर्मितीक्षमता चिरडून, छाटून मारून टाकली याची प्रभावी मांडणी लोहियांनी केली. समाजवादाला त्यांनी जातिनिर्मूलनाची जोड दिली. जातीचे चटके सोसलेल्या मुलायमसिंहांना हा विचार झपाटून टाकणारा होता. ते लोहियांचे शिष्य, समाजवादी बनले. सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते झाले. समाजात सर्व प्रकारची समता आणण्यासाठी झटण्याचे त्यांनी ठरवले. उत्तर प्रदेश या राज्यात जातव्यवस्थेचे जाळे तर जास्तच गुंतागुंतीचे आहे. उच्चजातीयांच्या उलट्या कर्तबगारीचे तिथले किस्से भयावह आहेत. दबलेल्या जातींना गुलामासारखे वागवण्याची तिथली अनेक उदाहरणे ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. अशा राज्यात कार्यकर्ता म्हणून मुलायमसिंहांना काम करायचे होते. घरात वारसा नव्हता, विचार हीच प्रेरक शक्ती होती. कुस्तीची आवड असणाऱ्या या पैलवानाने विषमतेविरोधात शड्डू ठोकला.        
  2. या उलट शरद पवारांच्या आई (शारदाबाई गोविंदराव पवार) डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या होत्या. घरात मार्क्स, लेनिन यांचे फोटो होते. लाल झेंड्याचा परिचय होता. समतेचे विचार लहानपणापासून माहीत होते. काटेवाडी या गावानेच बालवयात पवारांना समतेचा परिचय दिला होता. पवारांना पुण्यासारख्या प्रगत विचारांच्या शहरात शिकायची संधी मिळाली. विद्यार्थी असताना त्यांना यशवंतराव चव्हाणांसारखा नेता जवळून पाहायला मिळाला. चव्हाण मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले. त्यांनी समाजवादाचा व्यवहारीदृष्ट्या सोयीचा आविष्कार असलेल्या सहकाराची कास धरली. सहकारातून समाजवादाकडे हा विचार अंगीकारला. पवारांना घरातल्या समाजवादाने भुरळ घातली नाही, तेवढी या व्यवहारी, उपयुक्त सहकाराने घातली. आज बारामतीत जे विकासाचे बेट उभे राहिले ते सहकारातूनच आकाराला आले आहे. सामाजिकदृष्ट्या पवारांचे विचार पुढारलेले आहेत. यशवंतराव जात मानत नव्हते, पण त्यांना मराठा समाजाचा नेता म्हणून मान्यता मिळाली. पवारही जात मानत नाहीत, पण त्यांचा उल्लेखही मराठा नेता असाच सतत केला जातो. दिल्लीत तर तो जास्त ठळकपणे होतो. पवारांनी अठरापगड जातींना बरोबर घेतले. सर्वच जातीतून नवे नेते घडवले. म्हणून राज्यातल्या छोट्यामोठ्या ओबीसी-दलित-आदिवासी-भटक्याविमुक्त समूहात पवारांविषयी प्रेम आहे. मराठा समाजानेही पवारांवर जीव लावला. या शिदोरीमुळेच त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करता आले. महिलांना सत्तेचा वाटा देता आला. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करता आली, मुस्लीम ओबीसींना सवलती मिळवून देता आल्या. त्यातून पवारांची प्रतिमा एक सामाजिक न्यायवादी नेता अशी उभी राहिली.

