Tuesday, 27 December 2016

भावलेली स्मिता पाटील

'अर्धसत्‍य','शक्‍ती','बाजार','उंबरठा','जैत रे जैत','मिर्च मसाला'या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने चित्रपटसृष्‍टीत दरारा निर्माण करणा-या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 13 डिसेंबर रोजी स्‍मृतीदिन होता त्यानिमित्त.
          दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे.मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले,हासवले,विचार करायला भाग पाडले.स्मिता पाटील यांना जाऊन आज 25 वर्षे झाली.परंतु,चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव तोंडात येते.स्मितानंतर हिंदी आणि मराठीतही अनेक अभिनेत्री आल्‍या आणि गेल्‍या,पण स्मिताचे नाव कधीच विस्‍मरणात जाणार नाही.सध्‍याच्‍या पिढीला स्मिता पाटील कधीच भेटणार नाहीत,पण आई-वडिलांकडून त्‍यांच्‍या आठवणीतील‍स्मिता मात्र नक्‍कीच भेटत राहणार.
       वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला 1975 मध्‍ये'चरणदास चोर'या चित्रपटात घेतले.पहिल्‍याच चित्रपटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुक झाले.त्‍यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
        1970-80च्‍या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली.समाजातील अनेक प्रश्‍नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले.मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्‍यामुळे तिला सामाजिक प्रश्‍नांविषयी कळवळा होता.तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.त्‍यामुळे'मिर्च मसाला'मधील सोनबाई,'अर्थ'मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली.मराठीतील'उंबरठा'चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे,असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटत.समांतर चित्रपटांनंतर तिने काही व्‍यावसायिक चित्रपटही केले.'शक्‍ती','नमकहलाल'हे तिचे व्‍यावसायिक चित्रपटही सुप‍रहिट झाले.श्‍याम बेनेगल,रमेश सिप्‍पी,बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्‍दर्शकांची स्मिता आवडती अभिनेत्री होती.
          असे म्‍हणतात की,स्मिताचे डोळे खूप बोलके होते. तिच्‍या नजरेत वेगळी चमक होती.वाचिक अभिनयाबरोबरच डोळ्यांच्‍या माध्‍यमातून सां‍केतिक अभिनय करण्‍यातही तिचा हातखंडा होता.विलक्षण अभिनय,सुंदर डोळे,अतिशय हुशार,सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्‍येक अभिनेत्री जपण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत.पण,'अशी स्मिता पाटील आता होणे नाही'हेच खरे...

गाणं वाजू द्या ...."ख्वाडा" गावरान एक मेजवानी

सतत शहरी, ग्रामीण सिनेमे पाहिल्यामुळं तयार झालेल्या अदृश्य चौकटीला भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'ख्वाडा' आपल्या भाषेने, आशयाने, मांडणीने मोडतो. एक अस्सल अनुभव देतो. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी 'ख्वाडा'चं नाव कुणालाही माहीत नव्हतं. स्पेशल ज्युरीचं अॅवॉर्ड मिळाल्यानंतर भाऊराव प्रकाशात आला. 'ख्वाडा'बद्दलचं कुतूहल याच पुरस्काराने वाढवलं. इथे दिग्दर्शक स्वतःच चित्रपटाचा लेखक असल्यानं त्याच्या डोळ्यासमोर उभा असलेला चित्रपटच त्याने कोणतीही तडजोड न करता पडद्यावर मांडला आहे. त्यामुळं 'ख्वाडा' ही एक फक्कड गावरान मेजवानी झाली आहे. 
                ही गोष्ट धनगर समाजाची आहे. साहजिकच गोष्टीत त्यांचं जिणं.. त्यांचं समाजात असलेलं अदृश्य स्थान.. त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेणारी शिक्षित यंत्रणा.. अशा छोट्या परंतु महत्त्वाच्या जागाही दिग्दर्शक न बोलता 'दाखवतो'. तेवढ्यावरच न थांबता, या मंडळींना आपली ओळख पुसून अपरिहार्यपणे कशी शहरीकरणाची वाट धरावी लागतेय हेही सूचित करतो. सर्वसाधारणपणे हे सगळं दाखवणारा सिनेमा शोकात्म असतो. हा सिनेमा तसा नाही. म्हणजे डोईवर छत नसताना, सगळं जिणं भटकंतीत खर्च होत असतानाही वाट्याला आलेल्या जगण्यात ही लोकं समाधानी आहेत. त्यांच्यात असलेला पिढीचा संघषं इथेही आहे. म्हणजे बापासारखं भटकंतीचं जिणं पुढच्या पिढीला मान्य नाही. इथेही मुलांना शिकायचंय. मोठं व्हायचंय. या लोकांना स्वतःसह आपल्या कुटुंबाचा विकास हवाय. हा लढा सुरू असताना प्रस्थापित समाजमान्य प्रवृत्ती बेमुर्वतपणे या मंडळींच्या जगण्यात ख्वाडा (खोडा) घालताना दिसतात. त्याची ही    गोष्ट.                                             
                    गोष्ट रघु कऱ्हे यांची आहे. रघू धनगर आहेत.मेंढरांचा कळप घेऊन या शेतावरून त्या शेताकडे जात राहात जगणं त्यांनी स्वीकारलंय. रघुला बायको, दोन मुलं आहेत. थोरला पांडा आणि धाकला बाळू. पांडाचं लग्न झालंय. वडिलांचं जगणं त्याने स्वीकारलंय. बाळूला पैलवानकीचा नाद. व्यायाम, कुस्ती त्याचे छंद. वडिलांचं असं गावोगाव भटकणं त्याला मान्य नाही. बाळू काहीसा अबोल, स्वप्नाळू आहे. मिसरुड फुटलेला, वयात आलेला बाळू लग्नासाठी बाशिंग बांधून तयार आहे. त्याला स्वप्नंही पडतात लग्नाचीच. या वर्षी पाऊस कमी आहे. चाऱ्यासाठी फिरता फिरता कऱ्हे कुटुंब एका गावानजिक येतं. गावचे सरपंच अशोकराव दमदाटी, बळजबरी करण्यात मुलखाचे कुप्रसिद्ध. कुणाच्याही वाट्याला न जाणाऱ्या कऱ्हे कुटुंबाची गाठ या सरपंचाशी पडते. सरपंचाची अरेरावी आत्ममग्न अशा बाळूच्या डोक्यात जाऊ लागते. सरपंच आणि बाळू यांच्यातल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. 

                                                                     कथेचा अतिशय बारकाईने पटकथा विस्तार झालेला दिसतो. शशांक शेंडे, अनिल नगरकर हे ओळखीचे चेहरे वगळता यातली सगळी मंडळी नवी आहेत. सिनेमा या माध्यमाशी त्यांची ओळख नसणं याचा फार उत्तम वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे. गावातल्या गाडीवान माळीबाबांपासून बाळूचं लग्न ठरलेल्या हंडाळ बंधुंपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी अचूक माणसांची निवड झाली आहे. यांची कामंही लक्षात राहणारी. सिनेमात बोलली जाणारी टिपिकल धनगरी भाषा या कलाकारांना अवगत असेलही कदाचित. पण अशांकडून यशस्वी काम काढून घेणं याचं पुरेपूर श्रेय दिग्दर्शकाला दिलं पाहिजे. संवादही सोपे. रोजच्या जगण्यातले गरजेपुरते. यातली गावरान भाषा आहे मराठीच. यातल्या काही शब्दांचा नेमका अर्थबोध होईलच असं नाही. पण यातून अडत काही नाही. या भाषेमुळेच हा सगळा प्रकार रुचकर, रांगडा बनला आहे. 

