Tuesday, 27 December 2016

भावलेली स्मिता पाटील

'अर्धसत्‍य','शक्‍ती','बाजार','उंबरठा','जैत रे जैत','मिर्च मसाला'या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने चित्रपटसृष्‍टीत दरारा निर्माण करणा-या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 13 डिसेंबर रोजी स्‍मृतीदिन होता त्यानिमित्त.
          दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे.मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले,हासवले,विचार करायला भाग पाडले.स्मिता पाटील यांना जाऊन आज 25 वर्षे झाली.परंतु,चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव तोंडात येते.स्मितानंतर हिंदी आणि मराठीतही अनेक अभिनेत्री आल्‍या आणि गेल्‍या,पण स्मिताचे नाव कधीच विस्‍मरणात जाणार नाही.सध्‍याच्‍या पिढीला स्मिता पाटील कधीच भेटणार नाहीत,पण आई-वडिलांकडून त्‍यांच्‍या आठवणीतील‍स्मिता मात्र नक्‍कीच भेटत राहणार.
       वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला 1975 मध्‍ये'चरणदास चोर'या चित्रपटात घेतले.पहिल्‍याच चित्रपटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुक झाले.त्‍यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
        1970-80च्‍या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली.समाजातील अनेक प्रश्‍नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले.मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्‍यामुळे तिला सामाजिक प्रश्‍नांविषयी कळवळा होता.तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.त्‍यामुळे'मिर्च मसाला'मधील सोनबाई,'अर्थ'मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली.मराठीतील'उंबरठा'चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे,असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटत.समांतर चित्रपटांनंतर तिने काही व्‍यावसायिक चित्रपटही केले.'शक्‍ती','नमकहलाल'हे तिचे व्‍यावसायिक चित्रपटही सुप‍रहिट झाले.श्‍याम बेनेगल,रमेश सिप्‍पी,बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्‍दर्शकांची स्मिता आवडती अभिनेत्री होती.
          असे म्‍हणतात की,स्मिताचे डोळे खूप बोलके होते. तिच्‍या नजरेत वेगळी चमक होती.वाचिक अभिनयाबरोबरच डोळ्यांच्‍या माध्‍यमातून सां‍केतिक अभिनय करण्‍यातही तिचा हातखंडा होता.विलक्षण अभिनय,सुंदर डोळे,अतिशय हुशार,सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्‍येक अभिनेत्री जपण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत.पण,'अशी स्मिता पाटील आता होणे नाही'हेच खरे...

