Saturday, 18 March 2023

'स्त्री' ही नदीसारखी असते.. 'प्रवाही'


सामर्थ्यवान - स्वतंत्र - यशस्वी स्त्री आकर्षक वाटते? तुम्हाला अशी स्त्री जोडीदार किंवा जीवनसाथी म्हणून हवी आहे?


सावधान !! 
कारण काय आहे..पोळं आहे म्हटल्यावर माशा तर घोंघावणारच ... पण अशा स्वतंत्र - सामर्थ्यवान - कर्तव्यतत्पर - काव्य शास्त्र विनोद पारंगत - संभाषणकला प्रवीण स्त्री शी सहजीवन आपल्याला झेपणार आहे ? आपल्या मनाची ती तयारी आहे ? तिचा बाणेदार स्वभाव आणि तिचं यश तुम्ही पचवू शकणार आहोत?
हे लिखाण वाचून जर राग येणार असेल, चलबिचल होणार असेल, तर परत एकदा विचार करा.जोडीदार माझी सशक्त बरी की हवी मला अबला नारी मात्र एक लक्षात घ्या समर्थ असो वा अबला - चांगुलपणा ऑप्शनल नसतो.आणि हो...."सामर्थ्यवान महिलांना आपली गरज नसते" आपल्याला जर एखाद्या स्वतंत्र वृत्तीच्या सामर्थ्यवान महिलेचं मन जिंकायचं असेल, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की त्यांना आपली "कशाहीसाठी" गरज नसते. ना आपल्या पैशाची,ना तारणहार म्हणून,ना संरक्षणकर्ता म्हणून,ना आपल्या भेट वस्तूंची,ना आपल्या कौतुकाची. 

तिला आपली गरज नसते.पण हो आपण खरंच छान माणूस असाल, तर आपल्यात तिला रुची मात्र नक्की असू शकेल.तिला छान जोडीदार असावा अशी तिची इच्छा असते.पण ती तिची गरज नसते. उगीच तिचा रक्षणकर्ता,पालनकर्ता बनण्याच्या भानगडीत पडू नका.कारण "तसं" बनणं ही आपली भावनिक गरज असू शकेल, तिची नाही.त्यामुळे उगीच "मोठेपणा" चा आव आणण्याऐवजी त्यांना "बरोबरीची" जागा दिलीत, तर आपल्या स्वप्नाची सुंदरी तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्ती असते.

"समर्थ आणि स्वतंत्र" स्त्रीला तोडीस तोड भागीदार पाहिजे असतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कुणी पोलीस नाही.
लक्षात घ्या, तिला तुम्ही "हवे" आहात म्हणून हे नातं असतं, तुमची "गरज" आहे म्हणून नाही.आणि जर प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत जर तिला तुमची गरज पडत असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या -प्रॉब्लेम आपल्यात आहे, तिच्यात नाही.

स्वतंत्र आणि सामर्थ्यवान स्त्रियांनी तुम्हाला सुधारण्याचा आणि तुमचं बेबी सिटिंग करण्याचा मक्ता घेतलेला नाही.
परत. त्यांना तुमच्यात लहान मूल नको आहे, त्यांना हवा आहे तोडीस तोड भागीदार, हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून त्यांनी आयुष्यभर तुमचं संगोपन करावं ही अपेक्षाच मुळातच गैर आहे. त्यासाठी तुम्हाला आईची गरज आहे, बायकोची नाही.
तर अशा स्त्री च मन जिंकायचं असेल तर स्वतःचे छंद स्वतः जोपासा, स्वतः ची ध्येय स्वतः ठरवा, स्वतः ची दिनचर्या स्वतः सांभाळा. एखाद छान काम करा, एखादी सुंदर कलाकृती साकारा, And you have her heart .

स्त्री ही काही तुमचं Rehab केंद्र नाहीत.कुठलीही स्त्री असो, अबला की सबला, त्यांचं मूळ काम "तुमचं गाड रुळावर आणण" हे नाही आहे. ते स्वतःचं स्वतः करा, त्या देखील करतात. 
आपलं तिकीट सांभाळणं ही आपली जबाबदारी असते, रेल्वे ची नाही.त्यामुळे आपलं गाडं घसरू न देणं, हे आपलं आपण सांभाळा.तुम्हाला जोडीदार हवी आहे की आई,की फुकटची मोलकरीणएक लक्षात घ्या, समर्थ स्त्री ही समर्थ असते, कारण ती स्वतच्या हिमतीवर स्वतः च्या गोष्टी स्वतः वेळेत उरकते - वेळच्या वेळी योग्य निर्णय घेते. 