मुलायमसिंह यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर मंडल आयोग, धर्मनिरपेक्षता, राखीव जागा हा अजेंडा पुढे रेटला. बाबरी मशीदविरोधी आंदोलन हाताळले. आज समाजवादी पक्षात उत्तर प्रदेशातल्या आठरापगड जातीतले नेते पुढे आलेले दिसतात. सुरुवातीच्या काळात मुलायम आणि कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष हातात हात घालून पुढे आले. दोघांचे अजेंडे एकसारखे असल्याने दोघांनाही त्यातून बळ मिळाले. हे दोन्ही पक्षच आज उत्तर प्रदेशचे तारणहार बनले आहेत. संघ परिवाराची नकारात्मक, समाजात दुही पेरणारी आंदोलने या राज्यात सतत सुरू असतात. ती निष्प्रभ करण्याचा फॉर्म्युला मुलायमसिंह यांनी मध्यम जातीच्या एकजुटीतून तयार केला आहे. त्या राज्यात मुस्लीम बांधव त्यांना मोठा भाऊ मानतात. ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी विश्वासार्हता म्हणता येईल. ही विश्वासार्हता त्यांनी सतत केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमधून तयार झाली आहे. म्हणून सारेजण त्यांना नेताजी म्हणतात. हे दोन्ही नेते ५० वर्षे आपापल्या राज्याचे नेतृत्व करत आले आहेत. पन्नास वर्षांच्या वाटचालीत या दोघांनी अनेक प्रश्न सोडवले. अनेक आव्हाने परतवून लावली. त्याबद्दल लोकांनी त्यांच्या कर्तबगारीला सलाम केला. मुलायमसिंहांना लोकांनी नेताजी ही पदवी दिली, तसे पवारांना महाराष्ट्र जाणता राजा म्हणून संबोधतो. असे असामान्य झालेल्या नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढतात. लोक या नेत्यांबद्दल जास्त पझेसिव्ह होतात. त्यांच्यावर जास्त जबाबदारी लादतात.
त्या भावनेतूनच महाराष्ट्रात पवारांकडे जास्त अपेक्षेने पाहिले गेले. एवढा मोठा महानेता आपल्याजवळ असताना राज्यातल्या असहाय्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाही, असे विश्लेषण केले गेले. शेतकरी मराठा समाजातले दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतेय. त्या समाजातल्या तरुण वर्गात रोजगार संधीचा अभाव असल्याने मोठा असंतोष खदखदतोय. या राज्यातली शेती, ग्रामीण समाज, गावगाडा जवळपास शेवटचे आचके देत आला दिवस ढकलतोय. तो केव्हाही मोडून पडेल अशी स्थिती आहे. या पडझडीत सर्वात जास्त झळ मध्यमजातींना पोचणार आहे. पवारांसारखा जाणता नेता आपल्याजवळ असताना हे होते आहे याची बोच आहे. हा काळाचा घाला असेल पण त्यावर काहीच उपाय नाही काय? पवारांनी या अरिष्टात हस्तक्षेप करावा, यासाठी लोक आशाळभूतपणे त्यांच्याकडे पाहत आहेत. शिक्षण, आरोग्य या व्यवस्थाही आजारी आहेत. लोक त्यात भरडले जाताहेत. राज्यातले सरकारही या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही.
अशीच भीषण परिस्थिती उत्तर प्रदेशातही आहे. रोजगाराचा अभाव, शेती अरिष्ट, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचे रोगटपण याचा सामना का करत नाही म्हणून लोक मुलायमसिंहांना दोष देत आहेत. या रोगटपणातून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा महारोग फोफावतो. असहिष्णुता धगधगते, धर्माची गिधाडे झेपावतात. दंगली होतात, दादरी कांड होते, गुन्हेगारी वाढते ही या रोगट व्यवस्थेची देण आहे.

शरद पवार-मुलायम सिंह हे काही फक्त त्या त्या राज्याचे नेते नव्हेत. ते देशाचे नेते आहेत. देशाला पुढे नेणाऱ्या दोन महत्त्वाच्या राज्यात त्यांना मान्यता आहे. या दोन राज्यांच्या समस्या या साऱ्या देशाच्याच आहेत. त्या सुटल्या नाहीत तर देशाचा गाडा अडेल. पंचाहत्तरी हे निमित्त. या निमित्ताने देशापुढच्या या आव्हानांना भिडण्याचा विचार या नेत्यांनी द्यावा, यासाठी लोक या दोघांच्या राजकारणाच्या उण्यादुण्यावर चर्चा करत आहेत. फळ लागलेल्या झाडावर दगड मारावाच लागतो. आपली ती परंपराच आहे!
 ( नुकताच शरद पवार साहेबांना भारत सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार "पद्मविभूषण" ने सन्मानित करण्यात आले. याचा अभिमान सर्व शेतकऱ्यांला आहेच.या विषयी लेख लवकरच पाहूयात ) 
 तुमचा दिप्या