            कॅमेरा हाताळणीत थोडा नवखेपणा आहे. पण सिनेमाच्या भाषेला तो पूरक ठरतो. संकलनात मात्र दोन तीन ठिकाणी 'जर्क' बसतात. संगीत चपखल झालं आहे. अवाजवी वाद्यमेळांचा मोह टाळून अचूक आणि नेमकं पार्श्वसंगीत दिल्याने ते दृश्यांमध्ये पूर्णतः विरघळलेलं दिसतं. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो शशांक शेंडे यांचा. रघु कऱ्हे शिवराळ, शीघ्रकोपी असला तरी कुटुंबवत्सल आहे. मेंढ्यांमध्ये त्याचा जीव अडकलाय. फारच सहज त्यांनी रघुचे पदर उलगडून दाखवलेत. अनिल नगरकर यांचा सरपंचही तितकाच रांगडा, जरबी. रघु, पांडा, सरपंच या थेट पटकथेत दिसणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. पटकथेत न दिसणाऱ्या पण खमक्या वर आलेल्यांमध्ये बाळू, रघुची बायको यांची दखल घ्यावी लागते. भाऊसाहेब शिंदे यांनी साकारलेला बाळू कमालीचा स्वप्नाळू, आपल्याच धुंदीत जगणारा पण पैलवानी स्वभावाचा झाला आहे. चित्रपटाचा नायक तो असला तरी संपूर्ण सिनेमात सर्वात कमी संवाद असतील ते त्याच्या वाट्यालाच. परंतु, हावभावातून तो भाव खाऊन गेला आहे. सरपंचाच्या तालमीत त्याने रंगवलेली कुस्ती तर लाजवाब. तशीच शेवटी असलेली घोडेस्वारीही. खोगीर न वापरता घोडेस्वारी हे भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणतं. तिथे या सर्वच कलाकारांनी मेहनतीने ही कामगिरी पार पाडली आहे. 

           एकुणच  हा अत्यंत विचारपूर्वक केलेला सिनेमा आहे. जे आहे ते अस्सल आहे. 'असं' जेवण मिळणं शहरीकरणामुळे अलिकडे कमी कमीच होत चाललंय. पुन्हा एकदा लाभ घ्यायलाच हवा.
    दिपक

प्रेमकहाणीला सॅल्युट !

 लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से ऐकले असाल. पण ही कहाणी आहे सांगलीच्या एका प्रेमवीराची, पाटलाच्या पोराची. ही कथा वाचून तुम्हीही यांच्या प्रेमाला सॅल्युट कराल.
प्रेयसीला कॅन्सर आहे, याची पूर्ण जाणीव असूनही फक्त निस्वार्थ प्रेमासाठी त्याने तिच्याशी लग्न केलं. फक्त लग्नच केलं नाही, तर तो तिच्या पाठिशी एखाद्या पहाडासारखा उभा राहिला. कॅन्सरने अखेर तिचा बळी घेतलाच, पण त्यांची प्रेमकहाणी अमर राहिली.
 
       सांगलीचा प्रवीण, अहमदाबादची हितार्थी
सांगलीच्या प्रवीण पाटीलचं गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या हितार्थी पारिखसोबत 2010 मध्ये लग्न झालं होतं. प्रवीण आणि हितार्थी हे 2008 पासून एकमेकांना ओळखत होते. प्रवीण कामानिमित्त अहमदाबादला गेला होता, तेव्हा त्याची हितार्थीसोबत ओळख झाली.
              मैत्रीचं रुपांतर प्रेमात
दोघांची भेट झाली तेव्हा प्रवीण 26 आणि हितार्थी 25 वर्षांची होती. हितार्थी एका कंपनी जॉब कन्स्ल्टंट म्हणून काम पाहत होती. यावेळी तिची प्रवीणशी मैत्री झाली आणि पुढे त्याचं रुपांतर प्रेमात झालं.
 प्रवीणला अंधारात ठेवलं नाही
   प्रवीणशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर, हितार्थीने सर्वात आधी आपल्या आजाराबद्दलची माहिती प्रवीणला दिली. 2007 सालीच आपल्याला कॅन्सर झाल्याचं हितार्थीने प्रवीणला सांगितलं.

  निस्वार्थी प्रेमासमोर सर्व काही फिकं
हितार्थीने आपल्या आजाराची माहिती दिल्यानंतरही, प्रवीणचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. उलट आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदात घालवण्याचा मानस, प्रवीणने बांधला.
  प्रवीणचा लग्नाचा प्रस्ताव, हितार्थीचे कुटुंबियांचा नकार
प्रवीण आणि हितार्थी एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग बनले होते. दरम्यानच्या काळात हितार्थीचा आजार बळावत गेला. मात्र या प्रत्येकवेळी प्रवीण बुलंद पहाडासारखा हितार्थीच्या मागे उभा होता. प्रवीणने 2010 मध्ये हितार्थीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आपल्या आजारपणाबद्दल माहित असूनही, प्रवीण आपल्याकडे आयुष्याची साथ मागत आहे, या कल्पनेनेच हितार्थीचा बांध फुटला. प्रवीणने मग थेट हितार्थीच्या कुटुंबियांकडेच हितार्थीचा हात मागितला. मात्र त्याला तिच्या कुटुंबियांकडून नकार मिळाला. प्रवीणला फसवणं त्यांना मान्य नव्हतं. पण प्रवीणच्या आग्रहाखातर कुटुंबियांना माघार घ्यावी लागली.
     प्रवीणचा प्रस्ताव, कुटुंबिय चकीत
सर्व वास्तव माहित असूनही, प्रवीणने हितार्थीचा हात मागितल्यामुळे, तिचे कुटुंबीय चकीत झाले. मात्र हितार्थीही प्रवीणला साथ द्यायला तयार झाली होती. तिच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तिला त्याच्यासोबत घालवायचा होता, असं हितार्थीचे वडिल सांगतात. यानंतर मग अखेर 2010 ला प्रवीण आणि हितार्थी लग्नबंधनात अडकले. त्यांचा संसार सुरु होता, मात्र त्याचवेळी सोन्यासारख्या संसारावर काळवंडलेला कॅन्सरचा डाग, गडद होत चालला होता.
हितार्थीच्या उपचारासाठी प्रवीणचे 10 लाख खर्च
सामान्यत: नवविवाहित जोडपं पहिली काही वर्षे स्वप्नाच्या दुनियेत असतात. माझं घर, माझा संसार, पै पाहुणे आणि गोतावळ्यांमध्ये अडकून पडतात. मात्र हितार्थीसाठी थेट कॅन्सरला चॅलेंज दिलेल्या प्रवीणने, सुरुवातीपासूनच तिच्या उपचारासाठी धडपड सुरु केली. हितार्थीवर 2011 मध्ये व्हिपल सर्जरी, 2012 आणि 2014 मध्ये लिव्हर सर्जरी करण्यात आली. यादरम्यान प्रवीणने सुमारे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केले. पाण्यासारखा पैसा ओतून त्याचा फायदा नाही, हे प्रवीणला माहित होतं. मात्र त्याने हार मानली नाही. हितार्थीला रक्ताची गरज होती तेव्हा प्रवीणने तो काम करत असलेल्या कंपनीतील सहकाऱ्यांना हाक दिली आणि रक्तदानासाठी मित्रांची रांग लागली. तब्बल 21 सहकारी प्रवीणच्या हाकेला धावून आले.

      इलाज हरला
हितार्थीसाठी प्रवीणने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र शेवटी 18 मे 2015 ला सर्व इलाज हरले. हितार्थी प्रवीणची साथ सोडून निघून गेली. कॅन्सरने तिचा बळी घेतला, पण प्रवीण-हितार्थीची ही प्रेमकहाणी अमर झाली!

तमाशा झाला अनाथ

काळू कवलापूरकर म्हणजे मराठी मातीतील तमाशामधील एक चमत्कार पर्व. काळू म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजेच काळू, असे समीकरण तयार झाले.

नाळ समजून उकिरड्यामध्ये पुरण्यासाठी नेण्यात आलेला एक मांसाचा गोळा मूल असल्याचे त्याच्या चुलतीला समजते. घरी आल्यानंतर हा मांसाचा गोळा म्हणजे जुळ्यातलाच छोटा घटक म्हणजेच छोटे मूल असल्याचे लक्षात येते. या मुलाला नाव मिळते "अंकुश.' हा पोरगा एक दिवस मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या तमाशाचा सम्राट होईल, सारा देश खळखळून हसवेल आणि कर्तृत्वाच्या जोरावर अत्युच्च शिखरावर जाऊन बसेल, असे भाकीत जर कोणी 80 वर्षांपूर्वी केले असते तर त्यावर कोणी विश्‍वास ठेवला नसता. पण, घडले असेच. आजोबा, वडील यांची तमाशा परंपरा लाभलेला हा छोटा पोरगा मोठ्या बाळूसह म्हणजे लवसह मोठा झाला. काळू-बाळू असे टोपणनाव या दोघांनी धारण केले. वयाच्या 14 व्या वर्षी तमाशा फडात दाखल होऊन सारे आयुष्य तमाशालाच अर्पण केले. लोककला जगवण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत आटापिटा केला. तमाशाला रिमिक्‍सपासून आणि त्याचा सिनेमा होण्यापासून वाचवले. या साऱ्या मोठ्या पर्वाचा एक सक्रिय साक्षीदार, एक महानायक म्हणजे काळू होय. त्यांना वगळून ना तमाशाचा इतिहास लिहिता येईल ना चिकित्सा करता येईल! आजोबा सातू खाडे, वडील संभा यांनी आपल्या घरात तमाशाची परंपरा चालू केली 1867 मध्ये. ती काळूपर्यंत पोहोचली तेव्हा काळ बिकट झाला होता. तमाशा टिकवून ठेवणे काही तोंडाचे काम नव्हते. कवलापूर (जि. सांगली) या छोट्याशा खेड्यात आणि तेही मागासवर्गीयांसाठी असलेल्या शाळेत कशीबशी अक्षरओळख करून घेतलेल्या काळू-बाळूंनी तमाशाची परंपरा आपल्या खांद्यावर घेतली. पाच दशके गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजवली. केवळ शब्दांच्या, अभिनयाच्या जोरावर वगाला महत्त्व प्राप्त करून दिले. लावणी म्हणजे केवळ दिलखेचक अदाकारी नव्हे, तर लोककला टिकवण्यासाठीची ती एक प्रार्थना असते, या भावनेने या जुळ्यांनी तिच्याकडे पाहिले. तिचा बाजार होण्यापासून, ती केवळ उत्तेजित द्रव होण्यापासून, ती अश्‍लीलतेचे प्रतीक होण्यापासून वाचवले. तमाशा रंजक तर आहेच; पण त्याचबरोबर तो बहुजनांनी जगवलेली, जन्माला घातलेली एक सुंदर कलाही आहे, हे या काळू-बाळूंनी समजून घेतले. तमाशा आणि लावणी म्हणजे केवळ ढोलकीच्या तालावर थिरकणे नव्हे, केवळ धुंदफूंद होणे नव्हे किंवा दौलतजादा नव्हे, तर ती एक कला आहे, या भावनेने हे दोघे तमाशाकडे बघत आले. तमाशाच्या अस्तित्वासाठी स्वतःला गाडून घेणारी जी काही मोजकी मंडळी असतील, त्यात एक काळू असतील.

जुळ्या भावंडांचा तमाशा म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने मोठे अप्रूप होते. हे जुळेपण त्यांनी भावनेच्या पातळीवर जपले, संवेदनांच्या पातळीवर जपले. एवढेच नव्हे, तर वगांमध्ये एकाच वेळेला आणि एकसारखा संवाद या जुळ्यांच्या ओठावर येई. त्यात स्वल्पविरामाचाही फरक असायचा नाही. वगामध्ये, तमाशामध्ये लोकांनी पाहिलेला हा एक चमत्कार होता. यामागचे रहस्य काय, हे शेवटपर्यंत कोणाला कळले नाही. तमाशाने आपल्या विकासक्रमात लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षणाची भूमिकाही मोठ्या प्रमाणात केली आहे. स्वातंत्र्याची, संयुक्त महाराष्ट्राची, विषमतेविरुद्धची, निरक्षरतेविरुद्धची, भ्रष्टाचाराविरुद्धची, स्त्री-पुरुष समतेची चळवळ लोकांपर्यंत नेण्यामध्ये सामाजिक चळवळीचा, विचारवंतांचा जसा सहभाग आहे, तसाच तो तमाशाचा, लावण्यांचा, वगांचाही आहे. "सत्ता द्यावी सुनेच्या हाती,' "जहरी प्याला,' "रक्तात न्हाली दिवाळी' आदी वगांची नावे जरी पाहिली तरी ही गोष्ट लक्षात येईल. सर्व रसात अवघड रस असतो तो विनोदाचा. केवळ शब्दांच्या आणि त्यातील विनोदाच्या जोरावर समोरचा प्रचंड जनसमूह झुलवत ठेवणे सोपे नाही. पन्नास वर्षे तमाशासम्राट, विनोदसम्राट, हास्यसम्राट ही बिरुदावली घेऊन जगणे महाकठीण; पण बाळूच्या मदतीने काळूंनी ते करून दाखवले. महाराष्ट्रानेही त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले. इतके प्रेम की वगाला उशीर झाला म्हणून किंवा आपल्या आवडत्या तमासगिराचे नीट ऐकायला आले नाही म्हणून अख्खी कनातच विस्कटून टाकण्याचे प्रसंगही काळूंनी पाहिले. आपल्या कलेला त्यांनी सामाजिक जाणिवेचा भरभक्कम पाया दिला होता. याच जाणिवेतून त्यांनी आपल्या कमाईतील वाटा सार्वजनिक शिक्षणावर खर्च केला होता. आपले छोटेसे गाव देशात अजरामर करून ठेवले. "मी शिवा-संभाच्या, काळू-बाळूच्या कवलापूरचा आहे,' असे मोठे विद्वान बॅ. पी. जी. पाटील दंड थोपटून मोठ्या आनंदाने सांगायचे.
       काळू म्हणजे तमाशाचे मोठे कलावैभव आणि काळू म्हणजे हवालदाराची भूमिका साकारत विनोद रसांनी चिंब झालेला एक इतिहासच म्हणावा लागेल.
या पुस्तकातील एक पान गळाले, हे खरे आहे; पण ते मराठी रसिकांच्या काळजाला गच्च चिकटले आहेत. सिनेमाचे रूप घेतलेल्या आजच्या तमाशाला अनेक नाथ आहेत; पण अस्सल तमाशा मात्र काळूंच्या निधनाने अनाथ झाला आहे.

Monday, 26 December 2016

फँड्री - ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!
'फँड्री' हे कथानक जातिव्यवस्था, दारिद्रय आणि त्यात अडखळलेली व्याकुळ प्रेमकथेची वास्तविकता आहे. नुसतीच भावनिकता, भडक दृश्ये आणि कृत्रिम संवाद कुठेच नसून अस्सल बोलीभाषेतून थेट विषयालाच हात घातला आहे. इतर चित्रपटासारखे आंबट (पानचट) कथानक नसल्याने तो सामान्य बुद्धीला सहज समजणारच नाही. याचा विषयच असामान्य असल्याने थिल्लर टाळक्याच्या सामान्य डोक्यांनी एकांतात हा चित्रपट पहावा . नुसत्या टाळ्या आणि शिट्या वाजवण्यापलीकडे समाजाचे दाहक कथानक समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसत्या प्रेमकथा आपण भरपूर पाहिल्या पण विज्ञानवादी युगात झेप घेणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यात अश्याच ज्वलंत प्रेमकथेची राखरांगोळी होणारी दांभिकता या कथानकात दिसते.
बहुजनांच्या पोरांनी वरच्या जातीतील पोरीसोबत प्रेम, लग्न करायचंच नसतं, "बामनीन चिमणीला हात लावायचा नसतो, तिच्या सोबतच्या चिमण्या तिला आपल्या कळपात घेत नाहीत, तिला वाळीत टाकतात !" या संवादावरून कट्टर धर्मांधता स्पष्ट होते. खरं तर याच विचारसरणीला लाथ घालण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे.
'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे !
काळ्या चिमणीच्या पाठी लागलेला जंब्या शालूच्या प्रेमात व्याकूळ होऊन तिचाच पाठलाग करत असल्याची सांगड चांगलीच घातली आहे. पण प्रत्येक वेळेस तो पाटील, त्याचा मुलगा आणि सनातन गावकरी त्याच्या स्वप्नाचा चुराडा करतात. सध्यस्थितीत अशा कित्येक शालूला अजून त्याची जाणीव नसल्याची खुण दिसून येते. खालच्या जातीतल्या माणसांची स्वप्नं, ध्येय, जीवन, अधिकार काहीच नसतात त्यांनी फक्त वरच्या जातीतल्या लोकांची सेवा करायची असते (कसलीच अपेक्षा न बाळगता) हीच मानसिकता पोखरून कथानकामधून लाचार जगण्याला लाथ मारली आहे. बाप आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जमा करण्यासाठी डुक्कर पकडण्यासारखी घाणेरडी लाचार कामे करत असतो. गरिबांच्या घरी सण, उत्सव, लग्नसोहळा काही नसतो ! त्या दिवशी वरच्या जातीच्या लोकांची सेवा करायची असते या वास्तविकतेची थरारक मांडणी केली आहे. आपल्या मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या घराबाळाला सोबत घेवून डुक्कर पकडण्यासाठी पाठवले जाते. डुक्कर पकडत असतानाचे विदारक आणि करुण चित्रीकरण केले आहे. डुकराच्या पाठीमागे व्याकूळ होऊन धावताना गावातील गुंड जातीयवादी लोकांकडून झालेली छळवणूक, संब्या आणि त्याच्या घरच्यांची होणारी टिंगल टवाळी या सगळ्या गोष्टी अमानुषतेची प्रतिमात्मकता दाखवतात. आगाव गावकरी त्या डुकराला आणि संब्याला 'फँड्री' या नावाने हाक मारतात आणि तेंव्हाच 'फँड्री' या शब्दाचा किती विकृत अर्थ आहे हे समजतं. 'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे ! शेवटी त्या डुकराला पकडून लाकडाला बांधून नेत असताना पाठीमागे भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा दाखवून त्यांच्या विचारांची आजही गरज असल्याचे अप्रतिम दृश्य दाखवले आहे. या दृश्याने नागराज मंजुळे यांचा दृष्टीकोन विषयाला थेट हात घालतो.
कथानक साधे असून उच्च विचारसरणीच्या पातळीवर मांडणी केली आहे. हा चित्रपट सामान्य बुद्धीच्या बाहेरचा असल्याने तो परत परत बघूनच समजेल. समाजातील धर्मांधता, चालीरीती आणि वास्तविक द्वेष या सगळ्या प्रथेविरुद्ध हा बंड आहे. जुलमी आणि प्रस्थापीत व्यवस्थेच्या थोबाडात प्रतिमात्मकरित्या दगड मारून चित्रपटाचा शेवट होतो. चित्रपट संपतो पण संघर्ष संपत नाही. हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!

Sunday, 30 October 2016

भंगारात शोधली लक्ष्मी

मुळशी तालुक्यातील माण गावातीली बाळूबाई सुदाम धुमाळ या अशिक्षित महिलेने घरच्या गरिबीमुळे पोटाची खळगी भागविण्यासाठी भंगार गोळा करून ते विक्री करायला सुरवात केली. पुढे तिने या भंगारातच व्यवसाय शोधला आणि वाढवलाही. आज तिने या व्यवसायातून हजोरो नाही, लाखो नाही तर कोटी रुपयांची उलाढाल चालविली आहे. त्यातून अनेक महिलांना आणि तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आर्थिक परिस्थिती आणि अशिक्षतपणा यावर मात करून तिने केलेली प्रगती थक्क करणारी आणि समाजातील सर्व स्तरातील महिलांना लढण्याची जिद्द आणि प्रेरणा देणारी आहे.

बाळूबाई धुमाळ यांचे माहेर हवेली तालुक्यातील चिखली. विष्णू आणि शांताबाई या दांपत्याच्या पोटी सन 1952 त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. धाकटा भाऊ बाळासाहेब हा सहा महिन्यांचा असताना त्यांच्या आईचे छत्र हरवले. त्यानंतर मोठा भाऊ नामदेव यांनी सर्व भावंडांचा संभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षी बाळूबाई यांचे मुळशी तालुक्यातील माण येथील सुदाम धुमाळ यांच्याशी लग्न झाले. 20 ते 25 सदस्यांच्या कुटंबात बाळूबाईंना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. हलाखीच्या परिस्थितीत संसारात दोन मुली, एक मुलगा असा त्यांचा प्रपंच होता. एकत्र कुटुंबात बाळूबाईंना शेतीतील कामाशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्यांच्यातील करारी स्त्री त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस 35 वया वर्षी त्यांना स्वतंत्रपणे मुले व पतीबरोबर त्या गावातील गवारवाडी येथील वस्तीवर राहू लागल्या.