तिची अपेक्षा तुमच्याकडून हीच असणार आहे. दमून आला असाल तर ती प्रेमापोटी चहा नक्कीच करून देईल..
पण लोळत पडला आहात आणि "अगं चहा आण गं" केलत तर त्या गरम चहा च काय होईल सांगायची गरज नाही.

सामर्थ्यवान स्त्रियांच्या स्वतः च्या खूप गोष्टी चालू असतात, ज्यांचा तुम्ही भाग असण्याची गरज नसते आणि कदाचित तो तुमचा अवाकाही नसेल. त्यांच्या priorities वेगळ्या असतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या देखील खूप असतात.तिला तुमच्या "सेवेत जुंपण्या अगोदर" हा विचार जरूर करा.... नुसता विचार करू नका... तर तिच्या वेगवेगळ्या वलयांचा आदर ठेवा. कारण तुम्ही त्या वलयांचा भाग नाही आहात. ती तिच्या प्रेमापोटी तुम्हाला त्या वलायांचा भाग करून घेते आहे हे लक्षात घ्या. त्या वलयांचा केंद्रबिंदू होण्याचा प्रयत्न करू नका... भ्रमनिरास होईल.
थोडक्यात "सामर्थ्यवान स्त्री शी सहजीवन हवे असेल, तर एकमेकांविषयी आदर ठेवा. एकमेकांत भावनिक गुंतवणूक जरूर करा.पण "एकमेकांच्या व्यावसायिक जीवना आड आपण येत नाही न" ह्याची काळजी नक्की घ्या.

स्वातंत्र्य महत्त्वाचं.तुमचं ही आणि त्यांचं ही
एक लक्षात घ्या.. स्वातंत्र्य म्हणजे व्यभिचार नव्हे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर /मैत्रिणींबरोबर बसून तासन् तास गप्पा मारू शकता.... तशा त्याही !! पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही किंवा त्या व्यभिचारी आहेत. 
त्यांची तुमच्यातली भावनिक गुंतवणूक - प्रेम - आदर आणि 
तिला तिच्या मित्र - मैत्रिणींबरोबर वेगळ्या आयुष्याचा पूर्ण अधिकार आहे.
एकमेकांच्या आयुष्याचा भाग जरूर बना. पण केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांवर खरं प्रेम असेल... तर फार जास्ती प्रयत्न करण्याची गरज पडत नाही.

बाकी सगळं राहिलं बाजूला, आधी माझ्याकडे बघ हे शब्द जर तुम्ही उच्चारले असतील तर अवघड आहे.कारण तुम्हाला अशी स्त्री जोडीदार म्हणून नको आहे. तुम्हाला अशी स्त्री जिंकायची आहे.. 
तिचा ताबा मिळवायचा आहे... तुमचा अहंकार सुखावण्यासाठी.

कित्येक वेळेला सामर्थ्यवान स्त्रीया ह्या "स्त्री स्वातंत्र्य - स्त्री मुक्ती - व्यक्ती स्वातंत्र्य" अशा तत्त्वांच्या खंद्या पुरस्कर्त्या असतात....
जमणार आहे तुम्हाला? नांदायला??
स्त्री जेवढी कर्तबगार तेवढी तिच्या वाट्याला अधिक अधिक उपेक्षा येत गेलेली असते. खास करून पितृसत्ताक पद्धती मध्ये. 
पण त्या बियांसरख्या असतात.जेवढ्या खोल पुरायला जाल तेवढ्या तरारून बहरून वर येतात... आणि स्वत:च्या तत्त्वांचा अजून हिरीरीने पुरस्कार करतात. 

झेपणार आहे?

जर तुम्ही खरंच सामर्थ्यवान - स्वतंत्र स्त्री च्या प्रेमात असाल, तर लक्षात घ्या.. त्यांना खरंच कशाची गरज असेल तर ती असते अशा जोडीदाराची जो त्यांची मेहेनत, त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष समजू शकतो... आणि नुसता समजू शकत नाही, तर कायम त्यांच्या खांद्याला खांदा देऊन बाजूला उभा असतो. त्यांच्या वाट्याला जेंव्हा लैंगिकतेमुळे भेदभाव येतो, घायाळ होतात - तेंव्हा त्यांच्या जखमांवर फुंकर घालतो... And acts like a sounding board... A reflecting mirror... Who helps them balance their thoughts, especially when the going gets tough.

तिच मन ऐकायला शिका...
आणि हे फक्त "समर्थ आणि स्वतंत्र" स्त्रियांना नाही - तर सर्वच स्त्रीयांसाठी लागू आहे. जर हे करू शकत नसलात तर त्यांच्यापासून लांबच बरे.
तुम्हाला समर्थ - स्वतंत्र स्त्री कशासाठी हवी आहे? तिला कशी काबूत आणली असा विचार करून तुमचा पुरुषी अहंकार सुखावायला.. की खरंच तिच्या गुणांना प्रेमानी खतपाणी घालून तिला अजून बहरलेलं बघायला लक्षात घ्या... सामर्थ्यवान स्त्री ही काही फक्त "दैदिप्यमान" यश मिळवलेली नसते...
ती एक कुमारिका माता असू शकते जिनी समाजाच्या विरोधात जाऊन स्वतः च मूल वाढवलं.
ती एक जातीपाती ची बळी असू शकेल.. जी कायम हिणवली गेली तरी स्वतः च्या हिमतीवर स्वतः च्या पायावर खंबीरपणे उभी राहिली.
ती एक डॉक्टर असू शकते... लहानपणात "चुकीच्या तऱ्हेने" स्पर्श केली गेलेली पण आता इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारी.
ती एक वेश्या असू शकते... स्वतः च्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्या घाणीतनं बाहेर काढायचा प्रयत्न करणारी
ती एक विधवा - घटस्फोटिता - परित्यक्ता असू शकते... नव्याने जगण्याची उमेद गोळा करून स्वतः च अस्तित्व टिकवण्याची धडपड करणारी. 

लक्षात घ्या... ह्या स्त्रिया "तुमच्या कल्पनेतील" किंवा "खऱ्याखुऱ्या" संभोगाच्या उपभोग्य वस्तू ही नाहीत... तुमचं काम करायला ठेवलेल्या दासी नाहीत... की तुमचे लाड करायला तुमची आई नाही.त्या आहेत अतिशय उमद्या, मानानी जगायचा प्रयत्न करणाऱ्या कित्येकदा तुमच्या कैकपट सरस व्यक्ती. त्यांना हवा आहे समजून घेणारा आणि त्यांच्या विषयी आदर बाळगणारा जोडीदार.
त्या जर काही पटलं नाही तर तुम्हाला ऐकवणार आहेत... 
तयारी आहे तुमची?
"स्वतंत्र - सामर्थ्यवान - यशस्वी स्त्री?"

✍🏻 राजदीप 


राहुल गांधी हिंदूच..पण.!



भारतामध्ये लोकशाही मार्गाने राजघराण्याचा अदृश्य मुकुट लाभलेल्या गांधी घराण्याबद्दल अनेकांना हाच विश्वास किंवा अविश्वास असतो. त्यापायीच गांधी घराण्याबद्दल वेगवेगळ्या मजेशीर थिअऱ्या येत असतात. आता राहूल गांधींच्या वागण्याने अनेकदा त्या चर्चेत येत असतात. राहूल गांधी वेडसर आहेत असं अजिबात नाही. आज त्यांच्या ज्या चुका सहज दृग्गोचर होतात, त्या चुका पूर्वीही अनेक नेत्यांनी केल्या आहेत. पण त्यांच्यावेळेला समाजमाध्यमं एवढी प्रभावी नव्हती म्हणून त्या समोर आल्या नाहीत. एरवी आपल्या देशात “पाण्यातून वीज काढली की पाण्याचा कस कमी होतो आणि त्यामुळे शेतीला ते पाणी निरुपयोगी ठरतं” असली अक्कल पाजळणारे उपपंतप्रधानपदी पोहोचलेत.

