Thursday, 9 February 2017

टणाटण व्हॅलेंटाईन !



सणासुदीची जशी धामधुम सुरू होते तशी वेगवेगळ्या डेचीही धामधूम सुरू असते. डे म्हणजे मन्ना डे, शोभा डे, संडे, मंडे…असे डे नाहीत. तर फादर डे, मदर डे, यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे, ड्राय डे, व्हॅलेंटाइन डे या डे संदर्भात सांगतो आहे. महाराष्ट्र बंद, भारत बंद हे दिवसही आपल्यासाठी डे च असतात, हा भाग निराळा. असो! यातले बरेचसे डे आपण साजरे करतो. म्हणजे, त्या दिवसापुरतं उरकतो. कधी कधी प्रश्न पडतो, की हे डे प्रकरण नसतं तर काय बिघडलं असतं का? तर आपण आपल्या वडिलांवर-आईवर प्रेम केलं नसतं का, त्यांनीही मुलांवर प्रेम केलं नसतं का, प्रेयसीला छानपैकी भेटवस्तू दिलीच नसती का? असं समजू यातले काही डे व्यवहार्य आहेत. यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे या डेमधून काहीतरी संदेश मिळतो. यंग सिनियर्स अर्थात ज्येष्ठ नगरिकांविषयी यापूर्वी समाजात फार जागृती नव्हती. निवृत्त झालेत, वय झालं आता म्हातार्‍याचं… या शब्दांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बंदिस्त केलं होतं. या वर्गाच्याही काही समस्या असतील, त्यांचीही काही सुख दुखः असतील याची कुणाला फार फिकीर असल्याचे दिसत नव्हते. पण यंग सिनियर्स डे मुळे या वर्गावर फोकस पडण्यास काहीतरी मदत होते. एक दिवस का होईना त्यांचं अंतरंग आपल्याला समजते. त्यातून पुढे काही संस्था, संघटना, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम राबवतात. कोपर्‍यात पडलेल्या थकलेल्या आई-वडिलांची काही मुलांना आठवण होऊन त्यांना आपली चूक कळून येते… पर्यावरण डेचंही काहीसं असंच असतं. पर्यावरणाच्या विषयी जागृती होण्यासाठी या दिवसाचा हातभार लागतो…असो. असे काही मोजके अपवाद सोडले तर हल्ली कोणताही दिवस डे म्हणून साजरा होऊ लागला आहे. व्हेलेंटाइन डे पासून डे प्रकरणं खर्‍या अर्थाने गाजू लागली. प्रेम करा, असा व्हेलेंटाईन संताने दिलेला संदेश भारतात पोहचला आणि प्रेम या शब्दाविषयी आपण जागृत झालो. आपल्या संतांनी तर अशा कितीतरी शिकवणी दिल्या. पण आपल्याला ज्ञानेश्वर , तुकाराम, नामदेव असे संत चालत नाही. त्यामुळे त्यांचा संदेश आपल्या मनाला भिडत नाही. व्हॅलेंटाईन सारखं भारदस्त नाव असलं की आपल्याला जरा बरं वाटतं… डेचं हे फॅड प्रामुख्याने पाश्‍चात्य देशांतून आपल्या इकडे आलंय. यापैकी बर्‍याच डे च्यापाठी मार्केटिंग फंडा असल्याचं स्पष्ट झालंय. व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठा अशाच फुलून गेल्या आहेत. व्हॅलेंटाईनने जरी निमित्त पुरवले असले आणि या हृदयीचे त्या हृदयी पोचवण्यासाठी आजचा दिवस असला, तरी प्रेमाला मुहूर्त लागत नाही. बालपण संपून तारुण्याची चाहूल लागते, तेव्हा हा गुलाबी रंग मनाच्या क्षितिजावर पसरू लागतो आणि सांजवेळ येऊन सावल्या लांबू लागल्या, तरी त्याची लाली कायम राहते. भेट, नजरानजर, होकार, नकार, वेदना, विरह, त्याग, राग, लोभ, मत्सर या सर्व भावनांचा एकत्रित आविष्कार म्हणजे