Wednesday, 31 May 2017

जगाच्या पोशिंद्याचे संपाचे एल्गार

"शेतकरी संपावर जात आहे व त्यांचा संप फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला आता स्वतःसाठी पिकवायचे नाही व बाजारात विकण्यासाठीही पिकवायचे नाही. तो थकलाय. त्यांच्या संपास पाठिंबा देणे हीच देशसेवा आहे."

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाने चिंतेचे टोक गाठले आहे व राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. न्यायमूर्ती रानडे एकदा म्हणाले, ‘‘तो पाहा सुखी, समृद्ध हिंदुस्थान मला दिसत आहे. ही देवांची आवडती भूमी स्वतंत्र आणि मुक्त अशी मला दिसत आहे. रोग नाही, दुष्काळ नाही, अज्ञान नाही, रूढी नाही, भांडण नाही, तंटा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. साऱ्या जाती, सारे धर्म परस्परांशी गुण्यागोविंदाने वागत आहेत. सर्वांना अन्न आहे, वस्त्र आहे, राहायला घरदार आहे असा तो हिंदुस्थान मला दिसत आहे!’’ न्या. रानडे यांच्या विशाल दृष्टीने पाहिलेले हे स्वप्नच होते व स्वराज्याचा लढा त्यासाठीच उभा राहिला. श्रमाचे मोल प्रत्येकाला मिळेल हीच भावना होती, पण न्या. रानडे यांच्या स्वप्नातील ही देवांची आवडती भूमी आज यमाची भूमी झाली आहे. यम खांद्यावर गदा आणि हातात फासाचा दोर घेऊन शेतकऱ्यांच्या दारातच उभा आहे. त्या यमाशी लढण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांशीच लढताना दिसत आहे!

हमी द्याच!

शेतकऱ्यांना आज संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे व त्यासाठी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीस सरळ पाठिंबा दिला. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘आत्मक्लेश’ यात्रा पायीच सुरू केली. त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद राज्यात मिळत आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाचे सदाभाऊ खोत हे मंत्रिमंडळात आहेत व शेतकऱ्यांच्या क्लेशयात्रेत सहभागी होण्याचे त्यांनी नाकारले. सत्ता भल्याभल्यांची मती गुंग करते ती अशी. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ज्यांनी काँग्रेसविरोधात रान उठवले ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांनी याच प्रश्नावर काँग्रेसची सालपटं काढली ते सदाभाऊ खोत मंत्री, पण क्लेश करून व आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे ते म्हणतात. हा शेतकऱ्यांचा पराभव. याच आंदोलनांतून व क्लेशातून सत्ता मिळवली हे विसरणारेच शेतकऱ्यांचे शत्रू झाले आहेत. ज्या प्रश्नांवर मते मागितली त्या प्रश्नांशी प्रतारणा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असून देशात तो सध्या जोरात सुरू आहे. कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय याची लेखी हमी सरकारने विरोधी पक्षाकडे मागितली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी विधानसभेत सांगितले, ‘‘कर्जमाफीची घोषणा करा, आम्ही लेखी हमी द्यायला तयार आहोत!’’ शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी व शेतकऱ्यांच्या संघटनांनी अशी लेखी हमी देऊन सरकारची कोंडी करायला हवी.

तोट्याचे अर्थशास्त्र

शेतीचे अर्थशास्त्र आता फायद्याचे राहिलेले नाही. चांगले पीक येते तेव्हा शेतमालास चांगला भाव मिळत नाही. कांद्यापासून तूरडाळीपर्यंत सध्या हेच सुरू आहे. कांदा पिकाला पाणी देणे बंद केल्याने कांद्याची पात सुकून गेली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुन्हा कांद्याला भाव नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कांदा शेतातच जाळून शेतकऱ्यांनी आत्मक्लेश करून घेतला. कांद्याचा भाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. फायदा नाहीच, पण उत्पादन खर्च मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. एका तरुण शेतकऱ्याने सात एकरांवर लाल कांद्याची लागवड केली. या सात एकरांचे अर्थशास्त्र सगळ्यांनीच समजून घेतले पाहिजे. लागवड, मशागत, खते यासाठी घरातील महिला, लहान मुलांच्या अंगावरील सोन्याचे किडुकमिडुक विकून आलेले पन्नास हजार रुपये खर्च केले. चाळीस हजारांचे दागिने गहान ठेवले. पुन्हा बजाज फायनान्सकडूनही दीड लाख रुपयांचे कर्ज काढून कांदा पिकावर खर्च केले. चांगले उत्पादन काढून दोन पैसे गाठीशी येतील, या अपेक्षेने हे कुटुंब शेतात राबले. मात्र चांगले पीक येऊनही पदरात काहीच पडले नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढला. नोटाबंदीचे कारण देऊन कांदा विकूनही हाती नगद मिळत नाही. सरकार काही करीत नाही म्हणून त्या संतापाच्या भरात त्याने पाच एकरांतील उभ्या कांद्याला आग लावली. सहाशे क्विंटल कांदा नष्ट केला. हा सुद्धा आत्मक्लेश आहे.