“गांधी घराण्याच्या धार्मिक मान्यता” हा अनेक भाजपाप्रणित काँग्रेस विरोधकांचा एक आवडता मुद्दा असतो. एखाद्या उसाच्या मळीतून जात असताना दुर्गंध यावा तसा तो प्रत्येक महत्वाच्या निवडणुकीत येत असतो. त्याची सुरवात झाली इंदिरा गांधींपासून.

इंदिरा गांधी फिरोझ गांधी त्यांच्या प्रेमात पडल्या इथपासून ह्या कल्पनाविलासाला सुरवात होते. माहोल कोणताही असो. एखादा कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव असो, की कोणत्याही विषयावरचं आंदोलन, साधा परीक्षेचा अभ्यास असो की अजून कसलं आयोजन. निसर्ग आपलं काम करत असतो. तरुण मुलं मुली एकत्र आली की विचारांची देवाणघेवाण, आचारांचं निरीक्षण यातून प्रेम ही भावना उमलली तर त्यात अजिबात काही गैर नाही. मग मुलगी ब्राह्मण असली आणि मुलगा पारशी असला तरीही निसर्ग थांबत नसतो.

 

फिरोज गांधींच्या धर्मापासून याला सुरवात होते. GHANDY हे त्यांचा आडनाव त्यांनी GANDHI असं बदललं. त्यामागे त्याला सर्वसमावेशकता आणि सर्वमान्यता यावी हा मुद्दा असेलच. पण फिरोझ गांधींनी आपला धर्म बदलला नाही आणि लपवलाही नाही.एरवी पारशी लोक किती कट्टर असतात ते त्यांच्याशी संबंध आलेल्यांनाच ठाऊक असतं. अत्यंत देखण्या आणि कमालीच्या हुशार पारशी मुली धर्माबाहेर जाऊन लग्न करू शकत नाहीत आणि मुलांचीही तीच कथा.उशिरा होणारी लग्न आणि आंतरधर्मीय विवाहांना अजिबातच मान्यता नसणे ह्या गोष्टी पारशी समाजाच्या मुळावर आल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारला ‘जियो पारशी’ योजना राबवावी लागत आहे,यातच सगळं आलं.

त्या पार्श्वभूमीवर फिरोज गांधी यांचं धाडस वाखाणायला हवं. त्यांचं मूळ आडनाव ‘खान’ होतं वगैरे आरोप गेली अनेक दशके होतायत. पण त्याबद्दल कोणताही पुरावा बाहेर आलेला नाही. अगदी संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी केली ह्या मूर्ख मताच्या पुष्टीसाठी फालतू पुरावे जेवढे आले तेवढे ही पुरावे फिरोज गांधी हे फिरोज ‘खान’ होते ह्यासाठी आले नाहीत.

पुढे राजीव गांधींनी सोनिया गांधींशी लग्न केलं आणि त्यांची पुढची पिढी या देशात नांदत्ये.

विभिन्न धर्माच्या जोडप्यांच्या मुलांचा धर्म कोणता? हा मुद्दा आला तर लेकरांना धर्म बापाचा मिळतो. परंतू जर आईचा धर्म मुलांना लावायचा असेल तर तशी मुभा कायद्यात असते. कायदेशीर तरतुदींचा आणि घडामोडींचा अभ्यास केला तर असे प्रसंग दिसून येतील.शिवाय जर ही मुले दोन्ही धर्मांचे संस्कार होत वाढली (उदा: शाहरुख खानची मुले) तर वयाच्या १८ व्या वर्षी या मुलांना आपला धर्म निवडायची मुभा असते. भारतात कागदोपत्री तरी धर्म निवडावा लागतो.

राजीव गांधींनी आईचा धर्म (अन त्यानुषंगाने जात) घेतला. (जरी लौकिकार्थाने ते पारशी ठरतात तरीही).


पुढे राजीव गांधींनी सोनिया गांधी या इटालियन कॅथलिक तरुणीशी लग्न केलं. उभ्या आयुष्यात कधीही सोनिया गांधी कोणाला चर्चमध्ये जाताना दिसल्या नाहीत. सोनिया गांधींचे लग्नानंतर माहेरच्या लोकांबरोबर कोणाला फोटोही दिसले नाहीत. राहुल गांधींनी राजीव गांधींप्रमाणे आईचा धर्म न घेता वडिलांचा धर्म घेतला.