प्रेम. त्यातही विरह म्हणजे तर प्रेमभावनेचा कळसच. आपल्या प्रियकराची वाट पाहत वाटेवरच कुठेतरी पडून असलेली एक प्रेयसी. तिने बहुधा प्राण सोडले असावेत असे समजून एक कावळा तिच्या अंगावर झेपावतो, तेव्हा ती त्याला म्हणते, कागा सब तन खाईयो, मोरा चुन चुन खाईयो मांसरे, दो नैना मत खईयो, उन्हे पिया मिलन की आस रे…म्हणजे माझ्या शरीराचे वाट्टेल तेवढे लचके तोड; मात्र डोळ्यांवर चोच नको मारूस; कारण त्यांना प्रतिक्षा आहे प्रियकराची. असा ग्रेट विरह. तर दुसर्‍या बाजूला निराशाही तेवढीच सकस. प्रेयसीचे आणखी कुणाशी तरी लग्न झाल्यावर, तो काय म्हणतो? दारावरून माझ्या तिची वरात गेली, मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली, आता कशास तिची पारायणे करू मी, माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली. या दिवसांत कॉलेजा-कॉलेजात गुलाब फुलांच्या देवाण-घेवाणीचे उत्सव असतात. कोण कुणाला फुल देतो, कोण कुणाचे फुल स्वीकारतो, यावर पैजा लागतात. परंतु फुल स्वीकारले म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट केली असे नव्हे. एकमेकांना पारखून, एकमेकांना ओळखून मगच फायनल निर्णय घेण्याएवढी आमची पिढी शहाणी आणि व्यवहारी झाली आहे. कोवळ्या वयात झालेला प्रेमाचा साक्षात्कार हा नजरेचा धोकाही असू शकतो ना? भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, नंतर मजला कळले, ती तशीच पाहते नेहमी. तर अशी फसगत झाली , तर करेक्शनला वाव असावा इतपत आमची पिढी प्रॅक्टिकली विचार करू लागली आहे. अर्थात तरीही आवश्यक तिथे हळवेपणा येतोच आणि तो आलाच पाहिजे; कारण तुम जो आये जिंदगी में बात बन गयी असं मुलायम आवाजात सांगावेसे वाटते, हीच तर या गुलाबी हृदयरोगाची खासीयत आहे. दिले नादॉं तुझे हुवा क्या है, आखीर इस दर्द की दवा क्या है असं उगाचच आडूनआडून विचारण्याऐवजी थेट, तुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना, असं सांगण्याचे हे दिवस आहेत. व्हॅलेंटाईनचा दिवस असो अथवा नसो !समुद्राच्या साक्षीनं, झाडांच्या आडोशानं रंगीबेरंगी थवेच्या थवे प्रेमकुजन करीत असतात. कटाक्ष, इशारे, सांकेतिक भाषेतील निरोप हे तर सगळीकडेच सुरू असतात. जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही ! तीचा लाजराबुजरा प्रणयही टिकून आहे आणि तुला चार कॉल केले मी, एकालाही उत्तर नाही, गेलास उडत, असा स्वचे भान आलेला नवा प्रणयही आहे. सगळे बदलत असते, तरी काहीही बदलत नसते. असो. या प्रकारचे दिवस साजरे करणं कदापि वाईट नाही. मात्र, त्याला चंगळवादाची जोड देऊ नका असेच माझ्या मित्र मैत्रिणींना  सांगणे आहे. आपली वरिष्ठ मंडळी आपल्या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही, तर त्या सेलिब्रेशनच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात आहे. तेव्हा नाती जपा, नाती जगा. नात्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प या व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने करा. इतकेच.

💐 तुमचा दिप्या 

1 comment: