मुळशी तालुक्यातील माण गावातीली बाळूबाई सुदाम धुमाळ या अशिक्षित महिलेने घरच्या गरिबीमुळे पोटाची खळगी भागविण्यासाठी भंगार गोळा करून ते विक्री करायला सुरवात केली. पुढे तिने या भंगारातच व्यवसाय शोधला आणि वाढवलाही. आज तिने या व्यवसायातून हजोरो नाही, लाखो नाही तर कोटी रुपयांची उलाढाल चालविली आहे. त्यातून अनेक महिलांना आणि तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आर्थिक परिस्थिती आणि अशिक्षतपणा यावर मात करून तिने केलेली प्रगती थक्क करणारी आणि समाजातील सर्व स्तरातील महिलांना लढण्याची जिद्द आणि प्रेरणा देणारी आहे.
बाळूबाई धुमाळ यांचे माहेर हवेली तालुक्यातील चिखली. विष्णू आणि शांताबाई या दांपत्याच्या पोटी सन 1952 त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. धाकटा भाऊ बाळासाहेब हा सहा महिन्यांचा असताना त्यांच्या आईचे छत्र हरवले. त्यानंतर मोठा भाऊ नामदेव यांनी सर्व भावंडांचा संभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षी बाळूबाई यांचे मुळशी तालुक्यातील माण येथील सुदाम धुमाळ यांच्याशी लग्न झाले. 20 ते 25 सदस्यांच्या कुटंबात बाळूबाईंना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. हलाखीच्या परिस्थितीत संसारात दोन मुली, एक मुलगा असा त्यांचा प्रपंच होता. एकत्र कुटुंबात बाळूबाईंना शेतीतील कामाशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्यांच्यातील करारी स्त्री त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस 35 वया वर्षी त्यांना स्वतंत्रपणे मुले व पतीबरोबर त्या गावातील गवारवाडी येथील वस्तीवर राहू लागल्या.
तेथे स्वतंत्र राहत असल्यामुळे बाळूबाईंच्या कतृत्वाला दिशा मिळाली. एका वर्षांनंतर त्या रोजगारासाठी त्या चिखली येथे गेल्या. तेथे त्यांचे पती एका कंपनीत वाचमनची नोकरी करू लागले, तर बाळूबाई घर संभाळू लागल्या. तेथे त्यांनी पाहिले की काही महिला भंगार गोळा करत असत. त्यामुळे बाळूबाईंनीही भंगार गोळा करायला सुरवात केली, पण त्यांनी असे भंगार गोळा करणे त्यांना त्यांच्या भावाला आवडले नाही. त्यामुळे बाळूबाई पुन्हा आपल्या गावी आल्या. पण त्यांच्यातील व्यवसायिक त्यांना सवस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला. तोही भंगाराचाच.
त्यावेळी मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात औद्योगीक वसाहत भरभराटीस येत होती. बाळूबाईंनी या परिसरातील कंपन्यांमधील स्क्रॅप व इतर भंगार मिळविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना परिसरातील अनेक कंपन्यांचे उंबरे झिजवले. कंपनीच्या मालकांशी अगदी खेडवळ भाषेत बोलून भंगार देण्याची विनंती केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सुरवातीला त्यांना फक्त पाच किलो भंगार मिळाले. पण त्यांना प्रयत्न करणे सोडले नाही. त्यांच्यातील चिकाटी आणि प्रामाणिकपणा पाहून अनेक कंपन्यांनी त्यांना आपल्याकडील स्क्रॅप देण्यास सुरवात केली आणि बाळूबाईंचा भंगाराचा व्यवसाय भरभराटीस आला. आज 25 वर्षांनंतर त्यांच्या व्यवसायाची उलाढाल काही कोटीच्या घरात गेली आहे. त्यातून त्यांनी अनेक महिला आणि तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. परंतु आजही या वयातही त्या आपला व्यवसाय स्वतः सांभाळतात. कामावरील त्यांची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही. एखाद्या कंपनीतून फोन आला, की त्या स्वतः हजर होतात. वयाची साठी ओलांडली तरीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.
बाळूबाई यांची वारकरी संप्रदायावर निष्ठा आहे. त्या नित्यनियमाने पंढरपूर, देहू, आळंदीची वारी करतात. पंढरीच्या विठ्ठलावर त्यांची मोठी निष्ठा आहे. त्यातून त्या आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा समाजातील गरीबांसाठी खर्च करतात. त्यांनी आपल्या घराजवळ पांडुरंगाचे भव्य मंदिर बांधले आहे. तसेच, त्या दरवर्षी शेकडो भाविकांना आपल्या वतीने विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा घडवून आणतात.
कामावरिल निष्ठेमुळेच माझ्या व्यवसायाची व माझी भरभराट झाली, असे त्या सांगतात. खरचं बाळूबाई आज सर्व स्त्रीयांसाठी आयडॉल झाल्या आहेत.
संकलन- रसिका कंक
शब्दांकन - दीपक कठाळे
No comments:
Post a Comment