नुकतीच राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला. कारण अहिंदू अभ्यागतांची नोंद ठेवायची पद्धत तिकडे आहे, आणि त्या रजिस्टरमध्ये अहमद पटेल यांच्या बरोबरीने ‘राहुल गांधी जी’ हा उल्लेख सापडला.

अर्थातच ही चूक राहुल गांधींनी केलेली नव्हती. त्यांच्याबरोबर असलेल्या कोणातरी तद्दन मूर्ख आणि बावळट हुजऱ्याने हा शुंभपणा केला हे जगजाहीर आहे. पण गडबड पुढे झाली.

अत्यंत ग्रेसफुली ह्यावरच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी काँग्रेसने राहुल गांधी केवळ हिंदू नाहीत तर ‘जानवंधारी हिंदू’ आहेत असा हास्यास्पद बचाव केला.

 

एवढ्या मोठमोठ्या मंदिरांना भेटी देऊन राहुल गांधी हिंदूंची मतं मिळवायचा हास्यास्पद प्रयत्न करतायत. अश्या मंदिरांना भेटी देऊन हिंदूंच्या मतांची बेगमी होत असती तर जनसंघ आणि भाजप यांनी काँग्रेसमुक्त भारतच नव्हे तर भाजपयुक्त्त भारत केला असता. हिंदुत्ववाद आणि हिंदू हितवाद (ज्याला सॉफ्ट हिंदुत्व हे अत्यंत भंपक आणि पुरोगाम्यांनी रूढ केलेलं चुकीचं नाव आहे) यातला फरक हिंदूंना सबकॉन्शस माईंडमध्ये समजतो. सबकॉन्शस माईंड म्हटलं कारण तो ते आवर्जून समजून घेतात असं नाही.

सोमनाथाच्या देवळात जाऊन वैष्णव आनंदी होत नाहीत. किंवा अयोध्येत राममंदिर बनलं तर शैव समाज आनंदी होणार नाही. आणि समग्र हिंदू समाजाचा लसावि बघितला तर हिंदू समाज मंदिर मशिदीच्या वादावर निवडणुकीत मत देत नाही. पण “मोदींच्या मागे की नई, फक्त ३१ टक्के जनता आहे बरं का” असं चेकाळून चेकाळून सांगणारे हेच पुरोगामी भाजपच्या दिग्विजयाला हिंदुत्वाचा ज्वर समजतात.


भारतातल्या बहुसंख्य हिंदूंच्या अपेक्षा साध्या आणि सरळ आहेत.
मुसलमानांचे लाड कमी व्हावेत (संदर्भ शाहबानो खटला आणि आत्ताचा ट्रिपल तलाकवरचा सायराबानो खटला आणि अनेक प्रकरणे) आणि त्यांची संख्या मर्यादित राहावी. यापलिकडे बिजली सडक पानी आणि रोजगार ह्याच सामान्य अपेक्षा हिंदू समाज ठेवतो. प्रत्येक निवडणुकीआधी इमामना जाऊन भेटणारे नेते (यात अगदी वाजपेयीही आले) पाहिले, तरी जो हिंदू विरुद्ध मतदान करत नाही, तो हिंदू देवळात आला म्हणून त्या नेत्याच्या पक्षाला मतदान करणार आहे काय?

सेक्युलॅरिझमचा आव आणलेला अनेकांना आवडत नाही. २६ /११ नंतर काहीच महिन्यांनी लष्कर ए तोयबा पेक्षा आपल्याला देशातला हिंदू दहशतवाद जास्त गंभीर वाटतो ही भूमिका पुरोगामी काँग्रेसने घेतली. ए के अँटनी सारख्या संतवृत्तीच्या निरलस नेत्याने २०१४ च्या पराभवाच्या अहवालात ह्याच गोष्टीवर बोट ठेवलं होतं. त्यामुळे मुस्लिमांचं लांगुलचालन थांबवणं म्हणजे देवळात वाऱ्या करणं असं नसून हिंदूंना तसा विश्वास देणं हाच मार्ग आहे.