गाणं वाजू द्या ...."ख्वाडा" गावरान एक मेजवानी

सतत शहरी, ग्रामीण सिनेमे पाहिल्यामुळं तयार झालेल्या अदृश्य चौकटीला भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'ख्वाडा' आपल्या भाषेने, आशयाने, मांडणीने मोडतो. एक अस्सल अनुभव देतो. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी 'ख्वाडा'चं नाव कुणालाही माहीत नव्हतं. स्पेशल ज्युरीचं अॅवॉर्ड मिळाल्यानंतर भाऊराव प्रकाशात आला. 'ख्वाडा'बद्दलचं कुतूहल याच पुरस्काराने वाढवलं. इथे दिग्दर्शक स्वतःच चित्रपटाचा लेखक असल्यानं त्याच्या डोळ्यासमोर उभा असलेला चित्रपटच त्याने कोणतीही तडजोड न करता पडद्यावर मांडला आहे. त्यामुळं 'ख्वाडा' ही एक फक्कड गावरान मेजवानी झाली आहे. 
                ही गोष्ट धनगर समाजाची आहे. साहजिकच गोष्टीत त्यांचं जिणं.. त्यांचं समाजात असलेलं अदृश्य स्थान.. त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेणारी शिक्षित यंत्रणा.. अशा छोट्या परंतु महत्त्वाच्या जागाही दिग्दर्शक न बोलता 'दाखवतो'. तेवढ्यावरच न थांबता, या मंडळींना आपली ओळख पुसून अपरिहार्यपणे कशी शहरीकरणाची वाट धरावी लागतेय हेही सूचित करतो. सर्वसाधारणपणे हे सगळं दाखवणारा सिनेमा शोकात्म असतो. हा सिनेमा तसा नाही. म्हणजे डोईवर छत नसताना, सगळं जिणं भटकंतीत खर्च होत असतानाही वाट्याला आलेल्या जगण्यात ही लोकं समाधानी आहेत. त्यांच्यात असलेला पिढीचा संघषं इथेही आहे. म्हणजे बापासारखं भटकंतीचं जिणं पुढच्या पिढीला मान्य नाही. इथेही मुलांना शिकायचंय. मोठं व्हायचंय. या लोकांना स्वतःसह आपल्या कुटुंबाचा विकास हवाय. हा लढा सुरू असताना प्रस्थापित समाजमान्य प्रवृत्ती बेमुर्वतपणे या मंडळींच्या जगण्यात ख्वाडा (खोडा) घालताना दिसतात. त्याची ही    गोष्ट.                                             
                    गोष्ट रघु कऱ्हे यांची आहे. रघू धनगर आहेत.मेंढरांचा कळप घेऊन या शेतावरून त्या शेताकडे जात राहात जगणं त्यांनी स्वीकारलंय. रघुला बायको, दोन मुलं आहेत. थोरला पांडा आणि धाकला बाळू. पांडाचं लग्न झालंय. वडिलांचं जगणं त्याने स्वीकारलंय. बाळूला पैलवानकीचा नाद. व्यायाम, कुस्ती त्याचे छंद. वडिलांचं असं गावोगाव भटकणं त्याला मान्य नाही. बाळू काहीसा अबोल, स्वप्नाळू आहे. मिसरुड फुटलेला, वयात आलेला बाळू लग्नासाठी बाशिंग बांधून तयार आहे. त्याला स्वप्नंही पडतात लग्नाचीच. या वर्षी पाऊस कमी आहे. चाऱ्यासाठी फिरता फिरता कऱ्हे कुटुंब एका गावानजिक येतं. गावचे सरपंच अशोकराव दमदाटी, बळजबरी करण्यात मुलखाचे कुप्रसिद्ध. कुणाच्याही वाट्याला न जाणाऱ्या कऱ्हे कुटुंबाची गाठ या सरपंचाशी पडते. सरपंचाची अरेरावी आत्ममग्न अशा बाळूच्या डोक्यात जाऊ लागते. सरपंच आणि बाळू यांच्यातल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. 

                                                                     कथेचा अतिशय बारकाईने पटकथा विस्तार झालेला दिसतो. शशांक शेंडे, अनिल नगरकर हे ओळखीचे चेहरे वगळता यातली सगळी मंडळी नवी आहेत. सिनेमा या माध्यमाशी त्यांची ओळख नसणं याचा फार उत्तम वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे. गावातल्या गाडीवान माळीबाबांपासून बाळूचं लग्न ठरलेल्या हंडाळ बंधुंपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी अचूक माणसांची निवड झाली आहे. यांची कामंही लक्षात राहणारी. सिनेमात बोलली जाणारी टिपिकल धनगरी भाषा या कलाकारांना अवगत असेलही कदाचित. पण अशांकडून यशस्वी काम काढून घेणं याचं पुरेपूर श्रेय दिग्दर्शकाला दिलं पाहिजे. संवादही सोपे. रोजच्या जगण्यातले गरजेपुरते. यातली गावरान भाषा आहे मराठीच. यातल्या काही शब्दांचा नेमका अर्थबोध होईलच असं नाही. पण यातून अडत काही नाही. या भाषेमुळेच हा सगळा प्रकार रुचकर, रांगडा बनला आहे. 