तेथे स्वतंत्र राहत असल्यामुळे बाळूबाईंच्या कतृत्वाला दिशा मिळाली. एका वर्षांनंतर त्या रोजगारासाठी त्या चिखली येथे गेल्या. तेथे त्यांचे पती एका कंपनीत वाचमनची नोकरी करू लागले, तर बाळूबाई घर संभाळू लागल्या. तेथे त्यांनी पाहिले की काही महिला भंगार गोळा करत असत. त्यामुळे बाळूबाईंनीही भंगार गोळा करायला सुरवात केली, पण त्यांनी असे भंगार गोळा करणे त्यांना त्यांच्या भावाला आवडले नाही. त्यामुळे बाळूबाई पुन्हा आपल्या गावी आल्या. पण त्यांच्यातील व्यवसायिक त्यांना सवस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला. तोही भंगाराचाच.

त्यावेळी मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात औद्योगीक वसाहत भरभराटीस येत होती. बाळूबाईंनी या परिसरातील कंपन्यांमधील स्क्रॅप व इतर भंगार मिळविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना परिसरातील अनेक कंपन्यांचे उंबरे झिजवले. कंपनीच्या मालकांशी अगदी खेडवळ भाषेत बोलून भंगार देण्याची विनंती केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सुरवातीला त्यांना फक्त पाच किलो भंगार मिळाले. पण त्यांना प्रयत्न करणे सोडले नाही. त्यांच्यातील चिकाटी आणि प्रामाणिकपणा पाहून अनेक कंपन्यांनी त्यांना आपल्याकडील स्क्रॅप देण्यास सुरवात केली आणि बाळूबाईंचा भंगाराचा व्यवसाय भरभराटीस आला. आज 25 वर्षांनंतर त्यांच्या व्यवसायाची उलाढाल काही कोटीच्या घरात गेली आहे. त्यातून त्यांनी अनेक महिला आणि तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. परंतु आजही या वयातही त्या आपला  व्यवसाय स्वतः सांभाळतात. कामावरील त्यांची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही. एखाद्या कंपनीतून फोन आला, की त्या स्वतः हजर होतात. वयाची साठी ओलांडली तरीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.

बाळूबाई यांची वारकरी संप्रदायावर निष्ठा आहे. त्या नित्यनियमाने पंढरपूर, देहू, आळंदीची वारी करतात. पंढरीच्या विठ्ठलावर त्यांची मोठी निष्ठा आहे. त्यातून त्या आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा समाजातील गरीबांसाठी खर्च करतात. त्यांनी आपल्या घराजवळ पांडुरंगाचे भव्य मंदिर बांधले आहे. तसेच, त्या दरवर्षी शेकडो भाविकांना आपल्या वतीने विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा घडवून आणतात.

कामावरिल निष्ठेमुळेच माझ्या व्यवसायाची व माझी भरभराट झाली, असे त्या सांगतात. खरचं बाळूबाई आज सर्व स्त्रीयांसाठी आयडॉल झाल्या आहेत.   
    संकलन- रसिका कंक
   शब्दांकन - दीपक कठाळे

Sunday, 16 October 2016

सत्यभामाबाई पंढरपूरकर - 'लावण्य'गाथा ....

वयाची पंचाहत्तर वर्षे उलटून गेल्यावरही लावणी सादर करणाऱ्या एका जिद्दी आणि समर्पित कलावंत सत्याभामाबाईंची गाथा ...  मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले .

आजच्या काळात लावणी कलावंतांवर चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्याने चित्रपटातील गीते आणि लावण्या लोकप्रिय होत आहेत परंतु पारंपरिक लावणी दिवसें-दिवस काळाच्या पडद्याआड जात आहे असे चित्र पाहावयास मिळते. काही दशकांपूर्वी यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, ज्ञानोबा उत्पात आदी मान्यवरांनी पारंपरिक लावणीचा वारसा जपून ठेवला होता. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता.

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. नृत्यप्रधान लावणी, गानप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी. प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. पंढरपुरी बाजाच्या म्हणजे बैठकीच्या लावणीला सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छकुड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी असे लावणीचे नानाविध प्रकार आहेत.

काही लावण्या या विशिष्ठ सादरीकरणामुळे तिच्याशी संबंधित कलावंताशी जोडल्या गेल्यात. जसे की 'तुम्ही माझे सावकार' ही विलंबित लयीतील लावणी यमुनाबाई वाईकरांच्या दिलखुलास अदाकारीने त्यांच्याच नावावर झाली आहे. 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंच बाई मुसाफिर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे.जनमानसावर अनेक दशकापासून आपल्या आवाजाचे गारुड घालणारया सुलोचना चव्हाण यांच्या गायकीला आजही तोड नाही अन त्यांनी गायलेल्या लावण्या आजही अमृताहून गोड आहेत. आजही तमाशात आधी गण सादर होतो मग येते ती गौळण. त्यानंतर असतात सवालजवाब. काही तमाशात रंगबाजीदेखील असते. शेवटी येते ते वगनाट्य. यातल्या वगात लावण्या असतात ज्या त्यातल्या कथेनुरुप असतात.या सर्व लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणारया नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. 

सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. त्यांची नेमकी जन्मतारीख इतिहासाला ज्ञात नाही. त्यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १०व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले.त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी,गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो.

गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.

सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे.
  
जवळपास पाच दशके सात्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. ती देखील अविरतपणे, जोमाने आणि स्वतःच्या शैलीने ! यशवंतराव प्रतिष्ठान, पुणे येथे २ मे १९९२ रोजी त्यांनी शेवटचे सादरीकरण केले यावरून त्यांच्यातल्या लावणीप्रेमाची आस कळून येते. त्यावेळी त्यांचे वय ७५ च्या पुढे असावे ! लावणी हाच त्यांचा श्वास होता. आपल्या कलेला त्यांनी कधीही बाजारी स्वरूप येऊ दिले नाही ही बाब येथे अधोरेखित शेवटच्या कामगिरी असतो. लावणीला त्यांनी आयुष्य समर्पित केल्याने त्याना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले, शेवटच्या काळात त्या तरुण मुलीना  पारंपारिक लावणी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात निष्णात प्रशिक्षकाच्या भूमिकेत होत्या. आपल्या कलेसाठी जगलेल्या या खरया अर्थाने लावण्यवतीचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.

आपल्या समाजात आणि राजकारणात स्त्रियांना समान संधी देण्याचे निर्णय झालेले असले तरी प्रत्यक्षात स्त्रियांच्या हाती सत्ताकारणाच्या चाव्या फार मोठय़ा प्रमाणात आलेल्या नाहीत. स्त्रियांना आजही मंदिर प्रवेश नाकारला जातो किंवा त्यांनी दारूबंदीसाठी आवाज उठवला तर त्यांना गावगुंडांच्या आणि पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर आजही आवश्यक आहे. हा जागर लोककलांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे होऊ शकतो, मग प्रश्न स्त्रीभ्रूण हत्येचा असो, ग्रामस्वच्छतेचा असो, एड्सविरोधी जनजागृतीचा असो अथवा आदिवासी मातांच्या व बालकांच्या कुपोषणाचा असो, लोककलांसारखे समर्थन माध्यम वरील विविध प्रश्नांवर जनजागरण घडवू शकते, लोकसाहित्य व लोककलांचा संबंध सृजनशक्तीशी असतो. अंगाईगीतांपासून, जात्यावरच्या ओव्यांपासून लावणीपर्यंत लोकसाहित्याचे विविध लोकगीत प्रकार हे स्त्रियांच्या मुखी असतात. लावणी, तमाशा स्त्रियांना वर्ज्य असताना या कलांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, रोशन सातारकर यांनी केले. त्यातही लावणीच्या सर्वांगीण संवर्धनासाठी सत्यभामाबाईंनी आपले आयुष्य वेचले त्यामुळे त्यांचे कर्तुत्व निश्चितच मोठे आहे. 

