दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तो वाढतही आहे. या गोष्टी मान्य कराव्याच लागतील; पण तरी सर्वांना सामावून घेणारे.. मराठी साहित्य संमेलनाने आखलेला "उंबरठा' ओलांडून ते आणखी पुढे गेल्यास या संमेलनाचा परीघ आणखी मोठा होईल. हा संमेलनाचा परीघ वाढविण्यासाठी काय व्हायला हवे, यासाठी नवीन तरुण लेखकाना बोलतं केलं पाहिजे. साहित्य आणि साहित्याचं हे भव्य "संमेलन' तुमच्यापर्यंत खरंच पोचतं का, हे संमेलन आम्हा तरुणांचा विचार करतं आहे असं आम्हाला वाटतं का, आमच्यासारख्या तरुणांना व इतर साहित्य रसिकांना सामावून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी संमेलनात नव्यानं यायला हव्यात, सध्याच्या संमेलनातील कोणत्या बाबी तुम्हाला चांगल्या वाटतात-कोणत्या खटकतात, असे विविध प्रश्न आम्हा तरुणांना कोणी तरी विचारावेत. संमेलनाचा गाजावाजा अलीकडच्या काळात जास्त होत असला तरी हे संमेलन "पचायला' कमी पडतं आहे, ही खंत अनेकांच्या बोलण्यातून जाणवते पण बोलणार कोण. तसंच साहित्य बाह्य गोष्टींचा संमेलनांमध्ये होणारा शिरकाव या गोष्टीवरही नाराजी व्यक्त करणारे माझ्या सारखे अनेक तरुण आहेत ; पण संमेलनं अशा पद्धतीनं होत असतील तर ती बंद व्हायला हवीत, अशी टोकाची प्रतिक्रिया मुळीच नाही. ही प्रतिक्रिया आम्हा तरुणांची, म्हणजेच आशेचा किरण असल्याचं समजतो. संमेलनं व्हायलाच हवीत; पण ती बाजारू नकोत.. ती अधिकाधिक साहित्य-साहित्यिक-वाचक केंद्रित हवीत. साहित्यात होणारे गट-तट मोडीत काढून त्यांचं संम्मीलन या संमेलनाच्या माध्यमातून व्हावं.. तसंच मराठी साहित्य हे "अखिल भारतीय' इथपर्यंतच न राहता ते राज्याच्या कानाकोपऱ्यात व जगात सर्वत्र पोचण्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर व्हावा.. अशा विविध अपेक्षा व्यक्त करतो.माझ्या सारख्या नवीन लेखन करणाऱ्या अनेक तरुणांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्यास मराठी साहित्य चळवळीत महत्त्वाचं समजलं जाणारं हे संमेलन "शिखर संमेलनाचा' दर्जा नक्की प्राप्त करेल.
आपला
दीपक राजेंद्र कठाळे

No comments:
Post a Comment