            कॅमेरा हाताळणीत थोडा नवखेपणा आहे. पण सिनेमाच्या भाषेला तो पूरक ठरतो. संकलनात मात्र दोन तीन ठिकाणी 'जर्क' बसतात. संगीत चपखल झालं आहे. अवाजवी वाद्यमेळांचा मोह टाळून अचूक आणि नेमकं पार्श्वसंगीत दिल्याने ते दृश्यांमध्ये पूर्णतः विरघळलेलं दिसतं. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो शशांक शेंडे यांचा. रघु कऱ्हे शिवराळ, शीघ्रकोपी असला तरी कुटुंबवत्सल आहे. मेंढ्यांमध्ये त्याचा जीव अडकलाय. फारच सहज त्यांनी रघुचे पदर उलगडून दाखवलेत. अनिल नगरकर यांचा सरपंचही तितकाच रांगडा, जरबी. रघु, पांडा, सरपंच या थेट पटकथेत दिसणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. पटकथेत न दिसणाऱ्या पण खमक्या वर आलेल्यांमध्ये बाळू, रघुची बायको यांची दखल घ्यावी लागते. भाऊसाहेब शिंदे यांनी साकारलेला बाळू कमालीचा स्वप्नाळू, आपल्याच धुंदीत जगणारा पण पैलवानी स्वभावाचा झाला आहे. चित्रपटाचा नायक तो असला तरी संपूर्ण सिनेमात सर्वात कमी संवाद असतील ते त्याच्या वाट्यालाच. परंतु, हावभावातून तो भाव खाऊन गेला आहे. सरपंचाच्या तालमीत त्याने रंगवलेली कुस्ती तर लाजवाब. तशीच शेवटी असलेली घोडेस्वारीही. खोगीर न वापरता घोडेस्वारी हे भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणतं. तिथे या सर्वच कलाकारांनी मेहनतीने ही कामगिरी पार पाडली आहे. 

           एकुणच  हा अत्यंत विचारपूर्वक केलेला सिनेमा आहे. जे आहे ते अस्सल आहे. 'असं' जेवण मिळणं शहरीकरणामुळे अलिकडे कमी कमीच होत चाललंय. पुन्हा एकदा लाभ घ्यायलाच हवा.
    दिपक

प्रेमकहाणीला सॅल्युट !

 लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से ऐकले असाल. पण ही कहाणी आहे सांगलीच्या एका प्रेमवीराची, पाटलाच्या पोराची. ही कथा वाचून तुम्हीही यांच्या प्रेमाला सॅल्युट कराल.
प्रेयसीला कॅन्सर आहे, याची पूर्ण जाणीव असूनही फक्त निस्वार्थ प्रेमासाठी त्याने तिच्याशी लग्न केलं. फक्त लग्नच केलं नाही, तर तो तिच्या पाठिशी एखाद्या पहाडासारखा उभा राहिला. कॅन्सरने अखेर तिचा बळी घेतलाच, पण त्यांची प्रेमकहाणी अमर राहिली.
 
       सांगलीचा प्रवीण, अहमदाबादची हितार्थी
सांगलीच्या प्रवीण पाटीलचं गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या हितार्थी पारिखसोबत 2010 मध्ये लग्न झालं होतं. प्रवीण आणि हितार्थी हे 2008 पासून एकमेकांना ओळखत होते. प्रवीण कामानिमित्त अहमदाबादला गेला होता, तेव्हा त्याची हितार्थीसोबत ओळख झाली.
              मैत्रीचं रुपांतर प्रेमात
दोघांची भेट झाली तेव्हा प्रवीण 26 आणि हितार्थी 25 वर्षांची होती. हितार्थी एका कंपनी जॉब कन्स्ल्टंट म्हणून काम पाहत होती. यावेळी तिची प्रवीणशी मैत्री झाली आणि पुढे त्याचं रुपांतर प्रेमात झालं.
 प्रवीणला अंधारात ठेवलं नाही
   प्रवीणशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर, हितार्थीने सर्वात आधी आपल्या आजाराबद्दलची माहिती प्रवीणला दिली. 2007 सालीच आपल्याला कॅन्सर झाल्याचं हितार्थीने प्रवीणला सांगितलं.