आजही अनेकांच्या प्रेरणास्थान असलेल्या सत्यभामाबाई ह्या लावणीच्या मंदिरातील दिपमाळ होत्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे अनेक ज्येष्ठश्रेष्ठ प्रतिभावंत कालानुरूप विस्मृतीच्या पडद्याआड जातात, पण येणारया प्रत्येक नव्या पिढीला वैभवशाली कलेने आणि संघर्षमय जीवनाने एक काळ गाजवलेल्या या अस्सल बावनकशी कलावंताची ओळख करून देणे हे आपले दायित्व आहे. त्यासाठी हा लेखन प्रपंच….       

Saturday, 15 October 2016

सुशीला आणि अनंत माने ...एक आठवण ...

एक मराठी सिनेमा येऊन गेला होता, ज्यात एका उद्ध्वस्त झालेल्या तरुणीची कथा होती. जेंव्हा चित्रपट रिलीज झाला तेंव्हा जिच्यावर चित्रपट बनवला होता ती स्वतः कोल्हापुरातल्या पद्मा टॉकीजच्या बाहेर याच चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकत उभी होती ! खोटं वाटतंय ना ! पण हे सत्य होते ...साल होते १९७८ आणि रंजनाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होता 'सुशीला'...  त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत मानेंनी हा चित्रपट पडद्यावर आणला होता.  

अनंत माने यांनी "पिंजरा' चित्रपटात दाखविलेली एका मास्तराची शोकांतिका आजही मराठी चित्रपटसृष्टीत "माईलस्टोन' मानली जाते. या कलाकृतीशी स्पर्धा करील असा एक सत्यकथेवर आधारित चित्रपट माने यांनीच त्यानंतर काही वर्षांनी बनविला. त्याचं नाव होतं, "सुशीला'. "पिंजरा'मध्ये एका मास्तराची झालेली वाताहत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. "सुशीला'मध्ये एका मास्तरिणीचं आयुष्य उद्‌ध्वस्त होतं. एक वेगळ्या वाटेचा चित्रपट म्हणून "सुशीला'ची नक्कीच दखल घेतली गेली. माने यांचं कसबी दिग्दर्शन, शंकर पाटील यांचे संवाद, रंजना-अशोक सराफ या जोडीनं अभिनयात मारलेली उत्तुंग मजल आणि राम कदम यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे "सुशीला' चित्रपट लक्षणीय ठरला.

"सुशीला'चा प्रारंभ "फ्लॅशबॅक'द्वारे होतो. जन्मठेपेची शिक्षा भोगून सुशीलाची (रंजना) तुरुंगाबाहेर पडण्याची तयारी सुरू असते, परंतु मनानं तिला अजूनही तुरुंगातच राहावं वाटतं. त्यामागचं कारणही तसंच असतं. ते उलगडतं तिच्या गतआयुष्यातील घडलेल्या "ट्रॅजेडी'मुळं. सुशीला ही खरं तर सुशिक्षित शिक्षिका. एका गावातील शाळेत ती शिक्षिकेची नोकरी करीत असते. सुखी संसाराची तिनंही स्वप्नं पाहिलेली असतात. तिच्यातील चांगली शिक्षिका पाहायला मिळते ती "सत्यम शिवम सुंदरा...' या गाण्यातून; परंतु तिच्या स्वप्नांना दृष्ट लागते ती गावच्या सभापतीचा मुलगा शेखर देशमुखमुळे. शेखरच्या लहानग्या भावानं वर्गात सिनेमातील नट्यांची छायाचित्रं आणल्यामुळे सुशीला त्याला छड्या देते. वकिलीचं शिक्षण घेतलेला शेखर याबद्दल जाब विचारायला गेला असता ती त्याचीही चांगलीच कानउघाडणी करते. हे प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. त्यानंतरही एक-दोन प्रसंगांमध्ये शेखरची भेट झाल्यावर ती त्याचा पाणउतारा करते आणि त्याला बेशरम म्हणते. सुशीलाच्या तोंडून झालेला हा अवमान शेखरला सहन होत नाही आणि तो तिच्यावर अतिप्रसंग करतो. आपल्यावरील अत्याचाराची माहिती देण्यासाठी सुशीला पंचायतीत पोचते; परंतु पंचायतीचे सदस्य तिला मदत करण्याऐवजी तिचं शीलहरण करतात. "पिसाट वारा मदनाचा आणि पिसाद झाली घडी लागली लाज देशोधडी...' अशी पाटी या वेळी पाहायला मिळते आणि चित्रपटातील कलाकारांची श्रेयनामावली सुरू होते.

पंचायत सदस्यांकडून शीलहरण झालेल्या सुशीलेला रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस पकडतात. त्या वेळी एक बाई तिची सुटका करते; मात्र एवढ्यावरच सुशीलाच्या दुर्दैवाचे दशावतार थांबत नाहीत. ही महिला तिला कुंटणखान्यात घेऊन जाते. सुशीलाला आपल्यावर काय परिस्थिती ओढवलेली आहे हे समजताच ती तिथून पळ काढते; मात्र पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी ती एका घराचा आश्रय घेते. या घरात राहत असतो तो म्हमदू (अशोक सराफ). सुशीला आणि म्हमदू एकाच नावेतले प्रवासी असतात. कारखान्यात यंत्रावर काम करत असताना म्हमदूचा अचानक हात तुटतो आणि कालांतरानं त्याचा संसारही उधळला जातो. पुढे हातभट्टीचा व्यवसाय करण्याची त्याच्यावर वेळ येते, पण मनानं तो चांगला असतो. सुशीलाला म्हमदू आपली बहीण मानतो; मात्र नियती याच वेळी आणखी एक खेळ खेळते. शेखरचा अंश सुशीलाच्या पोटात वाढत असतो. यथावकाश सुशीला एका अपत्याला जन्म देते. याच वेळी पोलिसांची म्हमदूच्या घरावर धाड पडते आणि आपल्या बाळाचं रडणं पोलिसांच्या कानावर पडू नये म्हणून ती त्याच्या तोंडावर हात ठेवते. घडू नये ते घडते. पोलिस घरातून जाईपर्यंत सुशीलाचा हात बाळाच्या तोंडावर तसाच राहतो आणि गुदमरून या बाळाचा मृत्यू होतो. हा धक्का सुशीलाला सहन होत नाही.

इकडे शेखरची वकिली चांगली सुरू असते. शैला (उषा नाईक) त्याची पत्नी असते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात. चित्रपट हाऊसफुल्ल असतो. याच वेळी त्यांच्यासमोर "ब्लॅक'नं तिकीट विकणारी एक मुलगी येते. ती असते सुशीला. एका चांगल्या शिक्षिकेची वाताहत होण्याची ती सुरवात असते. तिला पाहिल्यानंतर शेखर सैरभैर होतो. पण तो आपल्या पत्नीला खरं काही सांगू शकत नाही.