इम्रान मसूद ह्या माणसाने ‘नरेंद्र मोदींचे तुकडे तुकडे करून टाकेन’ असं म्हटल्यावरही हा मनुष्य काँग्रेसच्या तिकिटावर लढू शकतो – ह्यावर काँग्रेसला विचार करावा लागेल. हेच जर एखादा भाजपाला सोनिया किंवा राहुलबद्दल बोलला असता तर पुरोगामी समाजाच्या भावनांना किती ठेच लागली असती ह्याचा विचार काँग्रेसने करावा इतकीच भाजप समर्थक हिंदूंची इच्छा आहे. त्यालाच ते आपलं हित समजतात.

राहता राहिला प्रश्न गांधी घराण्याच्या धार्मिक मान्यतांचा. तर यावर आमच्या एका अत्यंत जवळच्या स्नेह्याचा काळीज पिळवटून टाकणारा किस्सा आहे.

एका संध्याकाळी हे अधिकारी माझ्या वडिलांना भेटले आणि म्हणाले ‘मुलीचं लग्न आहे, माझे वडील म्हणून आशिर्वादाला तरी या’ आम्ही चरकलो. आमचा स्नेह उत्तमच होता हे मान्य पण त्यांची एवढी अपेक्षा असेल असं वाटलं नाही. ते पुढे म्हणाले ‘मुलीने दुसऱ्या समाजतल्या मुलाशी जमवलंय. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझ्याशी संबंध तोडलेत, ते लग्नाला येणार नाहीत’. आजही भारतीय समाजाचा लसावि हाच आहे.

ह्याच पार्श्वभूमीवर एक ब्राह्मण मुलगी पारशी माणसाशी लग्न करते, तिचा मुलगा एका विदेशी कॅथलिक तरुणीला आपली सहचारिणी मानतो आणि त्यांची संतान गळ्यात जानवं घालू शकते…! आणि वर त्या जानव्याचा दाखला ही दिला जातो…!

राजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते. म्हणून त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. गांधी कुटुंबाच्या बाबतीत हे घडून आलं – सामान्य भारतीय समाजात हे इतक्या सहज घडूच शकत नाही. तरीही हे सर्वांच्या बाबतीत घडावं अशी माणसापासून इच्छा आहे. नाहीतर अर्णब गोस्वामी ओरडून ओरडून सांगतो तो व्हीव्हीआयपी रेसिझम हाच.

Tuesday, 28 June 2022

काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ...

काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ...
बंड केल्यानं मंत्रिपद भेटेल,
ही भाबडी आशा, मग होईल निराशा..
काय भाषा,यांची भंगार आशा,
काय सुरत, काय गुवाहटी.. 
स्वार्थासाठी यांची गोड-गोड मिठी,
सखे झाले वैरी अन् वैरी झाले पक्के..  
अहो, तुमचं आमचं कस हाय मग,
सगळं वक्के -वक्के.. 

✍🏻 - राजदीप कठाळे 

Thursday, 16 June 2022

नाठाळाचे माथी हाणू काठी...