  निस्वार्थी प्रेमासमोर सर्व काही फिकं
हितार्थीने आपल्या आजाराची माहिती दिल्यानंतरही, प्रवीणचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. उलट आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदात घालवण्याचा मानस, प्रवीणने बांधला.
  प्रवीणचा लग्नाचा प्रस्ताव, हितार्थीचे कुटुंबियांचा नकार
प्रवीण आणि हितार्थी एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग बनले होते. दरम्यानच्या काळात हितार्थीचा आजार बळावत गेला. मात्र या प्रत्येकवेळी प्रवीण बुलंद पहाडासारखा हितार्थीच्या मागे उभा होता. प्रवीणने 2010 मध्ये हितार्थीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आपल्या आजारपणाबद्दल माहित असूनही, प्रवीण आपल्याकडे आयुष्याची साथ मागत आहे, या कल्पनेनेच हितार्थीचा बांध फुटला. प्रवीणने मग थेट हितार्थीच्या कुटुंबियांकडेच हितार्थीचा हात मागितला. मात्र त्याला तिच्या कुटुंबियांकडून नकार मिळाला. प्रवीणला फसवणं त्यांना मान्य नव्हतं. पण प्रवीणच्या आग्रहाखातर कुटुंबियांना माघार घ्यावी लागली.
     प्रवीणचा प्रस्ताव, कुटुंबिय चकीत
सर्व वास्तव माहित असूनही, प्रवीणने हितार्थीचा हात मागितल्यामुळे, तिचे कुटुंबीय चकीत झाले. मात्र हितार्थीही प्रवीणला साथ द्यायला तयार झाली होती. तिच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तिला त्याच्यासोबत घालवायचा होता, असं हितार्थीचे वडिल सांगतात. यानंतर मग अखेर 2010 ला प्रवीण आणि हितार्थी लग्नबंधनात अडकले. त्यांचा संसार सुरु होता, मात्र त्याचवेळी सोन्यासारख्या संसारावर काळवंडलेला कॅन्सरचा डाग, गडद होत चालला होता.
हितार्थीच्या उपचारासाठी प्रवीणचे 10 लाख खर्च
सामान्यत: नवविवाहित जोडपं पहिली काही वर्षे स्वप्नाच्या दुनियेत असतात. माझं घर, माझा संसार, पै पाहुणे आणि गोतावळ्यांमध्ये अडकून पडतात. मात्र हितार्थीसाठी थेट कॅन्सरला चॅलेंज दिलेल्या प्रवीणने, सुरुवातीपासूनच तिच्या उपचारासाठी धडपड सुरु केली. हितार्थीवर 2011 मध्ये व्हिपल सर्जरी, 2012 आणि 2014 मध्ये लिव्हर सर्जरी करण्यात आली. यादरम्यान प्रवीणने सुमारे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केले. पाण्यासारखा पैसा ओतून त्याचा फायदा नाही, हे प्रवीणला माहित होतं. मात्र त्याने हार मानली नाही. हितार्थीला रक्ताची गरज होती तेव्हा प्रवीणने तो काम करत असलेल्या कंपनीतील सहकाऱ्यांना हाक दिली आणि रक्तदानासाठी मित्रांची रांग लागली. तब्बल 21 सहकारी प्रवीणच्या हाकेला धावून आले.

      इलाज हरला
हितार्थीसाठी प्रवीणने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र शेवटी 18 मे 2015 ला सर्व इलाज हरले. हितार्थी प्रवीणची साथ सोडून निघून गेली. कॅन्सरने तिचा बळी घेतला, पण प्रवीण-हितार्थीची ही प्रेमकहाणी अमर झाली!