सुशीलाचं वास्तव आयुष्यातलं भरकटणं असंच सुरू राहतं. चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारीतही ती सरावते. मद्याचा पेलाही तिला वर्ज्य राहत नाही. तिच्या या अधःपतनाचा शेखरला विलक्षण धक्का बसतो. तो सतत तिच्या पाळतीवर राहतो. एकदा चित्रपटगृहाजवळ शेखर जातो. या वेळी तिकिटांच्या रांगेत उभे असणाऱ्या एकाचं सुशीला पाकीट मारते, मात्र पोलिसांकडून ती पकडली जाते. या वेळी शेखर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिला जामीन मिळवून देतो. सुशीलाची भेट घेऊन तो तिला काहीतरी आपल्याला बोलायचं आहे असं म्हणतो, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. चित्रपटगृहाच्या बाहेरच्या फुटपाथवर सुशीलाचा संसार असतो; मात्र पोलिसांनी पकडल्यावर तिचा हा संसारही उद्‌ध्वस्त होतो. तेव्हा सुशीला आणि म्हमदूचं पुन्हा भरकटणं सुरू होतं. असंच फिरता फिरता त्यांचं जाणं होतं ते एका तमासगिरीणीच्या फडाला. तमाशात बायकांना प्रवेश नसल्यामुळे सुशीलाला प्रवेश दिला जात नाही. मात्र "कौन बोलता है अपुन औरत है।' असं म्हणत सुशीला विंगेत बसून हा तमाशा बघते. गाणं असतं....
..कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात
न खुदूखुदू हसतंय गालात...

तमासगिरीणीच्या नृत्यकौशल्यावर आणि तिच्या अदांवर सुशीला फिदा होते. "माझ्यासारखी बाई तुमच्यावर फिदा झाली, पब्लिकचं काय झालं असेल?' असा प्रतिप्रश्‍न करीत ती तमासगिरीणीला आपल्याला या कलेत पारंगत व्हायचंय असं सांगते. तेव्हा धोक्‍याचा इशारा म्हणून सुशीलाला या क्षेत्रातील वाईट गोष्टींची कल्पना दिली जाते. यावर सुशीलाचं उत्तर असतं, "गटारात पडलेल्याला चिखलाची काय भीती !' खूप कमी कालावधीत सुशीला नृत्यामध्ये पारंगत होते आणि सुशीला कोल्हापूरकरीण नावानं ती आपले कार्यक्रम सुरू करते. हे नाव वाचून शेखर तिच्या तमाशाला येतो. या वेळी सुशीलाचं गाणं असतं...
"..नवरीवाणी नटूनथटून मी तुम्हांपुढे बसते
अन सांगा राया सांगा मी कशी दिसते..."

तमाशा संपतो. शेखर तिचा रिक्षातून पाठलाग करीत तिच्या घरी पोचतो. आपल्या हातून झालेल्या कृत्याबद्दल पश्‍चात्ताप व्यक्त करीत तो तिची माफी मागतो; मात्र आपल्याशी लग्न कराल तरच या कृत्याला माफी, असा पवित्रा सुशीला घेते. म्हमदूला ते पटत नाही; परंतु सुशीलाच्या डोक्‍यात वेगळीच चक्रं फिरत असतात. सुशीलावरील अन्याय दूर करण्यासाठी शेखर तिला आपल्या घरी घेऊन येतो; परंतु त्याची पत्नी शैला त्यांना घरात घेण्यास नकार देते; मात्र लग्नाच्या वेळी पापपुण्यात सहभागी होण्याच्या वचनाची आठवण शैलाला शेखरकडून करून दिली जाते. तेव्हा सुशीलाला घरात घेण्याशिवाय शैलापुढे दुसरा पर्याय उरत नाही. आपल्यावरील अन्यायाचं परिमार्जन म्हणून शैलाच्या गळ्यातील मंगळसूत्र आपल्याकडे घेण्यात सुशीला यशस्वी होते. याच वेळी म्हमदू शेखरच्या घरी पोचतो. शेखरच्या पत्नीला पाहताच त्याचं डोकं हलतं. त्यानं काही काळापूर्वी एक प्रतिज्ञा घेतलेली असते. शेखरच्या संसाराची राखरांगोळी केल्यानंतरच तो सुशीलाकडून राखी बांधून घेणार असतो. तो क्षण आता जवळ आलेला असतो. सूडानं पेटलेल्या म्हमदूची शैलावर अतिप्रसंग करण्यापर्यंत मजल जाते. तेव्हा सुशीला पुढचा-मागचा विचार न करता घरातील सुरा म्हमदूच्या पाठीत खुपसते. यात त्याचा मृत्यू होतो आणि सुशीलावर खुनाचा खटला न्यायालयात सुरू होतो. शेखर तिची न्यायालयात बाजू मांडतो; मात्र हा खटला सुशीला हरते आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते; मात्र तुरुंगात जाण्यापूर्वी ती शैलाला आपल्याकडचे मंगळसूत्र परत करते.

"सुशीला'च्या कथानकात बरंच नाट्य आहे आणि ते जिवंत करण्यात दिग्दर्शक माने यशस्वी ठरले आहेत. एका शिक्षिकेच्या जीवनाची झालेली वाताहत त्यांनी प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल अशा पद्धतीनं दाखवली आहे. शंकर पाटील यांचे संवादही अतिशय टोकदार आहेत. हा चित्रपट लक्षात राहतो ते रंजना आणि अशोक सराफ यांच्या चौकटी तोडणाऱ्या भूमिकांमुळे. राम कदम यांचं संगीत तर या चित्रपटाचा प्राण आहे. याहूनही एक ठळक बाब म्हणजे 'सुशीला' हा टिपिकल अनंत माने टच असलेला सिनेमा होता. अनंत मानेंच्या विषयी थोडी माहिती दिली नाही तर त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच होईल ...  

मागचे वर्ष अनंत माने यांचे जन्मशताब्दी वर्ष. मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा आज शंभरच्या घरात आहे, तेव्हाच मानेंची शंभरी साजरी होत आहे. हे पाहून मानेंचा तो काळ आठवला. सन १९६०-६१ चा तो काळ. त्या काळात अवघे ७ ते ८ मराठी चित्रपट निर्माण व्हायचे. ६०च्या दशकातला मानेंचा ‘सांगते ऐका’ हा चित्रपट पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला होता. तरीही त्यानंतर मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा अनेक वर्षे १०-११च्या पुढे जात नव्हता. आज अनेक कलावंत एकेका चित्रपटासाठी १२ ते १५ लाख रुपये घेत आहेत. मानेंच्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा खर्चही लाखाच्या घरात जात नव्हता.

अगदी ६० हजार रुपयांत कोणताही मराठी चित्रपट तयार होत होता. त्या काळी दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद यांनी हिंदीत आपली क्रेझ निर्माण केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटांचा प्रेक्षक मराठीपासून दूर चालला होता. तर अनेक दिग्दर्शकही मराठी चित्रपट निर्मितीपासून दूर जाऊन सरकारी नोकर्‍या करत होते आणि त्यामुळे मराठी चित्रपटाचे कोणतेही भविष्य दिसत नव्हते. अशा वेळी अवघ्या ६0 हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला. याचा अर्थ त्यांच्या आधी कोणी तमाशापट करत नव्हते असं नाही.