तो काळ होता जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे त्या शिक्षणापासून वंचित राहत असत अशातच पुरोगामी विचारांचे असणारे ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना घरातच शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आणि यातूनच १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरु झाली पुढील काही महिन्यातच दलित वसाहतीत त्यांनी शाळा सुरु केली.पुढे हीच क्रांतीची मशाल गावोगावी पोहचली.आणि तेंव्हाच काही उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला.... जग बुडणार .... कली आला असे विखारी विष पेरायला सुरूवात केली यावर हे बांडगुळ थांबले नाहीत त्यांनी अंगावर शेण फेकले, कचरा घाण टाकत काही उन्मत्तानी अंगावर हात टाकण्याची भाषा केली तरीही सावित्री बाई त्यांच्या ध्येयापासून लांब गेल्या नाहीत.
तेंव्हा जर सावित्रीबाई मागे हटल्या असत्या तर काय झाले असते. तर आज शैक्षणिक,सामजिक,राजकीय, प्रशासकीय,आर्थिक,कला,क्रिडा अशा असंख्य ठिकाणी फक्त अन् फक्त पुरुषच असते पण तसे झाले नाही आज राष्ट्रीय पातळी पासून गाव पातळी पर्यंत महिला काम करतायत यास कारण सावित्रीबाईंचा त्याग आणि धैर्य आहे हे विसरता कामा नये..
आज आपण २१ व्या शतकात आहोत, देश विकसनशील होत आहे मागील महिन्यात आपल्याकडे 5 जी नेटवर्क सुरु झालं, अनेक प्रकारचे रेकॉर्डस रचले जातायत तसेच दोन दिवसांपूर्वी झालेला वटपौर्णिमेचा सण ही झाला अशातच एक पुरोगामी विचार मांडला गेला आणि मांडणारी होती एक महिला.. त्या म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, एका जबाबदार पदावरून बोलत असताना त्या म्हणाल्या 'सत्यवानाची सावित्री समजली,पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही' हा विचार त्यांनी मांडला आणि बुरसटलेल्या विचारांनी परत एकदा डोकं वर काढलं. तर थोडस महात्मा ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या काळात जाऊयात जर तेंव्हा हाच विचार त्यांनी आक्रमकपणे मांडला असता तर आज वटपौर्णिमा झाली असती पण वेगळ्या पद्धतीत... मग सावित्रीबाईंना त्रास देणारे विचार आजही आहेत की, फक्त ते आता डिजिटल झाले आहेत.कदाचित हे तंत्रज्ञान शिक्षणामुळेच आले आणि ते पेरायच काम केलं महात्मा फुले यांनी.. शेण, कचरा,घाण याची जागा आता कॉमेंट्सने घेतली ही मोठी शोकांतिका आहे, तेंव्हाही हेचं साध्य करायचं होत धर्म बुडाला.... जग बुडणार....कली आला आता कॉमेंट्समुळे,बुरसटलेल्या विचारांमुळे हे सर्व होणार... होय होणार... 
लक्षात ठेवा .. त्या सावित्रीने शिक्षणासाठी भोगलं पण या सावित्रीच्या लेकी जर पेटून उठल्या तर संहार होईल.
शेवटी एवढंच की,माननीय रुपालीताई यांनी मांडलेला विचार हा प्रत्येक महिला भगिनींच्या उत्कर्षास समर्पित आहे.

                                           - आपलाच 
                                        राजदीप राजेंद्र कठाळे

Thursday, 8 March 2018

आजची 'ती'



आई, बाबा मला मारु नका. मला जगायचंय. मी तुमचीच मुलगी आहे. मग, मला असे दूर का लोटता ? हे हृदयाला पाझर फोडणारे उद्गार अहेत. स्त्री पिंडाचे ( स्त्री भ्रूणाचे) आपण २१ व्या शतकात पदार्पण केले.  विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली, पण आजही आपले विचार निच दर्जाचे आहेत.
श्री.जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली .....
“मी आंतून बोलते आहे” ही कविता खूप बोलकी आहे. जन्माला येण्यापूर्वीच खुडली जाण्याची भीती वाटत असलेल्या स्त्रीजीवाचे आक्रंदन त्यात आहे. तिने असा आक्रोश केला आहे …
“सारा निसर्ग पिसारा, इवल्याशा, डोळ्यांत भरून घ्यायला मी उत्सुक आतुर अधीर!
मग माझ्या जन्मदात्यांचा मेंदू, का बधिर?
पुरुषाला स्त्री हवी, ही सुसंगती तरी माता पित्याला मुलगी नको, ही विसंगती!
कां, का?
जन्माला येण्यापूर्वी माझ्या नरडीला नख लावणारे हे माझे मारेकरी.. जल्लाद!
आईवडिलांच्या रूपांत सल्ला घेताहेत, विज्ञानाचा! …..
मी आतून बोलते, आईच्या कुसण्यातून! मला बाहेर येऊ द्या. मला बाहेर येऊ द्या!” ….
स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्यातर असे पाहण्यात येत आहे की, दुसरे अपत्य असलेल्या (?) मुलींची संख्या ( १००० मुलांचे ) मागे ७५९ आहे. तर प्रत्येक हजार पुरुषांमागे १९९१- ९४५
तर २००१ – ९२७ स्त्रियांची संख्या आहे.
खरे पाहिले तर या जगाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री आणि पुरुष. हा रथ व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर दोन्ही चाके सारख्याच गतीने चालण्यासाठी स्त्री रुपी चाकाला सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे. स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असली पाहिजे. खेड्यातच काय पण अगदी शहरात सुद्धा संध्याकाळी साडे सहा-सात वाजता बाजूच्या दुकानात जायचे तरी १८ वर्षाच्या बहिणीबरोबर ९-१० वर्षाच्या भावाला पाठविले जाते. जोपर्यंत स्त्री अशी रक्षणीय मानली जाईल, तोपर्यंत तिला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणता येणार नाही.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
लेकीचा ग जलम । देव देऊनी चुकला
बैल घाण्याला उपला । जलमभरी
या ओळीतूनच भारतीय स्त्रीची, विशेषतः ग्रामीण स्त्रीची किती दुरवस्था झाली आहे हे स्पष्ट होते.
स्त्रीवर होणाऱ्या या सर्व अत्याचाराचे तिच्या दुःस्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणामकारक दुसरे साधन नाही. एका मुलीला शिकवणे म्हणजे अख्या कुटुंबाला शिकविण्यासारखे आहे. स्त्रियांपुढे गंभीर समस्या आहेत, पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली जाणार नाही. अशी एकही समस्या नाही. त्यासाठी समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री ही त्याग नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आता महिला काबीज करीत आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी तसेच अलिकडच्या काळातल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,किरण बेदी,मीरा बोरवणकर,पूजा ठाकूर,अंजू जॉर्ज,सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोल पंपावर काम करणे, पत्रकारिता ही कामे महिला करु लागल्या आहेत.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे.
हमसे है जमाना सारा
हम जमाने से कम नही,
Girls the best जानलो बात यह मानलो.
सरतेशेवटी एवढंच म्हणेल.....
स्त्रियांना समानता मिळावी म्हणून स्त्रिया लढा देतच आहेत. त्यात त्यांना सपोर्ट करणें, कृतिद्वारें साथ देणें, हें पुरुषांचें कर्तव्यच आहे, आणि तें त्यांनी पाळायलाच हवें. त्याचबरोबर, एकीकडे समाजाशी लढत असतांना, आपल्याच ‘गटातील’ इतरांना (म्हणजे अर्थातच अन्य स्त्रियांना ) , आपण स्वत: ‘फेअर ट्रीटमेंट्’ ( fair treatment ) देणें हेंच योग्य आहे, याचें भान महिलांनी सुटूं न देणें श्रेयस्कर आहे.
‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे.