तमाशा झाला अनाथ

काळू कवलापूरकर म्हणजे मराठी मातीतील तमाशामधील एक चमत्कार पर्व. काळू म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजेच काळू, असे समीकरण तयार झाले.

नाळ समजून उकिरड्यामध्ये पुरण्यासाठी नेण्यात आलेला एक मांसाचा गोळा मूल असल्याचे त्याच्या चुलतीला समजते. घरी आल्यानंतर हा मांसाचा गोळा म्हणजे जुळ्यातलाच छोटा घटक म्हणजेच छोटे मूल असल्याचे लक्षात येते. या मुलाला नाव मिळते "अंकुश.' हा पोरगा एक दिवस मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या तमाशाचा सम्राट होईल, सारा देश खळखळून हसवेल आणि कर्तृत्वाच्या जोरावर अत्युच्च शिखरावर जाऊन बसेल, असे भाकीत जर कोणी 80 वर्षांपूर्वी केले असते तर त्यावर कोणी विश्‍वास ठेवला नसता. पण, घडले असेच. आजोबा, वडील यांची तमाशा परंपरा लाभलेला हा छोटा पोरगा मोठ्या बाळूसह म्हणजे लवसह मोठा झाला. काळू-बाळू असे टोपणनाव या दोघांनी धारण केले. वयाच्या 14 व्या वर्षी तमाशा फडात दाखल होऊन सारे आयुष्य तमाशालाच अर्पण केले. लोककला जगवण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत आटापिटा केला. तमाशाला रिमिक्‍सपासून आणि त्याचा सिनेमा होण्यापासून वाचवले. या साऱ्या मोठ्या पर्वाचा एक सक्रिय साक्षीदार, एक महानायक म्हणजे काळू होय. त्यांना वगळून ना तमाशाचा इतिहास लिहिता येईल ना चिकित्सा करता येईल! आजोबा सातू खाडे, वडील संभा यांनी आपल्या घरात तमाशाची परंपरा चालू केली 1867 मध्ये. ती काळूपर्यंत पोहोचली तेव्हा काळ बिकट झाला होता. तमाशा टिकवून ठेवणे काही तोंडाचे काम नव्हते. कवलापूर (जि. सांगली) या छोट्याशा खेड्यात आणि तेही मागासवर्गीयांसाठी असलेल्या शाळेत कशीबशी अक्षरओळख करून घेतलेल्या काळू-बाळूंनी तमाशाची परंपरा आपल्या खांद्यावर घेतली. पाच दशके गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजवली. केवळ शब्दांच्या, अभिनयाच्या जोरावर वगाला महत्त्व प्राप्त करून दिले. लावणी म्हणजे केवळ दिलखेचक अदाकारी नव्हे, तर लोककला टिकवण्यासाठीची ती एक प्रार्थना असते, या भावनेने या जुळ्यांनी तिच्याकडे पाहिले. तिचा बाजार होण्यापासून, ती केवळ उत्तेजित द्रव होण्यापासून, ती अश्‍लीलतेचे प्रतीक होण्यापासून वाचवले. तमाशा रंजक तर आहेच; पण त्याचबरोबर तो बहुजनांनी जगवलेली, जन्माला घातलेली एक सुंदर कलाही आहे, हे या काळू-बाळूंनी समजून घेतले. तमाशा आणि लावणी म्हणजे केवळ ढोलकीच्या तालावर थिरकणे नव्हे, केवळ धुंदफूंद होणे नव्हे किंवा दौलतजादा नव्हे, तर ती एक कला आहे, या भावनेने हे दोघे तमाशाकडे बघत आले. तमाशाच्या अस्तित्वासाठी स्वतःला गाडून घेणारी जी काही मोजकी मंडळी असतील, त्यात एक काळू असतील.