सन १९४८ला जय मल्हार, राम जोशी, पठ्ठे बापूराव या चित्रपटांतून मराठीत तमाशापटाची निर्मिती सुरू झालीच होती; पण ‘सांगते ऐका’ने ती अधिक वाढवली. तमाशापटातून मराठी चित्रपटांना त्यांनी एक नवा चेहरा दिला आणि त्यानंतर मराठीत खर्‍या अर्थाने तमाशा चित्रपटांचे युग सुरू झाले. या युगात त्यांनी ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘गण-गवळण’ यांसारखे अनेक तमाशापट दिले. सन १९९३चा ‘लावण्यवती’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट एक तमाशापटच होता. परंतु, ५०च्या दशकातला ‘अबोली’ हा त्यांचा पहिला चित्रपट तमाशापट नव्हता. एका मुक्या मुलीची कथा सांगणारा तो सामाजिक चित्रपट होता. त्यानंतर अनेक सामाजिक चित्रपट त्यांनी दिले आणि त्याचबरोबर विनोदी चित्रपटही मानेंनी दिले. त्यांपैकी ‘मानिनी’ चित्रपटाची कथा पंडित महादेवशास्त्री जोशी यांची होती. त्या काळात ते एक नामवंत साहित्यिक होते. त्यांच्यासारखेच पु. भा. भावे (सौभाग्य, माझा होशील का?) ते शंकर पाटील यांच्यासारखे अनेक साहित्यिक त्यांनी मराठी चित्रपटांना दिले. शंकर पाटलांच्या बरोबर अनेक चित्रपटांच्या पटकथा माने यांनी स्वत: लिहिल्या आणि ‘हळदीकुंकू’ या चित्रपटासाठी पटकथालेखनाचे पारितोषिकही मिळवले. दिग्दर्शनात ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटाला शासनाचे पहिले मराठी चित्रपट महोत्सव पारितोषिक मिळाले. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी हे पारितोषिक त्यांनी पटकावले. लेखक म्हणून ते स्वत:च्या चित्रपटापुरते र्मयादित राहिले नाहीत. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली, तर व्ही. रवींद्र यांच्याही अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. कवी चंद्रशेखर यांच्या ‘काय हो चमत्कार’ या खंडकाव्यावरही त्यांनी चित्रपट निर्माण केला.

आज राजकीय पार्श्‍वभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात प्रथम केली. निळू फुले या चित्रपटातून सर्वप्रथम चित्रपटात आले आणि पुढार्‍याच्या भूमिकेचा चेहरा या चित्रपटाने दिला. त्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय पार्श्‍वभूमीवरील अनेक चित्रपट त्यांनी दिले. सत्यकथेवरील आधारित मराठी चित्रपटही माने यांनी दिले. ‘चिमणी पाखरं’ची कथा ते राहत असलेल्या भगीरथ सदनमध्ये घडलेली कथा होती. ती त्यांनी धर्माधिकारी यांना सुचवली आणि त्यानंतर माने यांनी सत्यकथेवरील आधारित काही कथा चित्रपटात आणल्या. त्यांचा ‘सुशीला’ हा चित्रपटदेखील त्यापैकी एक. त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून मानेंनी तो चित्रपट पडद्यावर आणला. ‘एक गाव बारा भानगडी’ हा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्‍वभूमीचा होता. याची कथा माझा मित्र अमृत गोरे याला वर्तमानपत्रातील एका बातमीतून सुचली होती. तीच त्याने चित्रपटात आणल्यानंतर वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन तयार होणार्‍या पेपर कटिंग चित्रपटांचा ट्रेंड मराठी व हिंदी चित्रपटात आला.

हिंदी चित्रपटात फ्लॅशबॅकने सुरुवात होणारे अनेक चित्रपट आपण पाहतो. नंतर सेमी फ्लॅशबॅक कथांवरील चित्रपटांचा नवा ट्रेंड चित्रपटात आला. गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटाच्या सेमी फ्लॅशबॅकसाठीच अनेकांनी कौतुक केले होते. परंतु गुलजार यांचा उदयही चित्रपटात झाला नव्हता, तेव्हा अनंत मानेंनी ५0 च्या दशकात आपल्या ‘पुनवेची रात’ या चित्रपटात सेमी फ्लॅशबॅकचा प्रयोग सर्वप्रथम केला. ‘एक गाव बारा भानगडी’मधून मानेंनी निळू फुले यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिलाच; पण अशा कित्येक कलावंतांना त्यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला. राजा गोसावी, राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटापासून लोकांना माहीत झाला असला, तरी त्याआधी दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात सर्वप्रथम दिसला. या चित्रपटासाठी मानेंनीच त्यांना हेरलं होतं. त्यांच्याबरोबर शरद तळवळकरांच्या रुपेरी जीवनाची सुरुवातही या चित्रपटातून झाली. मराठीत राजा गोसावी व शरद तळवळकर यांची जोडी जमली होती. ही जोडी मानेंनी त्यांच्या ‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटातच सर्वप्रथम जमवलेली. जयश्री गडकर या ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटापासून दिसत असल्या तरी त्यांचं युग खर्‍या अर्थाने मानेंच्या ‘सांगते ऐका’ चित्रपटापासून सुरू झाले. ‘सांगते ऐका’ आणि ‘मानिनी’ म्हणजे जयश्रीबाईंच्या रुपेरी जीवनाची हाईट होती. या हाईटला अनंत मानेंनीच त्यांना पोचवले. लीला गांधी (प्रीतीसंगम), उषा चव्हाण (केला इशारा जाता जाता), उषा नाईक (पाच रंगाची पाच पाखरं) यांसारख्या अनेक नायिका त्यांनी मराठी चित्रपटाला दिल्या.

 डॉ. श्रीराम लागू हे अनंत मानेंनी लिहिलेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या चित्रपटाकरिता नाटकातून सर्वप्रथम चित्रपटात आले. या चित्रपटावेळी मराठीत त्यांनी एक मान्यवर दिग्दर्शक असं नाव मिळवलं होतं तरीही व्ही. शांताराम यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे म्हणून ‘पिंजरा’च्या वेळी ते त्यांचे सहायक बनले होते. या चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तरीही चित्रपटाच्या यशाचे श्रेय त्यांनी स्वत:कडे घेतले नाही. त्यामुळेच व्ही. शांताराम यांनी अनंत मानेंना त्यानंतरच्या आपल्या ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली. व्ही. शांताराम हे प्रभातच्या पाच मालकांपैकी एक मालक होते. तेव्हा एक्स्ट्रा म्हणून चित्रपटातून आपल्या रुपेरी जीवनाची सुरुवात त्यांनी केली आणि एक्स्ट्राच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर शांतारामबापूंच्या चित्रपटापर्यंत दिग्दर्शक म्हणून त्यांनी झेप घेतली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना एकदा मरणोत्तर सन्मान देऊन त्यांचा गौरव करायला हवा होता पण तसे काही घडले नाही ..