रा_दीप कठाळे 

Saturday, 10 February 2018

सांगा मोदीसाहेब....


सांगा मोदीसाहेब,शितलीच गुडलक कव्हा भेटणार..
आन,तुमच्या अच्छे दिन च कोडं कव्हा सुटणार..
तुमचा आन परकीय देशांचा झांगडगुत्ता कव्हा सुटणार
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव कव्हा भेटणार
सांगा मोदीसाहेब, शितलीच गुडलक कव्हा भेटणार..
आन, तुमच्या अच्छे दिनच कोडं कव्हा सुटणार ....
काँग्रेसवाल्यांनी काय नाय केलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं
आव....महाराष्ट्राच्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळोवेळी गाजरच दाखवलं.
साठ वर्षात जेवढा त्रास नाही झाला तेवढा तुम्ही आम्हाला तीन,चार वर्षात दिला.
आन, कणखर राकट देशा अश्या या महाराष्ट्रात मंत्रालयाच्या पायरीवर तुमच्या मुख्यमंत्र्यांन आमचा धर्मा पाटील गिळला.
सांगा मोदीसाहेब,शितलीच गुडलक कव्हा भेटणार...
आन,तुमच्या अच्छे दिनच कोडं कव्हा सुटणार ....
तुमच्या पंधरा लाखाच्या नादापाई आमची एक पिढी म्हतारी होणार.
आन, तुम्ही मात्र कोटी कोटीचे कोट घालून साऱ्या गावभर मिरवणार .
सांगा मोदीसाहेब, शितलीच गुडलक कव्हा भेटणार...
आन ,तुमच्या अच्छे दिनच कोडं कव्हा सुटणार....
तुमची 'मन कि बात'आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर बेतणार तर नाही ना.
आन, न्यायाधिशांच्या तोंडून लोकशाही धोक्यात हाय हि तुमची खरी 'मन कि बात' तर नाही ना .
सांगा मोदीसाहेब, शितलीच गुडलक कव्हा भेटणार...
आन ,तुमच्या अच्छे दिनच कोडं कव्हा सुटणार...

स्वरचित लेखन - राजदिप कठाळे, जुन्नर