जुळ्या भावंडांचा तमाशा म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने मोठे अप्रूप होते. हे जुळेपण त्यांनी भावनेच्या पातळीवर जपले, संवेदनांच्या पातळीवर जपले. एवढेच नव्हे, तर वगांमध्ये एकाच वेळेला आणि एकसारखा संवाद या जुळ्यांच्या ओठावर येई. त्यात स्वल्पविरामाचाही फरक असायचा नाही. वगामध्ये, तमाशामध्ये लोकांनी पाहिलेला हा एक चमत्कार होता. यामागचे रहस्य काय, हे शेवटपर्यंत कोणाला कळले नाही. तमाशाने आपल्या विकासक्रमात लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षणाची भूमिकाही मोठ्या प्रमाणात केली आहे. स्वातंत्र्याची, संयुक्त महाराष्ट्राची, विषमतेविरुद्धची, निरक्षरतेविरुद्धची, भ्रष्टाचाराविरुद्धची, स्त्री-पुरुष समतेची चळवळ लोकांपर्यंत नेण्यामध्ये सामाजिक चळवळीचा, विचारवंतांचा जसा सहभाग आहे, तसाच तो तमाशाचा, लावण्यांचा, वगांचाही आहे. "सत्ता द्यावी सुनेच्या हाती,' "जहरी प्याला,' "रक्तात न्हाली दिवाळी' आदी वगांची नावे जरी पाहिली तरी ही गोष्ट लक्षात येईल. सर्व रसात अवघड रस असतो तो विनोदाचा. केवळ शब्दांच्या आणि त्यातील विनोदाच्या जोरावर समोरचा प्रचंड जनसमूह झुलवत ठेवणे सोपे नाही. पन्नास वर्षे तमाशासम्राट, विनोदसम्राट, हास्यसम्राट ही बिरुदावली घेऊन जगणे महाकठीण; पण बाळूच्या मदतीने काळूंनी ते करून दाखवले. महाराष्ट्रानेही त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले. इतके प्रेम की वगाला उशीर झाला म्हणून किंवा आपल्या आवडत्या तमासगिराचे नीट ऐकायला आले नाही म्हणून अख्खी कनातच विस्कटून टाकण्याचे प्रसंगही काळूंनी पाहिले. आपल्या कलेला त्यांनी सामाजिक जाणिवेचा भरभक्कम पाया दिला होता. याच जाणिवेतून त्यांनी आपल्या कमाईतील वाटा सार्वजनिक शिक्षणावर खर्च केला होता. आपले छोटेसे गाव देशात अजरामर करून ठेवले. "मी शिवा-संभाच्या, काळू-बाळूच्या कवलापूरचा आहे,' असे मोठे विद्वान बॅ. पी. जी. पाटील दंड थोपटून मोठ्या आनंदाने सांगायचे.
       काळू म्हणजे तमाशाचे मोठे कलावैभव आणि काळू म्हणजे हवालदाराची भूमिका साकारत विनोद रसांनी चिंब झालेला एक इतिहासच म्हणावा लागेल.
या पुस्तकातील एक पान गळाले, हे खरे आहे; पण ते मराठी रसिकांच्या काळजाला गच्च चिकटले आहेत. सिनेमाचे रूप घेतलेल्या आजच्या तमाशाला अनेक नाथ आहेत; पण अस्सल तमाशा मात्र काळूंच्या निधनाने अनाथ झाला आहे.