भाव का नाही ?

पन्नास वर्षांत शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडलाच नाही म्हणून शेतकऱ्यांनी मोदी यांचे सरकार निवडून दिले आहे. सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असे वचन श्री. मोदी यांनी दिले होते. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतमालास मिळावा ही महत्त्वाची शिफारस स्वामिनाथन आयोगाने केली म्हणजे १०० रुपये उत्पादन खर्च झाला असेल तर शेतकऱ्यास दीडशे रुपये मिळावेत हा साधा मार्ग त्यांनी सांगितला, पण शेतकऱ्यास हमीभाव द्यायला कोणतेही सरकार तयार नाही. गेल्या ४० वर्षात महागाई वाढली. शेती पिकांच्या उत्पादन खर्चात तब्बल ३० पटीने वाढ झाली आहे, पण शेतीमालास बाजारभाव मात्र तोच म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचाच मिळत आहे. शेतकरी ऐंशीच्या दशकात डाळिंब शेतीकडे वळला. तेव्हा किलोचा भाव तीन ते चार रुपये. एकरी उत्पादन खर्च दहा हजार रुपये आणि मजुरीचा रोजचा दर तीन रुपये होता. आजचे चित्र असे आहे की, उत्पादन खर्च दोन लाख रुपये, मजुरी तीनशे ते पाचशे रुपये रोज. मात्र डाळिंबाला तोच भाव किमान पाच व सरासरी दहा रुपये किलो असा मिळतोय. द्राक्षाची परिस्थितीही वेगळी नाही. १९७५ साली द्राक्ष बागेचा एकरी खर्च १५ हजार व किलोचा भाव चार ते पाच रुपये होता. आज एकरी उत्पादन खर्च अडीच लाख रुपये आणि किलोचा भाव पाच रुपये इतकाच आहे. ज्यांना हे कोसळलेले अर्थशास्त्र समजले त्यांना शेतकरी आत्महत्या का करतोय ते लगेच समजेल!

‘‘शेतकरी जगला तर देश जगला,’’ अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली होती व शंभर वर्षांनंतरही आपण त्याच घोषणेच्या चिपळ्या वाजवीत आहोत. शेतकऱ्यांनी अनेकदा बंड केले ते चिरडून टाकले. कर्ज फेडण्याची ऐपत नसल्याने वसुलीस गेलेल्या सावकारांविरुद्ध बंड करून त्यांची नाके कापली गेली. हे ब्रिटिश काळात घडले. काही दिवसांपूर्वी  शेतकऱ्यांनी दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर स्वतःची विष्ठा खाऊन आंदोलन केले. हे ब्रिटिश राजवटीपेक्षा भयंकर आहे. हिंदुस्थान अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. कोणत्याही संकटाना तोंड देण्याची लहान शेतकऱ्यांची ताकद वाढविल्याशिवाय सुधारणा होणार नाही. छोटा शेतकरी देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घरावर सोन्याची कौले नकोत तर त्यांच्या मालास हमीभाव हवा. शेतकरी हा एकसंध नव्हता, आजही नाही. शेतकरी आज संपावर निघाला आहे व त्यांच्या संपास आज अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या संपास शहरातील लोकांनी पाठिंबा दिल्याशिवाय त्यांच्या चुली पुन्हा पेटणार नाहीत. आमदार, खासदारांना पेन्शन मिळू शकते मग शेतकऱ्याला कर्जमाफी का नाही मिळू शकत. ‘किसान’ मरतो तेव्हा त्यास बेदखल केले जाते. हे थांबणारे राज्य कधी येईल काय?
         