Monday, 26 December 2016

फँड्री - ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!
'फँड्री' हे कथानक जातिव्यवस्था, दारिद्रय आणि त्यात अडखळलेली व्याकुळ प्रेमकथेची वास्तविकता आहे. नुसतीच भावनिकता, भडक दृश्ये आणि कृत्रिम संवाद कुठेच नसून अस्सल बोलीभाषेतून थेट विषयालाच हात घातला आहे. इतर चित्रपटासारखे आंबट (पानचट) कथानक नसल्याने तो सामान्य बुद्धीला सहज समजणारच नाही. याचा विषयच असामान्य असल्याने थिल्लर टाळक्याच्या सामान्य डोक्यांनी एकांतात हा चित्रपट पहावा . नुसत्या टाळ्या आणि शिट्या वाजवण्यापलीकडे समाजाचे दाहक कथानक समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसत्या प्रेमकथा आपण भरपूर पाहिल्या पण विज्ञानवादी युगात झेप घेणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यात अश्याच ज्वलंत प्रेमकथेची राखरांगोळी होणारी दांभिकता या कथानकात दिसते.
बहुजनांच्या पोरांनी वरच्या जातीतील पोरीसोबत प्रेम, लग्न करायचंच नसतं, "बामनीन चिमणीला हात लावायचा नसतो, तिच्या सोबतच्या चिमण्या तिला आपल्या कळपात घेत नाहीत, तिला वाळीत टाकतात !" या संवादावरून कट्टर धर्मांधता स्पष्ट होते. खरं तर याच विचारसरणीला लाथ घालण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे.
'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे !
काळ्या चिमणीच्या पाठी लागलेला जंब्या शालूच्या प्रेमात व्याकूळ होऊन तिचाच पाठलाग करत असल्याची सांगड चांगलीच घातली आहे. पण प्रत्येक वेळेस तो पाटील, त्याचा मुलगा आणि सनातन गावकरी त्याच्या स्वप्नाचा चुराडा करतात. सध्यस्थितीत अशा कित्येक शालूला अजून त्याची जाणीव नसल्याची खुण दिसून येते. खालच्या जातीतल्या माणसांची स्वप्नं, ध्येय, जीवन, अधिकार काहीच नसतात त्यांनी फक्त वरच्या जातीतल्या लोकांची सेवा करायची असते (कसलीच अपेक्षा न बाळगता) हीच मानसिकता पोखरून कथानकामधून लाचार जगण्याला लाथ मारली आहे. बाप आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जमा करण्यासाठी डुक्कर पकडण्यासारखी घाणेरडी लाचार कामे करत असतो. गरिबांच्या घरी सण, उत्सव, लग्नसोहळा काही नसतो ! त्या दिवशी वरच्या जातीच्या लोकांची सेवा करायची असते या वास्तविकतेची थरारक मांडणी केली आहे. आपल्या मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या घराबाळाला सोबत घेवून डुक्कर पकडण्यासाठी पाठवले जाते. डुक्कर पकडत असतानाचे विदारक आणि करुण चित्रीकरण केले आहे. डुकराच्या पाठीमागे व्याकूळ होऊन धावताना गावातील गुंड जातीयवादी लोकांकडून झालेली छळवणूक, संब्या आणि त्याच्या घरच्यांची होणारी टिंगल टवाळी या सगळ्या गोष्टी अमानुषतेची प्रतिमात्मकता दाखवतात. आगाव गावकरी त्या डुकराला आणि संब्याला 'फँड्री' या नावाने हाक मारतात आणि तेंव्हाच 'फँड्री' या शब्दाचा किती विकृत अर्थ आहे हे समजतं. 'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे ! शेवटी त्या डुकराला पकडून लाकडाला बांधून नेत असताना पाठीमागे भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा दाखवून त्यांच्या विचारांची आजही गरज असल्याचे अप्रतिम दृश्य दाखवले आहे. या दृश्याने नागराज मंजुळे यांचा दृष्टीकोन विषयाला थेट हात घालतो.
कथानक साधे असून उच्च विचारसरणीच्या पातळीवर मांडणी केली आहे. हा चित्रपट सामान्य बुद्धीच्या बाहेरचा असल्याने तो परत परत बघूनच समजेल. समाजातील धर्मांधता, चालीरीती आणि वास्तविक द्वेष या सगळ्या प्रथेविरुद्ध हा बंड आहे. जुलमी आणि प्रस्थापीत व्यवस्थेच्या थोबाडात प्रतिमात्मकरित्या दगड मारून चित्रपटाचा शेवट होतो. चित्रपट संपतो पण संघर्ष संपत नाही. हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!