               सांगा ......माझ्या बापानं नाही पेरला पेरा 
                              तर तुम्ही काय खाल धत्तूरा 
  #तुमचा शेतकरी पुत्र
   दीपक कठाळे 

Friday, 12 May 2017

बेताल बहु बोलती…


                       भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर अत्यंत असंवेदनशील आणि अवहेलनात्मक भाषेत केलेले विधान अवघ्या महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे. एका शेतकऱ्याच्या घराण्यात जन्म घेतलेले दानवे यांच्याकडून असल्या विधानाची अपेक्षाही करवत नाही. आता दानवे यांनी मानभावीपणा दाखवत या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी `बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ हेच खरे. `एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात…` असे विधान दानवे यांनी, जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. हे वक्तव्य करताना रावसाहेब दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. महाराष्ट्रात सध्या तूर खरेदीच्या प्रश्नावरून हवा तापलेली आहे.
यंदा राज्यात तूर उत्पादन विक्रमी झाले आहे, त्यातच नाफेडने तुरीच्या खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने या केंद्रांबाहेर शेतकऱ्याची तूर पडून आहे. जी तूर खरेदी वेळेत झाली तीही शेतकऱ्याकडून न होता व्यापाऱ्यांंकडून झाली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश भागातील तूर उत्पादक शेतकऱ्याची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहिर अशी झाली आहे. यातून मार्ग काढण्याऐवजी शेतकऱ्यांना क्लेश होईल अशा भाषेत त्यांची संभावना दानवे यांनी केल्यामुळे सरकारी पक्ष शेतकऱ्याविषयी किती सहानुभूती बाळगून आहे, हे स्पष्ट होते. `कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा’, असा `सल्ला’ही रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांना दिला आहे. अर्थात, भारतातील राजकीय परंपरेनुसार केलेल्या विधानापासून माघार घेणारे दानवे हे काही पहिले नेते नाहीत. शेतकर्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. शेतकर्यांचे दुःख मला माहिती आहे. त्यामुळे मी कधीही अपशब्द वापरू शकत नाही, असे दानवे म्हणाले. जालना येथील बैठकीत एका कार्यकर्त्याने तुरीचा प्रश्न उपस्थित केला होता. `माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. शेतकर्यांची बाजू घेत मी 35 वर्षे राजकारणात आहे. माझ्या आणि कार्यकर्त्यांमधील संवादाला शेतकर्यांशी जोडू नये. त्यानंतरही शेतकर्यांची मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, अशा शब्दांत दानवेंनी खेद व्यक्त केला. दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी आणि विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही टीका केली होती. दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. सोशल मीडियावरही दानवेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात होता. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्याच फायद्याचेच आहे, असे सांगत दानवेंना खोचक टोला लगावला. विरोधकांनी दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करू नये. कारण दानवेंच्या अशाप्रकारच्या वक्तव्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असे पवार म्हणाले.
तर धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला माफ करता येणार नाही, आम्ही याचा निषेध करणार असून राज्यात त्यांचे फिरणेही मुश्कील करु असा इशाराच दिला आहे. दानवेंचे वक्तव्य राज्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. या वक्तव्याने सत्तारुढ भाजप नेत्यांच्या मनातील शेतकर्यांबद्दलची खदखद बाहेर आली असे मुंडे म्हणाले. राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. तूर उत्पादक शेतकरीही दर कोसळल्याने त्रस्त झाले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला असताना दानवेंनी बेजबादार, अपमानास्पद विधान करुन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विरोधी पक्ष तसेच शेतकर्यांच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला, तो स्वाभाविकच म्हणायला हवा. बेतालपणे बोलण्याची दानवे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ नसतानाही दुष्काळाचे खोटे चित्र उभे करुन शेतकर्यांना मदत दिल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. शेतकर्यांना कर्जमुक्ती हवी असेल
तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशी हमी द्यावी असे विधान केल्याने रावसाहेब दानवेंवर यापूर्वी खरमरीत टीका झाली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बोलताना दानवे यांनी, `तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे दय़ा, मी नोटा बदलून देतो’ असे विधान केले होते. पैठणमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी `मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री लक्ष्मी घरी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा’, असे वादग्रस्त विधान केले होते. शेतकर्यांबद्दल अशाप्रकारे विधाने करून राज्यकर्त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने एकंदरीतच सरकार या प्रश्नाबद्दल किती गंभीर आहे याचाच पुरावा दिला आहे. शेतकर्यांची कर्जमाफी हा मुद्दा विरोधकांनी हाती घेतला असताना सत्ताधारी पक्षातर्फे त्याला योग्यप्रकारे प्रतिवाद करण्याऐवजी दानवेंसारखे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेतेच अशी चक्रमसारखी बडबड करीत असतील तर राज्यातील शेतकर्यांचे भवितव्य काय असू शकेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज उरणार नाही.

तुमचा 
दीपक  कठाळे 

सरकारने दिली शेतकऱ्याच्या हातावर तुरी


कसा वाचणार शेतकरी? कशा थांबणार आत्महत्या? कसा उभा राहील कोसळून पडलेला शेतकरी? व्यापारी लुबाडतात आणि सरकार नागवतं. या वर्षी तर शेतक-यांना हात देऊन उभं करायचं तर सोडाच, परंतु सरकारने शेतक-यांची थेट फसवणूक केली आहे.
बाजारात तुरीचे भाव वाढले तेव्हा शेतक-यांना तूर लागवडीचे आवाहन केले.
तुमची तूर बाजारात आल्यानंतर किमान ९५ रुपये किलोने खरेदी करण्याची हमी दिली. परंतु सरकारने केवळ दोन हजार क्विंटलच्या खरेदीनंतर खरेदी केंद्रं बंद केली आहेत. जोपर्यंत तुरीचे पीक शेतात होते तोपर्यंत तुरीचे भाव दोनशे रुपये किलोवर गेले होते. आता शेतक-यांच्या घरात तूर आली तर हे भाव पुन्हा साडेसहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शासनाने ९५ रुपये किलो दर देतो म्हणून शेतक-यांनी तूर पेरली. आता तो भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या शेतक-याने आत्महत्या केली, तर त्याला सरकारशिवाय कोण जबाबदार असेल ?
तूरडाळीचे भाव सात-आठ महिन्यांपूर्वी २०० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचले आणि आमचे शहरी माणसं अस्वस्थ झाली. महागाई भडकल्याचे गळे काढले गेले. तूरडाळीचे भाव सरकारने कमी करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. मग सरकारही लगेच तत्पर झाले. धडाधड तूरडाळींची साठेबाजी केलेल्या गोदामांवर धाडी टाकण्यात आल्या. लाखो क्विंटल डाळी जप्त करण्यात आल्या. आपल्या तत्परतेची माहिती सरकार रोज प्रसारमाध्यमांना देऊ लागले. मात्र या जप्त केलेल्या डाळींचे काय झाले? याचे उत्तर शेवटपर्यंत सामान्य माणसाला कळले नाही. साधारण जून महिन्यांपासून तूरडाळीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबपर्यंत त्यांचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचले. ऑक्टोबरमध्ये म्हणजे दसरा-दिवाळीच्या तोंडावर एकंदरच डाळींच्या भाववाढीचा उद्रेक झाला. राजकीय पक्षांनी मोर्चे काढले, सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. मग सरकारने डाळीच्या गोदामावर धाडी टाकायला सुरुवात केली.
डाळीचे भाव वाढल्यामुळे सर्वानी मोठा कांगावा केला. पण हे भाव का वाढले ? या वाढलेल्या भावाचा शेतक-यांना लाभ झाला का ? तर अजितबात नाही. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान शेतक-यांची नवी तूर बाजारात आली तेव्हा सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे ६० ते ६५ रुपये किलो इतकाच भाव होता. (आजही तो त्याच बिंदूवर येऊन थांबला आहे.) पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा तगादा असल्याने जसा शेतातला माल घरात येतो, तसा शेतकरी आपला माल बाजारात आणतो. शेतक-यांची ही निकड व्यापा-यांना माहीत असल्याने ज्या वेळी शेतक-यांचा ताजा माल बाजारात येतो, नेमके त्याच वेळी व्यापारी संगनमताने भाव पाडतात. त्यामुळे आहे त्या भावात शेतक-यांनी तुरी व्यापा-यांच्या घशात घातल्या. व्यापा-यांनी या तुरीची साठेबाजी केली. खरे तर जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करण्यावर बंदी घातली पाहिजे. किमान ज्या वेळी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी तर ती कारवाई केलीच पाहिजे. राज्य सरकारला त्याची जाणीव होत नसेल तर केंद्र सरकारकडून तशा सूचना दिल्या जातात.
गेल्या वर्षी साधारण जून महिन्याच्या सुमारास तूरडाळीची भाववाढ होण्याचे संकेत मिळताच केंद्र सरकारकडून राज्य सरकारला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारकडून साठेबाजीवर नियंत्रण आणण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली. मात्र त्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. परिणामी गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या तोंडावरच डाळींचे बाजारभाव आवाक्याबाहेर गेले. ‘अच्छे दिन आयेंगे। महंगाई कम करेंगे’ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात यापूर्वी कधीही झाली नाही इतकी भाववाढ झाली. त्यामुळे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर सरकार जागे झाले आणि धडाधड एका रात्रीत धाडी टाकून लाखो टन डाळी जप्त केल्या.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि धाडी टाकून जप्त केलेली डाळ दिवाळीच्या पूर्वी स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा केली. मात्र दिवाळीच काय त्यानंतर पुढे दोन महिने डाळी स्वस्त झाल्या नाहीत. जप्त केलेली डाळ कशी बाजारात आणायची यावरच खल होत राहिला. सुरुवातीला सरकार म्हणाले, ही डाळ सरकार बाजारात आणील. नंतर म्हणाले, व्यापा-यांकडून बॉण्ड घेऊन व्यापा-यांना डाळ स्वस्त दरात विकण्यासाठी राजी केले जाईल. या घोळात दोन महिने निघून गेले. दरम्यान डाळीचा बाजारातील तुटवडा कमी करण्यासाठी परदेशातून डाळ आयात करण्यात आली. ती आयात केलेली डाळही दोन महिने बंदरात पडून होती.
तूरडाळीवरून राज्यात एकच चर्चा सुरू झाली. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत डाळीच्या भाववाढीवर करण्यात येणारे उपाय सांगितले. नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलने तुरीच्या डाळीचे दर कमी करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डाळ आयात करण्यात येत आहे. जी डाळ जप्त करण्यात आली आहे ती स्वस्त दरात बाजारात आणण्यात येईल, असे सांगितले. तर त्यांच्या भाषेत दीर्घकालीन योजना म्हणून डाळीचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी तूर लागडीला प्रोत्साहन देण्यात येईल, त्यांना चांगले बियाणे देण्यात येईल आणि तुरीला शाश्वत भाव देण्याची हमी देण्यात येईल, असे सांगून तूर ९५ रुपये किलोने खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तूरडाळीच्या भावावरून राज्यात रण पेटले होते, तेव्हा शेतकरी मात्र खूश होता. या वर्षी आपल्या तुरीला चांगला भाव मिळेल, असा विचार तो करीत होता. १२० ते १३० रुपये प्रति किलो भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी तितका नाही मिळाला तरी ९५ रुपये किलो भावाने तूर खरेदी करण्याची सरकारने हमी दिलेली आहे, हा मोठा दिलासा शेतक-यांना होता. परंतु आज काय घडले आहे? शेतक-यांच्या शेतातील तुरीचे पीक घरात आले आणि घरातून बाजारात गेले तेव्हा भाव धाडकन कोसळले. आज तुरीचे भाव हे ६० ते ६५ रुपये किलो आहेत. ९५ रुपये किलो खरेदी करण्याचे सरकारने आश्वासन दिले खरे, पण यवतमाळ जिल्ह्यात फक्त दोन खरेदी केंद्रं सुरू केली. केवळ दोन हजार क्विंटल तूर खरेदी केल्यानंतर ती खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली आहेत. आता शेतक-यांना आपली तूर ही ६० ते ६५ रुपये किलोने व्यापा-यांच्या घशात घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही शेतक-यांची केलेली घोर फसवणूक आहे.
गेल्या वर्षी शेतक-याची तूर बाजारात आली तेव्हा ६० किलोचा भाव. शेतक-यांकडील तूर संपताच २०० रुपये किलोचा भाव आणि आता पुन्हा ६५ रुपये भाव, हा योगायोग आहे काय? तर तसे म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी केंद्राने सूचना देऊनही साठेबाजीवर नियंत्रण आणले नाही, याचा अर्थ काही व्यापा-यांना साठेबाजी करता यावी यासाठीच त्याकडे दुर्लक्ष केले. या मागे केवळ व्यापा-यांचा लाभ व्हावा, हाच उद्देश दिसतो. या देशातील व्यापा-यांनी, उद्योपतींनी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार यावे म्हणून जी मदत केली, त्यासाठीच व्यापारीधार्जिणी धोरणे आखली जात आहेत, असा जो आरोप विरोधकांकडून केला जात आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. आता सरकारने किमान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९५ रुपये किलो दराने तूर खरेदी करावी. सरकार ते करीत नसेल तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला ते करण्यास भाग पाडावे, अन्यथा शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला सर्वस्वी सरकारने केलेली फसवणूक कारणीभूत असेल.
 उद्याच्या स्वास्थ्यासाठी आजच कामाला लागू या
  तुमचा- दीपक कठाळे